साधनाबद्दल

प्रकाशनची ग्रंथसूची

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. गुरुजींनी साधनातून लिहिलेले सुंदर पत्रेहे सदर डिसेंबर 1950 मध्ये पुस्तकरूपाने आले, तेच साधना प्रकाशनाचे पहिले पुस्तक. थोडीच पण चांगली पुस्तके प्रकाशित करण्यासाठी साधना प्रकाशनाची ओळख आहे. दरवर्षी आठ ते दहा पुस्तके असे ते प्रमाण राहिले आहे, त्यामुळे जवळपास 600 पुस्तके साधना प्रकाशनाकडून मागील 70 वर्षांत प्रकाशित झाली आहेत.

सध्या साधना प्रकाशनाची दीडशे पुस्तके उपलब्ध आहेत, त्यातील बहुतांश पुस्तके मागील 15 वर्षांत प्रकाशित झालेली आहेत. या सर्व पुस्तकांच्या दोन, तीन किंवा चार आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. यातील अर्ध्याहून अधिक पुस्तके साधना साप्ताहिकाचे विशेषांक व लेखमाला यातून आकाराला आली आहेत. समाजमनाला भिडणारे विषय, आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती आणि तरीही किंमत कमी, ही चतुःसूत्री वापरून तयार केलेली ही पुस्तके आहेत. ही दीडशे पुस्तके e-book स्वरूपात किंडलवर उपलब्ध आहेत आणि त्यापैकी काही पुस्तके ऑडिओ बुक स्वरुपात स्टोरीटेलवर उपलब्ध आहेत.

साधना प्रकाशनाची आऊट ऑफ प्रिंट असलेली काही पुस्तके क्रमाक्रमाने पुनर्मुद्रित करीत आहोत, काही पुस्तके मात्र फक्त e-book स्वरूपात आणणार आहोत.

साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन, साधना मीडिया सेंटर व कर्तव्य साधना ही चारही युनिटस् साधना ट्रस्टमार्फत चालवली जातात. भारतीय संविधानाशी सुसंगत भूमिका घेत, समाजजीवनात योग्य हस्तक्षेप करण्याचे काम ही चारही युनिटस् करत असतात.