साधना प्रकाशनाचे अंतरंग उलगडणारी ‘साधना’च्या विद्यमान संपादकांची मुलाखत

साधना प्रकाशनाविषयी

समग्रतेचं भान येण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक !
– विनोद शिरसाठ 

 

साधना प्रकाशन मागील 70 वर्षांपासून पुस्तके प्रकाशित करत आले आहे. थोडीच (दरवर्षी दहा ते बारा), पण महत्त्वाची पुस्तके साधना प्रकाशनाकडून येतात. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आशय-विषयाची पुस्तके प्रामुख्याने असतात. आतापर्यंत जवळपास 700 पुस्तके साधनाने प्रकाशित केली आहेत. साधना साप्ताहिकातील मजकुराचीच पुस्तके साधना प्रकाशनाकडून प्रामुख्याने येत राहिली… त्यामुळे सर्वच काळात साधना साप्ताहिकाचे संपादकच साधना प्रकाशनाचे संपादक / संचालक राहिले आहेत. साप्ताहिक आणि प्रकाशन हे दोन्ही ‘साधना ट्रस्ट’मार्फत चालवले जाते. त्यामुळे प्रकाशनाच्या वितरणाला आणि व्यवस्थापनाला काही मर्यादा सुरुवातीपासून राहिल्या आहेत… मात्र तरीही पुरोगामी आचार-विचार आणि चळवळी, आंदोलने यांना पूरक व पोषक ठरतील अशी साधनाची पुस्तके चांगलीच दखलपात्र ठरलेली आहेत. 

साधनाचे संस्थापक साने गुरुजी आणि साधना परिवारातील नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते, वसंत बापट, ग.प्र. प्रधान, एस.एम. जोशी, मधू दंडवते, राजा मंगळवेढेकर यांची आणि अन्य दिग्गजांची पुस्तके साधनाने प्रकाशित केली. याशिवाय नरहर कुरुंदकर, बाबा आमटे, हमीद दलवाई अशा काही समाजधुरीणांची सुरुवातीची पुस्तकेही साधनाकडूनच आली. कथा, कादंबरी, कविता, चरित्रे, आत्मचरित्रे, वैचारिक लेखन, बालसाहित्य, शिक्षणविषयक पुस्तके असे विविध प्रकार साधना प्रकाशनाकडून आले. परंतु, पुरोगामी विचारांची राजकीय-सामाजिक पुस्तके प्रकाशित करणारे प्रकाशन अशीच साधनाची ओळख अधिक गडद राहिली. 

साधना प्रकाशनाच्या वाटचालीत लहान-मोठे चढ-उतार येत राहिले… पण हीरक महोत्सवी वर्षानंतरच्या, म्हणजे 2008 नंतरच्या 12 वर्षांत साधना प्रकाशनाचा आलेख चढताच राहिला आहे. या काळात जवळपास सव्वाशे पुस्तके प्रकाशित झाली. आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती, तुलनेने कमी किंमत आणि तरीही जास्त सवलत ही साधनाची चतुःसूत्री या काळात राहिली आहे. गोविंद तळवलकर, सुरेश द्वादशीवार, सुहास पळशीकर, ज्ञानेश्वर मुळे, सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, मिलिंद बोकील अशा अनेक नामवंतांची पुस्तके या दशकात साधनाने प्रकाशित केली. मागील दोन-तीन वर्षांत लुई फिशर, अरुणा रॉय, रामचंद्र गुहा यांसारख्या काही दिग्गजांची इंग्लिश पुस्तके मराठीत आणून साधना प्रकाशनाने अनुवादित पुस्तकांचे आपले दालन उघडले आहे. याच काळात मुस्लीम समाज सुधारणा, आदिवासी समाजजीवन, नक्षलवाद, महात्मा गांधी इत्यादी विषयांवरील विशेष महत्त्वाची पुस्तकेही प्रकाशित केली आहेत….

साधना प्रकाशनाची पाऊण शतकी वाटचाल

‘दैनिक सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत एप्रिल 2023 मधील पाच रविवारी प्रसिद्ध झालेले पाच लेख. हे सर्व लेख साधना प्रकाशनाच्या वाटचालीला केंद्रस्थानी ठेवून लिहिले आहेत. मात्र ती वाटचाल सांगण्यासाठी साप्ताहिक, मीडिया सेंटर व साधना डिजिटल या तिन्ही विभागांचे आवश्यक तेवढे तपशील आले आहेत. प्रत्येक लेखाची शब्दमर्यादा 750 शब्द इतकी असल्याने, पुनरावृत्ती होणार नाही, आवश्यक ते सांगितले जाईल, मात्र प्रचारकी होणार नाही याची काळजी घेतली आहे. या वाटचालीचे हे वस्तुनिष्ठ मूल्यमापन नाही, पण दिशा तीच आहे.

  1. लेख पहिला – साप्ताहिकात उगम असलेले प्रकाशन 
  2. लेख दुसरा – उत्कर्ष – उतार आणि प्रतिमा बदलही