केशव ऊर्फ बंडू गोरे,समाजवादी विचाराचे क्रांतिकारक, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग, जातीयवाद आणि भांडवलशाही यांच्याविरोधात निकराचा लढा, समाजवादी पक्षाचे संघटन मंत्री, आंतरराष्ट्रीय समाजवादाचे अभ्यासक, म्युनिसिपल कामगार संघाची स्थापना करण्यात पुढाकार, खेळ, कला, वक्तृत्व, संगीत, साहित्य यांचा दांडगा व्यासंग, कबड्डी, खो खो, ब्रिज, बुद्धिबळ या खेळांमध्ये रुची, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत भटकंती करण्याचा, फोटो काढण्याचा छंद.
आजच्या भाषेत, केशव गोरे यांचा हा ‘बायोडेटा’. पण बायोडेटामध्ये मावणारं हे व्यक्तिमत्त्व नव्हतंच. भावनाशीलता, उत्साह, पराकोटीची जिद्द आणि चिकाटी यांचा त्यांच्याकडे अक्षय साठा होता. आपली तत्त्वं आणि व्यवहार यांची फारकत होऊ द्यायची नाही हे व्रत त्यांनी अंगीकारलं होतं. राजकीय घटना आणि सामाजिक अभिसरण यांची त्यांना योग्य जाण होती.
केशव गोरे यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा स्मृतिग्रंथ प्रसिद्ध केला. केशव गोरे या व्यक्तीबरोबरच समाजवादी चळवळीच्या संदर्भात एका संपूर्ण काळाचं ते दस्तऐवजीकरण होतं. हा दुर्मीळ स्मृतिग्रंथ पुन्हा एकदा नव्या आवृत्तीच्या रूपात वाचकांसमोर येतो आहे….
.