संन्याशाच्या डायरीतून | Sannyashachya Dayaritun
₹320.00स्वामीजींचे महत्त्व वाढण्यास, त्यांना प्रभावशाली नेते बनण्यास इतिहासाने खरोखरच नाट्यपूर्ण प्रसंग व संधी उपलब्ध करून दिली. हैद्राबाद संस्थानात एकीकडे असलेली अनिर्बंध सरंजामशाही व दुसरीकडे असलेले कमालीचे दारिद्र्य व मागासलेपण यांच्यामधील परस्पर क्रिया-प्रतिक्रियांतून शोषण मात्र निःसंकोचपणे बोकाळले होते. जमीनधारणेचा प्रश्न प्रामुख्याने सर्वांपुढे उभा होता. त्या प्रश्नावरून ग्रामीण भागात चोहोकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रझाकार दल, कम्युनिस्ट, सरंजामी वतनदार, समाजकंटक आणि नफेखोर या सर्वांनी मिळून धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बराच काळपर्यंत पृथ्वीवर नरक निर्माण केला होता.
अकनूर, मचलपल्ली येथील भीषण घटना आणि त्यांसारख्या अन्यत्रही लक्षावधी मूक जनतेवर चाललेल्या अत्याचारांमुळे मोठी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अतिरेकी विचाराच्या मंडळींना आपल्या दृष्टीने या परिस्थितीचा लाभ करून घेण्यास एक संधी मिळाली. प्रश्न मुख्यतः सामाजिक व आर्थिक स्वरूपाचा होता. अर्थात त्यात जातीय व राजनैतिक प्रश्नांचाही गुंता होताच. हे दुखणे नाहीसे करण्यासाठी मोठ्या स्वरूपाची व थोडीशी किचकट अशी शस्त्रक्रिया करणे अवश्य होते. ती शस्त्रक्रिया आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ध्येयनिष्ठेने व चिकाटीने स्वामीजींनी केली.
पी. व्ही. नरसिंह राव (प्रस्तावनेतून)