ज्ञानेश्वर मुळे | Dnyaneshwar Mulay
मराठी भाषा व मराठी साहित्य संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभर जावे, म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या अत्यल्प लेखकांपैकी एक. शिवाय साहित्याच्या क्षेत्रात चालणाऱ्या सर्व चळवळींमध्ये सक्रिय आणि प्रयोगशील सहभाग.
आत्मकथन, कविता, निबंध, वृत्तपत्रलेखन इत्यादी अनेक वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळणारी त्यांची प्रतिभा समग्र विश्वाचा वेध घेत असते. 'माती, पंख आणि आकाश' हे त्यांचे आत्मकथन शिक्षणातून घडणाऱ्या नव्या माणसाचे दर्शन घडवते. 'माणूस आणि मुक्काम' आणि 'ग्यानबाची मेख' हे त्यांचे लेखसंग्रह समाजजीवनाच्या गुंतागुंतींचा परामर्श घेत वाचकांना विचार करायला प्रवृत्त करतात.
'जोनाकी', 'दूर राहिला गाव', 'रस्ताच वेगळा धरला' हे त्यांचे मराठीतील, तर 'ऋतु उग रही है', 'मन के खलिहानों में', 'सुबह है कि होती नहीं' हे हिंदीतील आणि 'अन्दर एक आसमाँ' हा उर्दूतील काव्यसंग्रह. त्यांची कविता समकालीन आणि कालातीत संदर्भाच्या अवकाशात सहज विहार करते. 'स्वत:तील अवकाश' या संग्रहाला नुकताच राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.
भारतीय आणि विदेशी अनेक भाषांत लिखाण. शिवाय त्यांच्या पुस्तकांचे कन्नड, जपानी, अरबी भाषांत भाषांतर. लेखांशांचा कन्नड व जपानी पाठ्यक्रमात समावेश.
साहित्यक्षेत्रातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार. दिल्लीच्या 'साहित्य श्री' सह 'कौशिक' पुरस्कार, 'आपटे वाचन मंदिर' पुरस्कार, 'परिवर्तनवादी कवी' पुरस्कार वगैरेंचा समावेश. साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य.
साहित्याबरोबरच सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय. 'अंतर्नाद', 'साप्ताहिक साधना', 'दै. लोकसत्ता', 'दै. लोकमत', 'दै. सकाळ' इत्यादींतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवरचे परखड व माहितीपूर्ण लिखाण. रमाकान्त रथ यांच्या 'श्रीराधा' या दीर्घकाव्याचा मराठी अनुवाद. शिवाय 'मराठी व जपानी काव्याचा तुलनात्मक अभ्यास' या विषयावर शोधलिखाण.
गेली पंचवीस वर्षे विदेश सेवेतील विविध पदांवर. मॉरिशसमध्ये उप उच्चायुक्त व दमास्कसमध्ये प्रभारी राजदूत म्हणून कार्यकाल संपवून गेली दोन वर्षे मंत्रीमंडळ सचिवालय, दिल्ली येथे विदेशी धोरणावर सल्लागार म्हणून कार्यरत.