Author

राजन गवस | Rajan Gavas

राजन गवस यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
राजन गवस यांचे रविवारच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची 'चौंडकं' ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत. 'लोकसत्ता'च्या शनिवारच्या 'चतुरंग' या पुरवणीत 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करीत असत.
राजन गवस हे एम.ए., एम.एड., पीएच.डी. आहेत. त्यांनी भाऊ पाध्ये यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे काम करत होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. १ जून २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.
महाविद्यालयीन काळातच कविता,कथा लिहिणारे राजन गवस यांची 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये 'उचकी' ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी 'हुंदका' हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः कादंबरी लेखनाचा झाला. 'चौंडकं', 'भंडारभोग', ' कळप' या कादंबऱ्यांनी विषयाचे वेगळेपण जपले. उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते.
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्ऱ्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबऱ्या अनुक्रमे देवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत.

Author's books

Kaifiyat | कैफियत

140.00
कैफियत (लेखसंग्रह) – माणूस, प्राणी, पक्षी आणि एकूणच निसर्गाची कैफियत मांडणारे आणि सभोवतालाकडे सजगतेने पाहायला शिकवणारे ललित लेख.