सतीश बागल | Satish Bagal
सतीश बागल निवृत्त सनदी अधिकारी आहेत. 1975 मध्ये पदार्थ विज्ञानात एम.एससी. केल्यानंतर मुंबईच्या जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून त्यांनी वित्तीय व्यवस्थापन या विषयात एम. बी. ए. ची पदवी प्राप्त केली. पुढे 2001 मध्ये याच संस्थेतून त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स या विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त मंत्रालयातील ट्रेझरी विभागाचे संचालक, ग्रामविकास विभागातील सहसचिव, मुंबईच्या MMRDA चे मुख्य वित्त अधिकारी अशा अनेक वरिष्ठ पदांवर त्यांनी काम केले आहे. पब्लिक फायनान्स, पब्लिक पॉलिसी, अर्थसंकल्प, सार्वजनिक खर्च व्यवस्थापन, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास असून, त्यासंबंधीचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे.
डॉ. बागल यांना शैक्षणिक विषयात रस असून त्यांनी मुंबईमधील सिडनेहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सिम्बायोसिस विद्यापीठ अशा प्रथितयश व्यवस्थापन संस्थांमध्ये व्यवस्थापनशास्त्राचे अध्यापन केले आहे. याव्यतिरिक्त 2003 ते 2006 या चार वर्षांत ते मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव / रजिस्ट्रार व मुख्य वित्त अधिकारी होते; तसेच विद्यापीठाच्या सिनेटचे, मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्यही होते.
पायाभूत सुविधा व वित्त व्यवस्थापन या संदर्भात त्यांनी अमेरिका, चीन, जपान, मलेशिया व युरोप मधील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. ते ग्रंथप्रेमी असून साहित्य, विज्ञान, इतिहास व तत्त्वज्ञान या विषयांवरील ग्रंथांचा त्यांच्याकडे मोठा संग्रह आहे. अनेक वर्तमानपत्रांतून व नियतकालिकांमधून त्यांची ग्रंथ परीक्षणे येत असतात. इकॉनॉमिक अॅन्ड पोलिटिकल विकली या इंग्रजी नियतकालिकातूनही त्यांनी लेखन केले आहे.