Author

विनय हर्डीकर | Vinay Hardikar

महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक जीवनात दीर्घकाळ सक्रीय असणारे विनय हर्डीकर हे त्यांचे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व आणि चिकित्सात्मक लेखनासाठी ओळखले जातात. जून 1949 मध्ये जन्मलेल्या हर्डीकरांचे शालेय शिक्षण मुलुंड, मुंबई येथे झाले; आणि 1972 मध्ये ते पुणे विद्यापीठातून एम ए (इंग्रजी) झाले. Impact of political commitment on literature या विषयाचे ते विशेष जाणकार आहेत.

तेव्हापासून हर्डीकर हे शालेय आणि पदव्युत्तर शिक्षक, राजकीय कार्यकर्ता, स्वयंसेवी कार्यकर्ता, पत्रकार, संपादक, लेखक, प्राध्यापक आणि जाहीर वक्ता म्हणून गेल्या पाच-सहा दशकांत कार्यरत आहेत. औद्योगिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. तसेच गिर्यारोहण, बाईक रायडिंग, क्रिकेट, भारतीय शास्त्रीय संगीत, शोध पत्रकारिता, भारतीय शेती, शेक्स्पिअर व इंग्रजी वाङ्मय हे त्यांच्या जिव्हाळयाचे विषय आहेत. जागतिक, भारतीय आणि मराठी कादंबरी या विषयाची ते स्वतंत्र मांडणी करतात. बहुभाषिक हर्डीकर सहा भाषा चांगल्या जाणतात आणि इतर तीन भाषांची त्यांची तोंडओळख आहे.

हर्डीकर कुमार वयात रा.स्व. संघात स्वयंसेवक होते, 60 च्या दशकाच्या मध्यावर विद्यार्थी चळवळीत त्यांनी काम केले. 1975-77 मध्ये आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह केल्याबद्दल ते दोन महिने तुरुंगात होते. पुढे, जनता पक्ष अस्तित्वात येऊन विसर्जित होईपर्यंत त्यांनी त्या पक्षाचे काम केले. त्यानंतर दशकभर इंडियन एक्स्प्रेसमध्ये पत्रकार म्हणून काम केले. 1983-2008 दरम्यान शेतकरी संघटनेत, शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी चळवळीत भाग घेतला. 2007-08 मध्ये ते स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय सचिव होते. आजही ते शेतकरी प्रश्नांचा अभ्यास करून त्यांवर उपाय सुचवतात.

समकालीन महत्त्वाच्या घडामोडींवर मराठीतील अनेक महत्त्वाच्या नियतकालिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. ‘साधना’च्या कर्तव्य साधना या वेबपोर्टलवर त्यांच्या इंग्रजी लेखांचा स्तंभ प्रकाशित होतो.

लेखन :

जनांचा प्रवाहो चालिला,
(1978), राजहंस प्रकाशन,
(1984), संजय प्रकाशन
श्रद्धांजली, (1997), देशमुख आणि कंपनी
कारुण्योपनिषद : बा. सी. मर्ढेकर आणि त्यांची कविता, (1999), देशमुख आणि कंपनी
विठोबाची आंगी, (2005), देशमुख आणि कंपनी
देवाचे लाडके, (2015), राजहंस प्रकाशन
जन ठायीं ठायीं तुंबला, (2017), जनशक्ती वाचक चळवळ

संपादन :
New Quest या द्वैमासिकाचे कार्यकारी संपादक, (1992-97)
निवडक माणूस, (1998), माणूस प्रतिष्ठान
निवडक श्री. म. माटे (खंड 1 व 2), (2007), देशमुख आणि कंपनी
Talking to an Empty Room: Sharad Joshi in Rajya Sabha, (2017), Medianext Infoprocessors Pvt. Ltd.

Author's books

Saleनवी पुस्तके

Janancha Pravaho Chalila | जनांचा प्रवाहो चालिला

250.00

जॉर्ज ऑर्वेलच्या ‘होमेज टू कॅटॅलोनिया’ या पुस्तकाने माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. स्पॅनिश यादवी युद्धात ऑर्वेल सैनिक म्हणून गेला खरा, पण बार्सेलोनाच्या डोंगराळ भागात युद्धाचा फारसा जोरच नव्हता. गोळीबार करण्याचे प्रसंगसुद्धा हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच त्याच्या वाट्याला आले. तरीही स्वतःचे अनुभव सांगायचे, त्यांचं विश्लेषण करायचं, निरीक्षणे व निष्कर्ष नोंदवून ठेवायचे असे ठरवून एक अतिशय वाचनीय पुस्तक त्यानं लिहिलं. यादवी युद्धामुळे दुभंगलेला स्पेनचा समाज त्याच्या शब्दांमधून साकार झाला, मूर्त झाला.

मी तेच तंत्र अनुसरायचं ठरवलं. सगळं खरं सांगायचं, मोकळेपणाने सांगायचं आणि त्याचा विचार करायचा व मतं मांडायची एवढीच शैली मी वापरली. कोणताही विशिष्ट फॉर्म डोळ्यांपुढे ठेवला नाही. त्यामुळे एका मनमोकळ्या आत्मशोधाचं स्वरूपही आपोआप व सावकाश, पण निश्चितपणे येत गेलं. परिणामी, व्यक्तिस्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य, लोकशाही, प्रामाणिकपणा व सहानुभूती या मूल्यांचा मी निष्ठा म्हणून स्वीकार कसा करीत गेलो, हेही तपासून पाहण्याची गरज मला जाणवू लागली.

Saleनवी पुस्तके

एक्स्प्रेस पुराण | Express puran

160.00

उपजत कुतूहल घेऊन विनय हर्डीकर अनेक क्षेत्रांत गेली पाच दशके विहार करत आहेत. या दरम्यान ते जिथे रमतात, तिथे खोल बुडी मारून तळ पाहून येतात. आणि कालांतराने काठाशी बसून तो अनुभव आपल्या वाचकांशी साद्यंत संवादतात. यातून त्यांची उत्कट आत्मनिवेदनात्मक शैली साकारलेली आहे.

१९८१ ते १९८६ या काळात अशीच बुडी त्यांनी इंग्रजी पत्रकारितेत मारली होती, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रसमूहात फिरता शोधपत्रकार म्हणून. त्या अनुभवांचे पुराण ते इथे सांगत आहेत, अर्थात हे करताना आत्मनिष्ठ अनुभवकथनातून वर्तमानाचा इतिहास नोंदवण्याची बांधिलकी ते सोडत नाहीत.

या आग्रहातून आनंद, औत्सुक्य, फजिती, घालमेल, विषण्णता, रोमांच इत्यादी भावभावनांचा डौलदार स्वानुभव मांडतानाच ते तत्कालीन समाजातल्या आंतरसंबंधांची गुंतागुंत, भारतातल्या पत्रकारितेचे राष्ट्रीय व प्रादेशिक स्वरूप आणि इथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक निष्ठांचा अविरत सुरू असलेला झगडा यांचा (मर्यादित परंतु स्वयंपूर्ण) छेद वाचकांच्या जाणिवेत प्रतिरोपित करतात.

Saleनवी पुस्तके

व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti

280.00

शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.