Jivanashi Sanvad | जीवनाशी संवाद
₹240.0021 जानेवारी 1924 ते 12 नोव्हेंबर 2005 असे 81 वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थिदशेत असतानाच 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर 1975 ते 77 या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.
1971 ते 91 या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून ते सलग पाच वेळा निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे 1996 ते 98 या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.
व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti
₹280.00शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.
गांधीजी आणि त्यांचे टीकाकार | Gandhiji Ani Tyanche Tikakar
₹280.00गांधीजींचा गौरव थांबून त्यांची उणीदुणी काढणे सुरू झाले आहे. देशाचे नवे सत्ताधारी व त्यांचे प्रचारक व हस्तक, गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकलढा आणि त्यात केलेले बलिदान पुसून टाकायला निघाले आहेत. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आले – ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’. 15 ऑगस्ट 2017 ते 24 फेब्रुवारी 2018 या काळात साधना साप्ताहिकातून ते क्रमशः प्रसिद्ध झाले. एका वर्षात या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या.
महात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टीकेमागील त्यांची भूमिका, त्या टीकेतले खरे-खोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक आहे.
गांधी आणि त्यांचे टीकाकार (लेखसंग्रह) – हिंदुत्ववादी, समाजवादी – साम्यवादी, मुस्लीम लीग, क्रांतिकारक, डॉ. आंबेडकर इत्यादी विरोधक आणि सुभाषबाबू, नेहरू, पटेल, आझाद, कस्तुरबा इत्यादी सहकारी यांच्याशी महात्मा गांधींचे संबंध कसे होते, याविषयीचे लेख.
स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत | Swatantryasangramache Mahabharat
₹280.00महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, तरुण कार्यकर्त्यांसाठी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास इंग्रजीतील माझ्या पुस्तकापेक्षा अधिक सविस्तरपणे लिहावा, असे मला तीव्रतेने वाटले. राष्ट्र सेवादलात पूर्वी काम करताना स्वातंत्र्य लढ्याच्या कथांमध्ये रंगून जाणारे सेवादल सैनिक आणि कार्यकर्ते यांची आठवण मला झाली. त्यांच्याशी माझे जसे अतूट नाते होते, तसेच ना विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांशी आणि सध्याच्या विद्यार्थीवर्गाशी जुळावे, अशी ओढ माझ्या मनात निर्माण झाली, त्यातूनच हे ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ लिहिले गेले.
जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru
₹280.00जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रीय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
बखर : भारतीय प्रशासनाची | Bakhar : Bharatiya Prashasanachi
₹280.00भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे. टीकाकारांनी काहीही भाष्य केले तरी, प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे, पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून तुमच्या-माझ्यासारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे, तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून ‘बखर’ हा शब्द वापरला आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख
गांधींविषयी (खंड 3)-गांधी: खुर्द आणि बुद्रुक | Gandhinvishyi (Khand 3)-Gandhi: Khurd Ani Budruk
₹320.00गेल्या शंभर वर्षांतील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले. हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल, असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे.
‘गांधी : खुर्द आणि बुद्रुक’ या तिसऱ्या खंडात भाषा, विज्ञान, जीवनशैली यांसारख्या गांधीजींच्या जीवनातील विविध विषयांना स्पर्श केला आहे. गांधी विचारांच्या परिपूर्ण आकलनासाठी या वेगवेगळ्या विषयांतून भेटणारे गांधी महत्त्वाचे आहेत. जणू काही कॅलिडोस्कोपमधील अनेक पैलूंतून निर्माण होणारी सुघड आकृती. म्हणूनच येथे अनेक खुर्दमधून आपल्याला आकळतात बुद्रुक गांधी.