प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध | Pravahasathi Pravahaviruddha
₹560.002013 ते 2023 या दहा वर्षांत मी साधना साप्ताहिकात चारशे संपादकीय लेख लिहिले, त्यातील सर्वोत्तम शंभर लेख या पुस्तकात घेतले आहेत. त्यामुळे, कोणते विषय आलेले नाहीत किंवा कोणत्या विषयांवर आणखी लिहायला हवे होते, अशा प्रकारच्या अपेक्षा या पुस्तकातील लेख वाचून व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. उर्वरित तीनशे लेखांमध्ये बरेच वेगवेगळे विषय येऊन गेलेले आहेत. या पुस्तकात निवडलेले लेख असे आहेत, जे परिपूर्णतेच्या जवळ जाणारे आहेत, जे आज-उद्याच्या वाचकांना वाचायला आवडतील आणि मुख्य म्हणजे त्या दशकात साधनाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत काय भूमिका होती हे दाखवू शकतील.
अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होत असतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा वा करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच, एका मर्यादनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. ‘सम्यक सकारात्मक’ हा माझा दृष्टीकोन आहे, त्यातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल. अर्थातच, एका प्रवाहासाठी दुसऱ्या प्रवाहाविरुद्ध आणि एका प्रवाहासाठी त्याच प्रवाहाविरुद्धही ! इथे मला विरोधासाठी विरोध अपेक्षित नाही, रचनात्मक वाटचाल अभिप्रेत आहे…
विनोद शिरसाठ
संपादक (साप्ताहिक व प्रकाशन)