साहित्य

Saleनवी पुस्तके

SANE GURUJINCHI JEEVANGATHA | साने गुरुजींची जीवनगाथा

600.00

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांना २४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम होते; पण, कवी, लेखक, अनुवादक, संपादक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील नेते अशी त्यांची सप्तरंगी ओळख अधिक गडद आहे. त्यांनी लिहिलेली लहान-मोठी अशी सव्वाशे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, त्यातील अर्ध्याहून अधिक पुस्तके आजच्या समाजमनाचाही ठाव घेणारी आहेत. साने गुरुजींच्या व्यक्तित्वाचे व कार्याचे वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणे वापरता येतील, पण त्यांच्या केवळ साहित्याचा विचार करता ‘मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता’ हे संबोधन अधिक योग्य ठरेल. अशा या गुरुजींची चरित्रे अनेक लहान-थोरांनी लिहिलेली आहेत, मात्र त्यांचे समग्र म्हणावे असे हे एकमेव चरित्र आहे. त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले राजा मंगळवेढेकर यांनी हे लिहिले आहे. कुमार व युवा अवस्थेत त्यांना गुरुजींचा सहवास लाभला आणि त्यानंतरचे अर्धशतक त्यांनी गुरुजींचेच विचार-कार्य पुढे चालू ठेवले. गुरुजींच्या विचार-कार्याचा गाभा व आवाका समजून घेण्यासाठी फक्त एकच पुस्तक वाचायचे असेल तर ते कोणते, या प्रश्नाचे उत्तर “साने गुरुजींची जीवनगाथा” हेच आहे.

     

Saleनवी पुस्तके

Pariwartnache Don Paik | परिवर्तनाचे दोन पाईक

60.00

आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.

 

     

Saleनवी पुस्तके

Vikas Geete | विकास गीते

80.00

आज मराठीमध्ये हेतुपूर्वक लिहिलेल्या स्फूर्तिगीतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ‘मनोविकास’ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्त्वाचे आहे. वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारित भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो. मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही, याचा मला एक फायदा असा झाला की, त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या. माझे संगीतशिक्षण सुरू असते ते ‘कानसेन’ म्हणूनच. पण, ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार-संगीत नियोजक, माझे मित्रमैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो.

     

Saleनवी पुस्तके

Ek Maifal | एक मैफल

60.00

ग्वाल्हेर घराण्याची प्रख्यात गायिका म्हणून विदुषी नीला भागवत यांची भारतात व परदेशातही ओळख आहे. सुरुवातीला, संगीताच्या जोडीने त्यांनी नृत्य, नाट्य, या कलेच्या प्रांतात, तसेच मराठी साहित्य व समाजशास्त्राचा अभ्यास व काही काळ प्राध्यापकी अशी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. पण पुढील टप्प्यांत संगीत हेच त्यांच्या जीवनाचं श्रेयस व प्रेयस बनलं असं दिसतं. एक प्रयोगशील, अनवट वाटा धुंडाळणारी गायिका, आपली डावी विचारसरणी व स्त्रीवादी भूमिका आपल्या गायन कलेतूनही सुस्पष्टपणे व्ये करणारी सर्जनशील कलाकार, अशी त्यांची प्रतिमा भारतात व परदेशांतही आहे. संगीत क्षेत्रांत ही काहीशी दुर्मिळ बाबच म्हणावी लागेल. अशा समाजाभिमुख कलाकार व्यिेत्त्वाचा वेध घेणं म्हणजे तिच्या जडणघडणीचा काळ व अवकाश यातील ताणे-बाणे समजून घेणं होय.

 

Saleनवी पुस्तके

Pakshi Unhacha – Sat Vidyapithanchya Aawarat | पक्षी उन्हाचा – सात विद्यापीठांच्या आवारात

300.00

विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक या पाच प्रकारच्या भूमिका निभावताना डॉ. राजन हर्षे यांनी पुणे, जेएनयू (दिल्ली), सियान्स पो (पॅरिस), कोलंबिया (न्यू यॉर्क), हैदराबाद, अलाहाबाद आणि एसएयू (दिल्ली) या सात विद्यापीठांच्या आवारात मुशाफिरी केली आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन हा ध्येयवाद त्या सर्व भूमिकांना जोडणारा दुवा होता. तब्बल पाच दशकांच्या त्या प्रवासाचे एका जिप्सी वृत्तीने केलेले हे आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण आहे. या पुस्तकात बारा दीर्घ लेख आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टीक्षेप आणि आजच्या समाज जीवनावर भाष्य हे चार घटक या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे पुस्तक आत्मकथनात्मक वाटेल, प्रत्यक्षात हे एक प्रकारचे कार्यकथन आहे. मोठ्या निष्ठेने व सचोटीने कार्यरत राहताना, परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशात किती परिणामकारक काम करता येते, याचे प्रतिबिंब या पुस्तकात दिसेल.

 

       

Saleनवी पुस्तके

श्यामची आई | Shyamchi Aai

240.00

साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित, सुजय डहाके दिग्दर्शित नवा चित्रपट २०२३ च्या दिवाळीत येत आहे. त्या निमित्ताने त्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती, आता साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

पुस्तकात ४२ प्रकरणे आहेत, त्यातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी सिनेमातील ३५ छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिनेमातील श्यामची आई व वडील, आणि श्यामची भावंडे आहेत. आकर्षक छपाई व हार्ड बाऊंड स्वरूपातील ही आवृत्ती, कोणीही कोणालाही भेट देण्यासाठी आणि संग्रहात ठेवण्यासाठीही महत्वाचा ऐवज आहे.

Saleनवी पुस्तके

Bijali | बिजली

100.00

सामाजिक तत्वज्ञान हे जर या कवीच्या काव्याचे प्रभावी वैशिष्ट्य, तर त्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप कोणते हेही लक्षात घेणे जरूर आहे. ‘बिजली’ तून व्यक्त होणारी जीवनदृष्टी प्रागतिक, व्यापक आणि सहानुभूतीमय आहे. प्रत्येक युगामध्ये सामाजिक प्रगतीचे एक सूत्र अनुस्यूत असते. इष्टानिष्टतेचा शब्दकूट कोणी कितीही पाडला तरी, ग्रीष्मातील वणव्याप्रमाणे हे सूत्र स्वतःच्या आवेगानेच सतत पुढे जात राहते आणि जाताना स्थितिनिष्ठेच्या जीर्ण गढ्यांचे दहन करून टाकते. हे सूत्र ज्याच्या ध्यानात येते, केवळ ध्यानात येत नाही तर आंतरिक भावनेने जो त्याचे ग्रहण करतो, त्याच्यासंबंधीची बौद्धिक निष्ठा व श्रद्वा ज्याच्या ठिकाणी निर्माण होते असाच कवी त्या युगधर्माचा उद्गाता आणि पुढील काळाचा प्रेषित होऊ शकतो:

श्री. वसंतराव बापट यांना हे सूत्र जाणवलेले आहे. ज्या प्रकारे जाणवायला हवे त्याच प्रकारे जाणवलेले आहे म्हणजे त्यात औट घटकेची उसनवारी नाही, तर आंतरिक निष्ठेतून उत्पन्न झालेला जिव्हाळा आहे; आत्मप्रत्ययाच्या ऐरणीवरून उठलेले स्फुल्लिंग आहेत. कवी समाजक्रांतीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यातच आजच्या युगधर्माचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे असे मी मानतो. प्रगतीचे मूलतत्व या दिशेवरुनच निश्चित होऊ शकते. वसंतरावांच्या काव्यामध्ये या तत्वज्ञानाच्या अनेक कला आपल्याला प्रकट झालेल्या दिसतात. किंबहुना त्यांच्या काव्याची प्रमुख प्रेरणा आणि त्याचे सामर्थ्य या जीवनदृष्टीमध्येच आहे.

वि. वा. शिरवाडकर (प्रस्तावनेतून)

 

 

Saleनवी पुस्तके

Vadalache Kinare | वादळाचे किनारे

80.00

नेहमीचा पाऊस तयार होतो त्याची एक टप्प्याटप्प्याची कृती असते. समुद्राचे पाणी, हवेचे प्रवाह आणि उष्णता ह्यांच्या प्रक्रियेमध्ये काही बदल घडले तर त्याच घटकांमधून चक्रीवादळ तयार होते असं शास्त्रज्ञ सांगतात. जगण्याच्या लयीमध्ये असे विलक्षण बदल झाले की नेहमीच्या सवयी विस्कटतात आणि आरोग्याला त्रास देणाऱ्या सवयी तयार होतात. वेगवेगळ्या व्यसनांची वादळे, कुटुंबांच्या आकाशामध्ये अशीच तयार होतात. वादळ तयार झाले की त्याचा भरकटलेला प्रवास सुरू होतो. शेवटी ते कोणत्यातरी किनाऱ्यावर धडकते. तिथे खूपच नुकसान करून जाते. त्या किनाऱ्याचा काही दोष असतो का त्यात ?… पण किनारासुद्धा निसर्गाचाच भाग नाही का. प्रत्येकवेळी शिस्तशीर पावसाने यावे आणि सुखसमृद्धी आणावी असे होत नाही. व्यसनांच्या वादळाच्या किनाऱ्यावर असतात व्यसनात अडकलेल्या माणसाचे कुटुंबीय. कुणाची पत्नी, कुणाचे आई-वडील, भाऊ-बहिणी आणि हो, अनेकांची मुले. वेगवेगळ्या वयांची बुद्धीची, क्षमतांची.

 

   

 

1 2 6