15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना साप्ताहिकाचे हे 75 वे वर्ष आहे. या अमृतमहोत्सवी वाटचालीत साधनाला बालकुमारांचे जसे अगत्य होते तसेच तरुणाईचेही होते. त्यामुळे बालकुमार वाचकांसाठी वर्षातून एखादा विशेषांक आणि युवा वर्गाची अभिव्यक्ती नियमित अंकांमध्ये, ही परंपरा साधनात कायम राहिली आहे. मात्र 2007-08 मध्ये म्हणजे हीरकमहोत्सवी वर्षात साधनाने बालकुमार दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि त्यानंतर पाच वर्षांनी युवा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. म्हणजे बालकुमार अंकांचे हे पंधरावे वर्ष आहे, तर युवा अंकांचे हे नववे वर्ष आहे.
युवा दिवाळी अंकाबाबत सुरुवातीपासून असेच धोरण ठेवले आहे की युवा वाचकांच्या जीवनविषयक धारणा व सामाजिक जाणीवा प्रगल्भ होण्यासाठी त्यातील लेखन उपयुक्त ठरावे. त्याला अनुसरून समाजकार्य, प्रशासन, उद्योग, व्यापार, अर्थकारण, नाटक, सिनेमा, कला-क्रीडा, पत्रकारिता, शेती, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांतील 25 ते 40 वर्षे या वयोगटातील आयकॉन्सच्या मुलाखती मागील चार वर्षांतील युवा अंकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
व्यक्तिगत जडणघडण कशी होत गेली, जीवनविषयक दृष्टिकोन कसा आकाराला येत गेला, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप टाकल्यावर काय दिसते आणि आजच्या समाजजीवनाकडे पाहताना तुम्ही काय भाष्य कराल, हे चार घटक मध्यवर्ती ठेवून या सर्व मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांच्या व्यक्तित्वाचा गाभा व आवाका यांची झलक या मुलाखतींमधून दिसते. त्यांच्याविषयीचे कुतूहल काही प्रमाणात शमते आणि बऱ्याच प्रमाणात वाढते. त्यातून लक्षात येते ते हेच की, या सर्व मुलाखतींमधून या प्रत्येकाची पार्श्वभूमी कितीही वेगळी असली तरी प्रत्येकाला जीवनाचे व जगण्याचे काही तरी निश्चित असे प्रयोजन सापडले आहे. काही एक प्रकारचा ध्येयवाद आणि दूरदर्शीत्व त्यांच्यात आहे. त्यामुळे आज उद्याच्या तरुण पिढ्यांना या मुलाखती दिशादर्शक ठरतील असा आम्हाला विश्वास आहे!
अनुक्रमणिका
Reviews
There are no reviews yet.