स्त्रीपुरुषतुलना | STREEPURUSHTULNA
₹200.00भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक महत्त्वाचे मानले जाते. का, तर ते सत्तांतराचे शतक आहे, नव्या जीवनजाणिवांच्या आरंभाचे शतक आहे, वैचारिक कलहाचे शतक आहे, आत्मपरीक्षणाचे शतक आहे, परंपरेचा आंधळेपणाने स्वीकार न करता परंपरेला आव्हान देणारे शतक आहे, मूलभूत प्रश्नांची जाग आणणारे शतक आहे, परंपरेला आक्रमकपणे सामोरे जाऊन नवा विचार मांडणाऱ्यांचे शतक आहे, नव्या शक्तीच्या उपासनेचे शतक आहे, एवंच, प्रबोधनाचे शतक आहे. ‘तत्पूर्वीच्या एक हजार वर्षांत जे घडले नाही’ ते ज्या शतकात घडले असे शतक आहे, मराठी वाङ्गयाच्या दृष्टीने नवनवीन लेखने व लेखनप्रकार ज्या शतकात निर्माण झाले असे शतक आहे. या शतकाने मराठी वाङ्ख्याला जी अनमोल रत्ने दिली त्यांपैकी एक म्हणजे ताराबाई शिंदे (1850-1910) यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ हे पुस्तक. या पुस्तकात स्त्रीपुरुषांमधील सारा असमतोल दूर करून स्त्रीजातीला पुरता न्याय मिळवून द्यावा अशी खटपट आहे. इतके आधुनिक क्रांतिदर्शी विचार इतक्या तर्कशुद्ध पद्धतीने एका स्त्रीने मांडलेले, मराठी गद्याने पहिल्यांदाच अनुभवले. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (1823-1892) आणि महात्मा जोतीराव फुले (1827-1890) यांच्या लेखणीने ही करामत यापूर्वी केली असली, तरी एका स्त्रीने हे धैर्य दाखविल्याचा हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल.