ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर | Dnyanmurti Govind Talwarkar
₹280.00जेष्ठ पत्रकार – संपादक गोविंदराव तळवलकर यांचे व्यक्तित्व, त्यांचे वाचन, लेखन, संपादन आणि त्यांना असलेली बागकामाची व पशुपक्ष्यांची आवड यांविषयी त्यांच्या मुलींनी लिहिलेले पुस्तक.
जेष्ठ पत्रकार – संपादक गोविंदराव तळवलकर यांचे व्यक्तित्व, त्यांचे वाचन, लेखन, संपादन आणि त्यांना असलेली बागकामाची व पशुपक्ष्यांची आवड यांविषयी त्यांच्या मुलींनी लिहिलेले पुस्तक.
झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट अनेक लोकांच्या दृष्टीने फायद्याची असते. जगातील मोठमोठे कर्तबगार पुरुष, धर्मप्रवर्तक, साम्राज्यांचे संस्थापक, भिन्न-भिन्न विचारसरणींचे निष्ठावंत अनुयायी, प्रसिद्ध राजकारणपटू हे सर्व जण प्रच्छन्न मानसविशारद होते. झुंडींची मानसिक जडण-घडण कशी असते, हे या सर्वांना जणू जन्मतः कळते. या उपजत आणि अचूक ज्ञानाच्या जोरावरच ही मंडळी स्वत:चे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकतात. झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट राजकारणामध्ये पुढारीपण करू इच्छिणाऱ्यांना निकडीची होऊन बसली आहे. हे ज्ञान असेल, तरच झुंडींवर ताबा चालवता येणे शक्य असते. अर्थात, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. तथापि, हे ज्ञान असेल तर निदान ती व्यक्ती झुंडीच्या आहारी तरी जात नाही.
वाचावे कसे हे शिकवण्यासाठी ‘नवी क्षितिजे’ हे त्रैमासिक दीर्घकाळ चालवणाऱ्या आणि थोडेच पण विशेष महत्त्वाचे गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेले ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे पुस्तक दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर आधारित आहे. त्या दोन पुस्तकांचे लेखक वेगवेगळ्या कालखंडातील, वेगवेगळ्या देशांतील आणि वेगवेगळ्या भाषांतील आहेत. त्यातील पहिले पुस्तक आहे ‘द क्राउड’, ल बाँ यांनी लिहिलेले हे पुस्तक मूळ फ्रेंच भाषेतील असून त्याचा इंग्रजी अनुवाद 1896 मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरे पुस्तक आहे ‘द ट्रू बिलिव्हर’, एरिक हॉपर या अमेरिकन लेखकाने 1951 मध्ये हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. विश्वास पाटील यांनी ती दोन पुस्तके अनुक्रमे ‘झुंडी’ आणि ‘सच्चा अनुयायी’ या स्वरूपात सुबोध मराठीत आणली, आणि ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे एकसंध पुस्तक तयार केले. हे दोन्ही भाग परस्परांना पूरक आहेत, एवढेच नव्हे तर परस्परांचा आशय व विषय पुढे घेऊन जाणारे आहेत. 1978 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती जनपथ प्रकाशन, मुंबई यांच्याकडून आली आणि नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून 2020 मध्ये आली. चार दशकांनंतरही हे पुस्तक अधिकाधिक प्रस्तुत ठरते आहे.
(पहिली आवृत्ती – जनपथ प्रकाशन, मुंबई. 1978)
1949 मध्ये माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये क्रांती झाली. आणि 1978 मध्ये डेंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने नवे वळण घेऊन महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. त्यानंतरच्या चाळीस वर्षात चीनने अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली करीत जोमाने आर्थिक विकास साधला. कोट्यवधी गरीब लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढून मानाने जगायला शिकविले.जलद आर्थिक विकासामुळे चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत मनाचे स्थान प्राप्त केले खरे !
गांधीजींचा गौरव थांबून त्यांची उणीदुणी काढणे सुरू झाले आहे. देशाचे नवे सत्ताधारी व त्यांचे प्रचारक व हस्तक, गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकलढा आणि त्यात केलेले बलिदान पुसून टाकायला निघाले आहेत. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आले – ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’. 15 ऑगस्ट 2017 ते 24 फेब्रुवारी 2018 या काळात साधना साप्ताहिकातून ते क्रमशः प्रसिद्ध झाले. एका वर्षात या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या.
महात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टीकेमागील त्यांची भूमिका, त्या टीकेतले खरे-खोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक आहे.
गांधी आणि त्यांचे टीकाकार (लेखसंग्रह) – हिंदुत्ववादी, समाजवादी – साम्यवादी, मुस्लीम लीग, क्रांतिकारक, डॉ. आंबेडकर इत्यादी विरोधक आणि सुभाषबाबू, नेहरू, पटेल, आझाद, कस्तुरबा इत्यादी सहकारी यांच्याशी महात्मा गांधींचे संबंध कसे होते, याविषयीचे लेख.
देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याचे काय हा प्रश्न अनिर्णित होता. त्या शोधप्रक्रियेचा भाग म्हणून 8 मार्च 1951 रोजी सर्वोदय संमेलन आणि तेलंगणाची यात्रा करायला विनोबा भावे निघाले. नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातील बैठकीत तेथील दलितांच्या समस्यांवर चर्चा चालू होती. तेव्हा रामचंद्र रेड्डी या व्यक्तीने त्यांच्या मालकीची 50 एकर कोरडवाहू आणि 50 एकर ओलिताची जमीन दान करण्याची घोषणा केली. त्या घटनेने ठिणगी पडली, त्या रात्री विनोबा झोपू शकले नाहीत. तो दिवस होता 18 एप्रिल 1951.
आणि मग दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाले भूदान आंदोलन, नंतर त्याला ग्रामदानाची जोड मिळाली. तब्बल 13 वर्षे त्या आंदोलनाचा झंझावात देशातील विविध राज्यांतून चालूच राहिला, आणखी दशकभर त्याचा प्रभाव देशभर राहिला. त्या प्रक्रियेत एकूण 47 लाख एकर जमीन मिळाली आणि त्यातील 25 लाख एकर जमीन भूमिहीन शेतमजुरांना वाटली गेली. या संपूर्ण प्रक्रियेची कहाणी, शिवाय त्या आंदोलनाचे आणखी काय, किती व कसे परिणाम झाले, या सर्वांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि तरीही कमालीची वाचनीय व रोचक अशी समीक्षा या पुस्तकात आहे.
कोणतेही लेखन वाचताना मन पुलकित झाल्याचा अनुभव आला किंवा ‘वाह, भले’ असे उद्गार मनोमन उमटले की, लेखकाच्या यशस्वितेची वेगळी पावती देण्याचे कारणच उरत नाही. वसंतरावांचे लेखन वाचताना हा अनुभव मला अनेकदा आला. त्यांचे सगळेच निबंध कसलेल्या नर्तकीच्या पदन्यासाप्रमाणे रुमझुमणारे आहेत. हवा तो भाव क्षणात साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे. संस्कृत व मराठी भाषांच्या संगमात भिजून चिंब झालेली त्यांची लेखणी परिच्छेदामागून परिच्छेद अशा प्रकारे फुलवीत जाते की, वाचकाला हा ताटवा अधिक मनोहारी होता की तो असा भ्रम पडावा.
– ना. ग. गोरे
या संग्रहातील कविता सादर करताना वसंतरावांनी आपल्या समकालीन, समव्यवसायी साहित्यिकांना इशारा देऊन बजावले आहे… “ध्यानात ठेवा, ज्यांची मान ताठ असेल, ज्यांच्या व्यक्तित्वात पोलादाचे उभे-आडवे ताणेबाणे असतील, सत्याचा भार पेलताना ज्यांचा देह झुकला नसेल आणि कोणत्याही लोभासाठी ज्यांनी आत्मा विकला नसेल, त्यांनाच सरस्वतीच्या दरबारात आज आमंत्रण आहे.” आणीबाणीच्या काळात लेखक, कलावंतांची जी मुस्कटदाबी सुरू झाली होती, तिला सच्च्या लेखकाने व कलावंताने शरण जाता कामा नये, असे वसंतरावांना बजावायचे आहे. यात थोडीफार आढ्यता आहे असे कोणाला वाटेल. पण हा कवितासंग्रह वाचल्यानंतर तेवढी आढ्यता, कवीच्या ठिकाणी असायला हरकत नाही असेच वाचकांचे मत होईल.
– ना. ग. गोरे