सुदीप ठाकूर यांचे हे पुस्तक विविध व्यक्तींच्या मुलाखती, सरकारी कागदपत्रे, पुस्तके, आणि अहवाल यावर आधारित आहे. खूप सावधपणे केलेल्या संशोधनाबरोबरच खूप प्रेमाने लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एका असाधारण भारतीयाला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे.
लाल श्याम शाह हे मध्य भारतातील आदिवासींचा आवाज होते, त्यांचा अंतरात्मा होते. ते सही करताना त्यांच्या नावाच्या बरोबर ‘आदिवासी’ हा शब्दही लिहीत असत. ‘लाल श्याम शाह, आदिवासी’ असे ते गर्वाने आणि निर्भयतापूर्वक लिहीत असत. आपल्या लोकांविषयी, समाजाविषयी पूर्ण एकरूपता आणि बांधिलकी दाखवण्याचा तो एक मार्ग होता. आजच्या राजकीय नेत्यांच्या विपरीत त्यांचे वर्तन म्हणावे लागेल. कारण त्यांनी स्वतःच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तर आपल्या समाजाच्या स्वाभिमानासाठी संघर्ष केला. त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व पटावे व तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे.
– रामचंद्र गुहा (प्रस्तावनेतून)