Author

मीना कर्णिक | Meena Karnik

गेली चाळीसहून अधिक वर्षे पत्रकारिता करताहेत. चित्रपट, टीव्ही व नाटक यांच्यावरील लेखन प्रसिद्ध करणाऱ्या 'चंदेरी' या पाक्षिकाच्या सहसंपादक आणि 'महानगर' या दैनिकाच्या फीचर्स संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. काही काळ त्या 'महानगर' दैनिकाच्या संपादकही होत्या.

त्यांनी इंग्लिशमधून मराठीत अनुवाद केलेली चार पुस्तके : 'अरुणाची गोष्ट' (मूळ पुस्तक पिंकी विराणी यांचे 'अरुणाज स्टोरी'). 'खुल्लम खुल्ला' (अभिनेता ऋषी कपूर यांचे आत्मचरित्र). 'बिटर चॉकलेट' (लहान मुलांच्या लैंगिक शोषणावर पिंकी विराणी यांनी लिहिलेले पुस्तक). 'इम्पर्फेक्ट' (क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचं आत्मचरित्र).
(बिटर चॉकलेट या पुस्तकाच्या अनुवादासाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळालेला आहे.)

छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचे चरित्र 'चेहऱ्यामागचा चेहरा', प्रसिद्ध परदेशी व्यक्तींवर लिहिलेलं 'असामान्य' हे व्यक्तिचित्रांचं पुस्तक, अशोक सराफ यांच्या 'मी बहुरूपी' या आत्मचरित्राचे शब्दांकन.
देव आनंद ते शाहरुख खान हा हिंदी सिनेमातला रोमान्सचा प्रवास सांगणारे 'प्यार का राग सुनो' हे द्वारकानाथ संझगिरी आणि हेमंत कर्णिक यांच्याबरोबर लिहिलेलं पुस्तक.

चित्रपट समीक्षक म्हणून कान, बर्लिन, रॉटरडॅम यांसारखे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्यांनी कव्हर केलेले आहेत. FIPRESCI या समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सभासद म्हणून त्यांनी अंकारा, बंगलोर, केरळ यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ज्युरीची भूमिकाही पार पाडलेली आहे. अरब सिनेमासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युरीच्या त्या गेली काही वर्षं भाग आहेत.

Author's books

Saleनवी पुस्तके

आजचे मास्टर्स | Aajache Masters

280.00

गेल्या पंधरा-वीस वर्षांत जागतिक स्तरावर अनेक वेगवेगळे प्रयोग होताहेत. अनेक देशांत, अगदी अपारंपरिक देशांतसुद्धा. या आगळ्यावेगळ्या धडपडीची दखल घेतली जाते जगातल्या महत्त्वाच्या जागतिक चित्रपट महोत्सवांत. तिथे जोखली जातात नव्या संवेदनांची स्पंदनं, नव्या जाणिवा. कधी अंतर्मुख करणाऱ्या, तर कधी बराच काळ मेंदूला सुखद धक्का देणाऱ्या. कधी कधी काही चित्रपट त्यांच्या देशातल्या सामाजिक-राजकीय घडामोडी, मानवी समस्या, स्त्री-पुरुष संबंध, तरुणाईतले नाजूक अनुबंध, युद्धाचे घनघोर आघात आणि त्याचबरोबर राज्यसत्तेने आणलेली कलात्मक आविष्कारावरची तथाकथित नैतिक बंधनं या सगळ्या कलाबाह्य गोष्टींवर मात करीत मैलाचा दगड ठरतात. त्या कलाकृतींना कोणी नाही थांबवू शकत. इतकंच नव्हे, तर मागच्या काही क्लासिक्ससुद्धा माना डोलवून दखल घेतात. इथे भेटणाऱ्या दिग्दर्शकांनी उत्तम कलाकृती दिलेल्या आहेत यात शंकाच नाही. त्यांनी परंपरांचं ओझं झेलत, पडताळत मागच्या क्लासिक्सना अभ्यासत वाटचाल केलीय की या सगळ्या गोष्टी झुगारून देऊन स्वतंत्र वाटचाल केलीय हे वाचकांनी पारदर्शीपणे पाहायला हवं.

– डॉ. जब्बार पटेल  (प्रस्तावनेतून)

 

मुळातच सिनेमाविषयी लिखाण करताना माझा मुख्य उद्देश हाच असतो. आपल्याला सिनेमाविषयी किती कळतं हे सांगणं मला महत्त्वाचं वाटत नाही. त्याऐवजी आपल्याला आवडलेल्या कलाकृतीविषयी लिहावं असं मला वाटतं. यातले अनेक सिनेमे सगळ्यांना पाहता येत नाहीत, त्यामुळे त्या सिनेमांची आणि सिनेमांच्या दिग्दर्शकांची साध्यासोप्या भाषेत ओळख करून द्यावी असं वाटतं. ते वाचून एखाद्या वाचकाला एखाद्या दिग्दर्शकाचा / दिग्दर्शिकेचा शोध घ्यावा वाटला, त्यांचं काम एक्सप्लोअर करावंसं वाटलं तरी खूप झालं की!
– मीना कर्णिक  (मनोगतामधून)