Author

भारत सासणे | Bharat Sasne

भारत जगन्नाथ सासणे हे मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्‌सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. उदगीर येथे २०२२ मध्ये होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.

१९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते; त्यांच्या कथांमधून व्यक्त होणारे जीवनानुभव हे नावीन्यपूर्ण, असांकेतिक, गूढगहन व चमत्कृतिपूर्ण असतात, पण त्यांचे वास्तवाशी घट्ट अनुबंध जुळवलेले असतात. त्यांच्या कथांतून ग्रामीण, आदिवासी, नागर असे समाजजीवनाचे विविध स्तर व त्या सामाजिक परिसरात जगणारी, वैशिष्ट्यपूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसे भेटतात. मानवी जीवनाची अतर्क्यता व असंगतता, मानवी नातेसंबंधांतील ताणतणाव, व्यक्तीच्या मनोविश्वातील गूढ, व्यामिश्र व अनाकलनीय गुंतागुंत, त्यांचे सूक्ष्म, अनेक पदरी चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा स्वाभाविकपणेच दीर्घत्वाकडे झुकतात. कित्येकदा या कथांतून गंभीर, शोकाकुल, व्यामिश्र भावजीवनाचा विलक्षण अस्वस्थ करणारा प्रत्यय येतो. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडून दाखवतात.

काही कथांतून मुस्लिम संस्कृतीच्या छायेत जगणाऱ्या मराठवाड्यातील शहरांचे व व्यक्तींचे सखोल, तपशीलवार चित्रण आढळते. त्यांच्या कथनशैलीत कथाशयाला अनुरूप अशा अन्वर्थक प्रतिमा, प्रतीके, तरल काव्यात्मता, गूढ चमत्कृती (फॅंटसी) अशा अनेकविध घटकांचा सुसंवादी मेळ साधलेला दिसतो. माणसाला केंद्रबिंदू मानणाऱ्या व मनुष्यजीवनाबद्दल अपार करुणा व्यक्त करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. भारत सासणे यांच्या डफ या दीर्घ कथेवर प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे हे 'काळोखाच्या पारंब्या'या नावाचा चित्रपट दिग्दर्शीत करीत आहेत या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेमध्ये स्वतःही काम करत आहेत.

Author's books

Dantkatha । दंतकथा

50.00

हिंदीतील प्रसिद्ध लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांची 1990 मध्ये प्रकाशित झालेली ‘दंतकथा’ या मूळ हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे. या कादंबरीत सामान्य जीवाला व्यापणाऱ्या अबोध आतंकाचे प्रतिकात्मक आणि वैश्विक चित्रण आहे. एक कोंबडा आत्मकथा सांगतो आहे. आज जिवंत असला तरी उद्या कोणाच्या ताटामध्ये जाऊन दंतकथा बनण्याच्या दडपणाखाली आहे. भीती मृत्यूची तशीच जगण्याचीदेखील आहे. कोंबड्याची ही कथा मानवी आणि सामान्य माणसाची कथा होऊन जाते.

     

Ughada, Darwaje ughada…! । उघडा, दरवाजे उघडा…!

50.00

हिंदीतील प्रसिद्ध लेखक कृष्ण चंदर यांचे ‘दरवाज़े खोल दो’ या मूळ उर्दू नाटकाचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे.