चिखलाचे पाय | Chikhalache Pay
₹100.00डॉ. दिलीप शिंदे यांनी या पुस्तकात त्यांना वृद्धाश्रमात भेटलेल्या तेरा व्यक्तींची अनुभवचित्रे शब्दबद्ध केली आहेत. डॉ. शिंदे यांची लेखनशैली प्रवाही, प्रासादिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या वृत्तीतील संवेदनशीलता अधिक भावणारी आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवृत्तीत ‘वृद्धाश्रम पासून ते ‘वृद्धाश्रमांची अपरिहार्यता’पर्यंत झालेली स्थित्यंतरे त्यांनी प्रामाणिक थेटपणाने नोंदवली आहेत. प्रत्येक अनुभवचित्र हे एक कथेचा घाट घेऊन येते. त्यामुळे ती वाचनीय आहेत. या पुस्तकाचा इत्यर्थ डॉ. शिंदे यांनी समारोपात अब्राहम हेशेल यांच्या एका वाक्यातून सांगितला आहे. जग बदलते आहे. विज्ञाननिष्ठ, व्यवहारनिष्ठ होत आहे. हे सगळे खरे असले तरी एक महत्त्वाची जाणीव अब्राहम यांच्या शब्दात – “जगाला आपली प्रगती साधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाप्रमाणेच प्रेमाची व मानवतेचीही गरज आहे.” हे भानच या लेखनामागची आणि आत्मीय कार्यामागची खरी प्रेरणा आहे.
– प्रा. डॉ. तारा भवाळकर
जनांचा प्रवाहो चालिला | Janancha Pravaho Chalila
₹240.00जॉर्ज ऑर्वेलच्या ‘होमेज टू कॅटॅलोनिया’ या पुस्तकाने माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. स्पॅनिश यादवी युद्धात ऑर्वेल सैनिक म्हणून गेला खरा, पण बार्सेलोनाच्या डोंगराळ भागात युद्धाचा फारसा जोरच नव्हता. गोळीबार करण्याचे प्रसंगसुद्धा हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच त्याच्या वाट्याला आले. तरीही स्वतःचे अनुभव सांगायचे, त्यांचं विश्लेषण करायचं, निरीक्षणे व निष्कर्ष नोंदवून ठेवायचे असे ठरवून एक अतिशय वाचनीय पुस्तक त्यानं लिहिलं. यादवी युद्धामुळे दुभंगलेला स्पेनचा समाज त्याच्या शब्दांमधून साकार झाला, मूर्त झाला.
मी तेच तंत्र अनुसरायचं ठरवलं. सगळं खरं सांगायचं, मोकळेपणाने सांगायचं आणि त्याचा विचार करायचा व मतं मांडायची एवढीच शैली मी वापरली. कोणताही विशिष्ट फॉर्म डोळ्यांपुढे ठेवला नाही. त्यामुळे एका मनमोकळ्या आत्मशोधाचं स्वरूपही आपोआप व सावकाश, पण निश्चितपणे येत गेलं. परिणामी, व्यक्तिस्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य, लोकशाही, प्रामाणिकपणा व सहानुभूती या मूल्यांचा मी निष्ठा म्हणून स्वीकार कसा करीत गेलो, हेही तपासून पाहण्याची गरज मला जाणवू लागली.
जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru
₹280.00जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रीय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
ज्वारीची कहाणी | Jwarichi Kahani
₹120.00यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने, 2022 या वर्षी मराठीतील ललित, वैचारिक, साहित्य प्रकारांत तीन तरुणांना अभ्यासवृत्ती प्रदान केली होती, त्यातील एक होता धनंजय सानप. या तरुणाने निवडलेला विषय होता ‘ज्वारी पिकाचा अभ्यास’. साधारणतः एक वर्षभर त्याने लायब्ररी वर्क आणि फिल्ड वर्क केले, त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे. अतिशय सुबोध पद्धतीने ज्वारी या पिकाची कहाणी त्याने सांगितली आहे. यामध्ये इतिहास आहे, वर्तमानही आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शनही!
ज्वारी पिकाच्या संदर्भातील सर्व प्रमुख आयाम या पुस्तकातून पुढे येतात. त्यामुळे शेतकरी, राज्यकर्ते, धोरण आखणारे व ते राबवणारे आणि अर्थातच शेतीशी निगडित अभ्यास संशोधन करणारे यांना हे पुस्तक विशेष उपयुक्त वाटेल. मात्र सर्वसामान्य व जिज्ञासू मराठी वाचकांनाही हे पुस्तक रंजक व उद्बोधक वाटेल. कारण महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनातील मुख्य आहारात (ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ) ज्वारीचे स्थान अग्रभागी आहे.
झुंडीचे मानसशास्त्र | Zundiche Manasashastra
₹280.00झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट अनेक लोकांच्या दृष्टीने फायद्याची असते. जगातील मोठमोठे कर्तबगार पुरुष, धर्मप्रवर्तक, साम्राज्यांचे संस्थापक, भिन्न-भिन्न विचारसरणींचे निष्ठावंत अनुयायी, प्रसिद्ध राजकारणपटू हे सर्व जण प्रच्छन्न मानसविशारद होते. झुंडींची मानसिक जडण-घडण कशी असते, हे या सर्वांना जणू जन्मतः कळते. या उपजत आणि अचूक ज्ञानाच्या जोरावरच ही मंडळी स्वत:चे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू शकतात. झुंडीचे मानसशास्त्र अवगत असणे, ही गोष्ट राजकारणामध्ये पुढारीपण करू इच्छिणाऱ्यांना निकडीची होऊन बसली आहे. हे ज्ञान असेल, तरच झुंडींवर ताबा चालवता येणे शक्य असते. अर्थात, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. तथापि, हे ज्ञान असेल तर निदान ती व्यक्ती झुंडीच्या आहारी तरी जात नाही.
वाचावे कसे हे शिकवण्यासाठी ‘नवी क्षितिजे’ हे त्रैमासिक दीर्घकाळ चालवणाऱ्या आणि थोडेच पण विशेष महत्त्वाचे गंभीर वैचारिक लेखन करणाऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिलेले ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे पुस्तक दोन वेगवेगळ्या पुस्तकांवर आधारित आहे. त्या दोन पुस्तकांचे लेखक वेगवेगळ्या कालखंडातील, वेगवेगळ्या देशांतील आणि वेगवेगळ्या भाषांतील आहेत. त्यातील पहिले पुस्तक आहे ‘द क्राउड’, ल बाँ यांनी लिहिलेले हे पुस्तक मूळ फ्रेंच भाषेतील असून त्याचा इंग्रजी अनुवाद 1896 मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरे पुस्तक आहे ‘द ट्रू बिलिव्हर’, एरिक हॉपर या अमेरिकन लेखकाने 1951 मध्ये हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. विश्वास पाटील यांनी ती दोन पुस्तके अनुक्रमे ‘झुंडी’ आणि ‘सच्चा अनुयायी’ या स्वरूपात सुबोध मराठीत आणली, आणि ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे एकसंध पुस्तक तयार केले. हे दोन्ही भाग परस्परांना पूरक आहेत, एवढेच नव्हे तर परस्परांचा आशय व विषय पुढे घेऊन जाणारे आहेत. 1978 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती जनपथ प्रकाशन, मुंबई यांच्याकडून आली आणि नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून 2020 मध्ये आली. चार दशकांनंतरही हे पुस्तक अधिकाधिक प्रस्तुत ठरते आहे.
(पहिली आवृत्ती – जनपथ प्रकाशन, मुंबई. 1978)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत | Dr. Babasaheb Ambedkar tyanchyach shabdant
₹70.00हे पुस्तक लिहिण्याची पद्धत मोठी अफलातून आहे. प्रत्यक्ष न घेतलेल्या (काल्पनिक) मुलाखतींवर हे पुस्तक आधारलेले आहे. तरीही मुलाखती वास्तवच वाटतात. पुस्तकाची अशी रचना केली आहे की, एकदा वाचायला सुरुवात केल्यावर पुढे वाचतच राहावेसे वाटते.
मुलाखती काल्पनिक तरीही वास्तवावर आधारलेल्या असल्याने, बाबासाहेबांच्या हयातीनंतरच्याही काही घटना या पुस्तकात आल्या आहेत. त्याबाबतही बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त विचारांचा समावेश करता यावा म्हणून. त्यात खटकण्यासारखे काही नाही.
बाबासाहेबांचे म्हणणे बाबासाहेबांच्या तोंडून इतक्या सोप्या भाषेत सांगणे हे अवघड काम आहे. प्रधानसरांनी ते यशस्वीपणे करून दाखविले आहे.