Shop

नवी पुस्तके

भूमिका विशेषांक | Bhumika Visheshank

50.00

क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाचा 50 वा प्रयोग पुण्यात होत आहे. त्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने विशेषांक तयार केला आहे. त्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाआधी झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक या दोघांनी या नाटकाच्या लेखनामागील व दिग्दर्शनाची प्रक्रिया उलगडून सांगणारे दीर्घ लेख या अंकासाठी लिहिले आहेत. आणि तीन दशकांनंतर मराठी रंगभूमीवर या नाटकाद्वारे दमदार पुनरागमन करणारे अभिनेते सचिन खेडेकर यांची विनायक पाचलग यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही या अंकाचे मोठे आकर्षण आहे. शिवाय, या नाटकात विविध पात्र रंगवणाऱ्या समिधा गुरु, सुयश झुंजुरके, जाई खांडेकर, जयश्री जगताप व अतुल महाजन या पाच कलाकारांचे लेखही आहेत. नाटकातील विविध प्रसंगांच्या छायाचित्रांसह तयार केलेला हा बावन्न पानांचा अंक पूर्णतः बहुरंगी आहे.

Saleनवी पुस्तके

समाज, राजकारण, कला | Samaj, Rajkaran, Kala

320.00

1931 ते 2012 असे 80 वर्षांचे आयुष्य लाभलेले राम बापट अर्धशतकाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. त्यांची ओळख प्रामुख्याने, पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि सामाजिक व राजकीय संस्था-संघटनांचे खंबीर पाठीराखे अशी होती. पण त्यांना इतिहास, समाजशास्त्र, मानव्य शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांत असलेली गती थक्क करणारी होती. शिवाय, साहित्य, नाटक, सिनेमा यांचे ते साक्षेपी समीक्षक होते. त्यामुळे व्हर्सटाइल जिनियस असे त्यांच्याबाबत म्हणता येते. त्यांच्या स्मृतीनिमित्त, 2013 ते 2023 या दशकभरात दरवर्षी एक याप्रमाणे व्याख्याने आयोजित करण्याचे काम मकरंद साठे व गजानन परांजपे या दोघांनी हाती घेतले व पार पाडले. त्या व्याख्यानमालेत देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना निमंत्रित केले गेले. अभ्यासपूर्ण व मर्मग्राही अशी ती व्याख्याने इंग्रजीतून झाली. त्या व्याख्यानांचे अनुवाद व संपादन करून तयार केलेले हे पुस्तक आहे.

Saleनवी पुस्तके

आत्मकथा | Aatmakatha

560.00

1922 ते 1995 असे जवळपास 73 वर्षांचे आयुष्य मधु लिमये यांना लाभले. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि 1982 पर्यंत ते सक्रिय राजकारणात राहिले. ‘चले जाव’ चळवळ, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि ‘राष्ट्रीय आणीबाणी’ या तिन्ही प्रसंगी त्यांनी तुरुंगवास भोगला. समाजवादी पक्षाचे नेते म्हणून ते तरुणपणापासून वावरले. महाराष्ट्रातच जडणघडण झालेली असूनही बिहारमधून चार वेळा लोकसभेवर निवडून गेले, उत्तम संसदपटू अशी त्यांची ख्याती राहिली. अखेरची 12 वर्षे त्यांनी राजकारणाचे भाष्यकार आणि लेखक या भूमिका पार पाडल्या. त्यांच्या नावावर लहान-मोठी अशी चार डझन (हिंदी व इंग्रजी) पुस्तके आहेत.
अशा या मधु लिमये यांनी वयाच्या पंचविशीपर्यंतचे म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंतचे लिहिलेले आत्मकथन म्हणजे हे पुस्तक आहे.
यातून त्यांची बालकुमार वयातील व तारुण्यातील झंझावाती वाटचाल तर दिसतेच, पण स्वातंत्र्यपूर्व पाव शतकातील भारतीय समाजजीवनाची विहंगम दृश्येही पाहायला मिळतात. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर चार दशकांतील त्यांची तेजस्वी वाटचाल आणि भारताचे वादळी राजकारण समजून घेण्यासाठी हे पुस्तक पायाभूत ठरेल.

Saleनवी पुस्तके

सुनीलकुमार लवटे यांची मुलाखत | Sunilkumar Lawate Yanchi Mulakhat

70.00

1901 ते 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सार्वजनिक आयुष्य सात दशकांचे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या विपुल व विविधांगी लेखनाचे संकलन व संपादन करण्याचे काम डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हाती घेतले आणि पुढील पाच वर्षे पूर्ण वेळ सातत्याने व चिकाटीने कार्यरत राहून पूर्ण केले.
त्यातून आकाराला आलेला प्रकल्प म्हणजे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’.
तब्बल दहा हजार पानांचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एकूण 18 खंडांमध्ये प्रकाशित केला आहे. त्या निमित्ताने, डॉ. लवटे यांची दोन भागांतील दीर्घ व्हिडिओ मुलाखत साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतली, त्या मुलाखतीचे शब्दांकन असलेली ही पुस्तिका आहे.

Saleनवी पुस्तके

पत्र-पाथेय | Patra-Patheya

320.00

भूदान-ग्रामदान आंदोलन काळात विनोबांनी हजारो व्याख्याने दिली, चर्चा केल्या. त्यांनी अनेक पत्रेही लिहिली. आंदोलनाच्या प्रणेत्याचे-नेत्याचे मानस तर या पत्रांमधून प्रकट झालेले आहेच; या पत्रांमध्ये रणनीती, कार्यक्रम, कार्यशैली वगैरेंबाबतचे विचार आहेत. कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत पातळीवर संवादही आहे. पत्रांमधून बरेचदा अशी सामग्री सापडते, जी मुद्रित दस्तऐवजांमध्ये नसते. लेख व भाषणे यांचे स्वतःचे महत्त्व असते. त्यांच्यात एखाद्या विषयाची मुद्देसूद मांडणी असते. पत्रांमध्ये हृद्गत प्रकट झालेले असते, अंतरीचा जिव्हाळा प्रकट झालेला असतो. पत्रलेखकाच्या आणि पत्र-प्राप्तकर्त्याच्याही स्वभावाच्या विविध पैलूंवर त्यांतून प्रकाश पडतो. म्हणूनच विनोबांची पत्रे हा भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो वाचकांसमोर येण्याने भूदान-ग्रामदानविषयक विमर्शात मोलाची भर पडणार आहे.

Saleनवी पुस्तके

महाराष्ट्रातील प्रबोधन पुढील दिशा | Maharashtratil Prabodhan Pudhil Disha

70.00

धर्म राज्यसंस्थेला खातो म्हणजे काय ? धर्म काय वाघ आहे का की तो राज्यसंस्थेला खाईल ? राज्यसंस्था तर किती तरी बलवान असते. तिच्याकडे पोलीस, सैनिक, विमाने, रणगाडे असतात. धर्म कसा तिला खाईल ?
धर्म वाघासारखा खात नाही तर वाळवीसारखा खातो. धर्माची वाळवी कशी लागते ह्याचे उत्तम उदाहरण कुंभमेळ्याचे. कुंभमेळ्याने राज्यसंस्थेला आपली नेहमीची कार्ये बाजूला ठेवून भाविकांची व्यवस्था ठेवायला भाग पाडले. व्यवस्था म्हणजे काय? तर बांबूचे कठडे बांधणे, पार्किंगची व्यवस्था करणे, विशेष गाड्या सोडणे, इस्पितळे उभारणे, हरवले-सापडल्याची नोंद घेणे, इत्यादी. ह्या कामासाठी शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचाऱ्यांची फौज जुंपली गेली.
राज्यसंस्थेची शक्ती जी शाळा दवाखाने चालवणे, उद्योगधंदे उभारणे, जलसिंचन पुरवणे, कौशल्य-निर्मिती करणे, शेती सुधारणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी लागली पाहिजे ती भाविकांच्या अंघोळीसाठी लावली गेली.
सर्वात शोचनीय गोष्ट म्हणजे केवळ निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच नाही तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना धर्माने संगमावर डुबकी मारायला लावली. धर्म राज्यसंस्थेला खातो ते अशा प्रकारे !

Saleनवी पुस्तके

आजचे मास्टर्स | Aajache Masters

280.00

गेल्या पंधरा-वीस वर्षांत जागतिक स्तरावर अनेक वेगवेगळे प्रयोग होताहेत. अनेक देशांत, अगदी अपारंपरिक देशांतसुद्धा. या आगळ्यावेगळ्या धडपडीची दखल घेतली जाते जगातल्या महत्त्वाच्या जागतिक चित्रपट महोत्सवांत. तिथे जोखली जातात नव्या संवेदनांची स्पंदनं, नव्या जाणिवा. कधी अंतर्मुख करणाऱ्या, तर कधी बराच काळ मेंदूला सुखद धक्का देणाऱ्या. कधी कधी काही चित्रपट त्यांच्या देशातल्या सामाजिक-राजकीय घडामोडी, मानवी समस्या, स्त्री-पुरुष संबंध, तरुणाईतले नाजूक अनुबंध, युद्धाचे घनघोर आघात आणि त्याचबरोबर राज्यसत्तेने आणलेली कलात्मक आविष्कारावरची तथाकथित नैतिक बंधनं या सगळ्या कलाबाह्य गोष्टींवर मात करीत मैलाचा दगड ठरतात. त्या कलाकृतींना कोणी नाही थांबवू शकत. इतकंच नव्हे, तर मागच्या काही क्लासिक्ससुद्धा माना डोलवून दखल घेतात. इथे भेटणाऱ्या दिग्दर्शकांनी उत्तम कलाकृती दिलेल्या आहेत यात शंकाच नाही. त्यांनी परंपरांचं ओझं झेलत, पडताळत मागच्या क्लासिक्सना अभ्यासत वाटचाल केलीय की या सगळ्या गोष्टी झुगारून देऊन स्वतंत्र वाटचाल केलीय हे वाचकांनी पारदर्शीपणे पाहायला हवं.

– डॉ. जब्बार पटेल  (प्रस्तावनेतून)

 

मुळातच सिनेमाविषयी लिखाण करताना माझा मुख्य उद्देश हाच असतो. आपल्याला सिनेमाविषयी किती कळतं हे सांगणं मला महत्त्वाचं वाटत नाही. त्याऐवजी आपल्याला आवडलेल्या कलाकृतीविषयी लिहावं असं मला वाटतं. यातले अनेक सिनेमे सगळ्यांना पाहता येत नाहीत, त्यामुळे त्या सिनेमांची आणि सिनेमांच्या दिग्दर्शकांची साध्यासोप्या भाषेत ओळख करून द्यावी असं वाटतं. ते वाचून एखाद्या वाचकाला एखाद्या दिग्दर्शकाचा / दिग्दर्शिकेचा शोध घ्यावा वाटला, त्यांचं काम एक्सप्लोअर करावंसं वाटलं तरी खूप झालं की!
– मीना कर्णिक  (मनोगतामधून)

Saleनवी पुस्तके

मुशाफिरी | Mushafiri

120.00

अनेक तहेच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि कामांच्या निमित्त नीती बडवे यांनी जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, नेदरलँड, फिनलँड, डेन्मार्क, इस्राएल, झेक रिपब्लिक, टर्की, कॅनडा, अमेरिका आणि सिंगापूर इत्यादी देशांना भेटी दिल्या.
त्या भेटींचे अनेक रसभरीत वृत्तांत या पुस्तकात सामावलेले असल्यामुळे, प्रत्येक लेखात वाचकाला काहीतरी नवीन वाचायला मिळते. लिहिण्याच्या ओघात त्या-त्या देशामधील सांस्कृतिक वैशिष्ट्ये, भाषा, लोक, प्रेक्षणीय स्थळे, खाद्यसंस्कृती, प्रवासातील विलक्षण अनुभव आणि त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींशी उत्स्फूर्तपणे वाढत गेलेल्या सुखद ऋणानुबंधांच्या कहाण्या, हे सर्व या पुस्तकात अतिशय हळुवारपणे गुंफले गेले आहे.
अशा ऋणानुबंधाच्या भावनिक ओलाव्यामुळे नीती बडवे मनाने केवळ पुणे किंवा महाराष्ट्रच नव्हे, तर भारताबाहेरील अनेक देशांशी एकरूप झाल्याचा प्रत्यय येतो. त्यांची लोकसंग्रह करण्याची हातोटी आणि मैत्री जतन करण्याची क्षमता पाहून वाचक थक्क होतील.

– राजन हर्षे (प्रस्तावनेतून)

 

 

1 2 29