जगाच्या इतिहासात ज्या मोठमोठ्या व्यक्ती होऊन गेल्या, त्यांच्या पाठीशी सरकारची शक्ती उभी होती. चर्चिल, रुझवेल्ट, लॉईड जॉर्ज, स्टॅलिन, लेनिन, हिटलर, वुडरो विल्सन, कैसर, लिंकन, नेपोलियन, मेटरविच आणि टेलीरँड ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्याशी तुलना करता, अधिकारावर नसलेल्या आणखी एका व्यक्तीचे नाव मनात येते, ते म्हणजे कार्ल मार्क्स. परंतु त्यांनी केवळ सरकारी यंत्रणेची व्यवस्था कशी असावी याची निश्चित तत्त्वप्रणाली मांडली. गांधींच्याप्रमाणे माणसांच्या सदसद्विवेकबुद्धीला अंत:करणपूर्वक ज्यांनी आवाहन केले, त्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आपल्याला कित्येक शतके मागे जावे लागेल. धार्मिक इतिहासाचा तो एक कालखंड होता. येशु ख्रिस्त, रोमन चर्चमधील काही प्रीस्ट्स्, बुद्ध, हिब्रूंचे ईश्वराचे प्रेषित आणि ग्रीक संत इत्यादी धर्मवेत्यांनी माणसाच्या सदसद़्विवेकबुद्धीला हिरिरीने आवाहन केले होते. पण ते सगळे धर्मप्रचारक होते.
गांधी या सर्वांपासून निराळे होते. त्यांनी ईश्वर किंवा धर्माचा प्रचार केला नाही. ते जणू जागते वागते प्रवचनकार होते. त्यांनी असे दाखवून दिले की, आधुनिक काळात आणि या काळातील राजकारणातही त्या सर्वांची तत्त्वे लागू करता येतील. सत्ता, संपत्ती आणि अहंकारातून माणसाला गिळंकृत करणाऱ्या आधुनिक जगात गांधींच्यासारखा एखादाच चांगला माणूस निर्माण होणे, हे अशक्य होते. सर्वच दृष्टींनी ते अत्यंत व्यवहारी होते. आयुष्य हे विविध प्रकारच्या जिवंतपणाने भरलेले असते याची त्यांना जाण होती.
अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांनी लिहलेले ‘Mahatma Gandhi – His Life and Times’ हे पुस्तक 1951 ला प्रसिद्ध झाले. प्रकाशनानंतर सत्तर वर्षांनी हे पुस्तक प्रथमच मराठीत आले आहे. ‘गांधी’ हा ऑस्करविजेता सिनेमा याच पुस्तकावर आधारलेला होता.