Shastriji | शास्त्रीजी
₹160.00‘प्रकांड पंडित’ हे विशेषण विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील विचारवंतांच्या संदर्भात वापरायचे असेल तर जी काही नावे पटकन समोर येतात, त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव हमखास असतेच! 27 जानेवारी 1901 ते 27 मे 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. संस्कृत भाषा व साहित्य यातील त्यांची विद्वता विशेष उल्लेखनीय आणि धर्म, संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी केलेले अभ्यास-संशोधन व लेखन पायाभूत मानले जाते.
अशा या शास्त्रीजींच्या साथीत व संगतीत वाई येथे जवळपास दोन दशके वावरलेल्या रा. ग. जाधव यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. शिवाय, रा. ग. जाधव हे मराठीतील नामवंत साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी शास्त्रीजींचे कार्य आणि कर्तृत्व ज्या रसिकतेने व विश्लेषक बुद्धीने रेखाटले आहे, त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
मला प्रभावित करून गेलेले पुस्तक | Mala Prabhavit Karun Gelele Pustak
₹160.00या पुस्तकातून अशा निष्कर्षाप्रत सहज येता येईल की, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळी पुस्तके प्रभाव टाकून जाऊ शकतात. यातून ‘वाचनाचे’ व अधिक चांगल्या वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. शिवाय, अभिजात किंवा संशोधनपर किंवा अस्सल जीवनानुभव सांगणारी किंवा अद्भुत अनोखे विश्व दाखवणारी किंवा कल्पकता प्रतिभा यांना बढावा देणारी पुस्तके, प्रभाव टाकून जाण्याची क्षमता जास्त बाळगून असतात. म्हणजे तशी पुस्तके वाचण्याची सवय असेल तर आपला सभोवताल समजून घेण्यासाठी ती विशेष उपयुक्त ठरतात!
ही गुणवैशिष्ट्ये तरुणाईच्या संदर्भात अधिक महत्त्वाची ठरू शकतात. कारण त्यांचे मानस अशाच मार्गदर्शकांच्या किंवा बियाणांच्या शोधात असते. अर्थातच हे एक सर्वपरिचित साधे सत्य आहे, पण प्रयोगातून पुढे आलेले! म्हणून याचे महत्त्व अधिक!
सारांश, हे पुस्तक वाचनाची सवय असलेल्या, बन्यापैकी राजकीय-सामाजिक भान आलेल्या व ‘स्व’ची जाणीव झालेल्या तरुणाईला अंधुक का होईना दिशा दाखवणारे वाटू शकेल.
आधार नसलेली माणसं | Aadhar Nasleli Mansa
₹160.00वंचितांबरोबर काम करण्यामुळे माझं सारं जीवनच बदलून गेलं. जीवनाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. या जनसमुदायांच्या जीवनात डोकावून बघण्याची संधी मला मिळाली आणि ध्येयहीन जीवनाला निश्चित ध्येय लाभलं. ध्येय नव्हतं असं नाही म्हणत, पण ध्येय सतत बदलत होतं. लहान होते, तेव्हा खेळात पुढे येण्याची आतुरता होती. पुढे सायन्स घेऊन इंजिनीयर व्हायचं होतं आणि हे सारं एका बाजूला ठेवून शेवटी सनदी अधिकारी होण्याचा निर्धार केला. अहमदाबादलासुद्धा त्यासाठीच आले. परंतु अहमदाबादला आल्यानंतर जीवन नव्याच मार्गावर चालू लागलं. पत्रकारिता शिकता शिकताच देशातील गरीब-शोषितांची दुःखं खूप जवळून बघितली, समजून घेतली आणि त्यांच्याबरोबर राहिलेदेखील. मी ऊस कामगारांबरोबर दीड महिना राहिले. या दीड महिन्यानं मला मुळापासून हलवलं आणि बदलून टाकलं. माझा पुनर्जन्म झाला.
एक्स्प्रेस पुराण | Express puran
₹160.00उपजत कुतूहल घेऊन विनय हर्डीकर अनेक क्षेत्रांत गेली पाच दशके विहार करत आहेत. या दरम्यान ते जिथे रमतात, तिथे खोल बुडी मारून तळ पाहून येतात. आणि कालांतराने काठाशी बसून तो अनुभव आपल्या वाचकांशी साद्यंत संवादतात. यातून त्यांची उत्कट आत्मनिवेदनात्मक शैली साकारलेली आहे.
1981 ते 1986 या काळात अशीच बुडी त्यांनी इंग्रजी पत्रकारितेत मारली होती, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रसमूहात फिरता शोधपत्रकार म्हणून. त्या अनुभवांचे पुराण ते इथे सांगत आहेत, अर्थात हे करताना आत्मनिष्ठ अनुभवकथनातून वर्तमानाचा इतिहास नोंदवण्याची बांधिलकी ते सोडत नाहीत.
या आग्रहातून आनंद, औत्सुक्य, फजिती, घालमेल, विषण्णता, रोमांच इत्यादी भावभावनांचा डौलदार स्वानुभव मांडतानाच ते तत्कालीन समाजातल्या आंतरसंबंधांची गुंतागुंत, भारतातल्या पत्रकारितेचे राष्ट्रीय व प्रादेशिक स्वरूप आणि इथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक निष्ठांचा अविरत सुरू असलेला झगडा यांचा (मर्यादित परंतु स्वयंपूर्ण) छेद वाचकांच्या जाणिवेत प्रतिरोपित करतात.
धर्मांधता राज्यसंस्थेवरील घोर संकट । Dharmandhata : Rajyasansthevaril Ghor Sankat
₹200.00उत्कृष्ट संसदपटू व समाजवादी नेते अशी ख्याती असलेल्या मधु लिमये यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘रिलीजियस बिगॉरिटी’ आणि ‘लिमिट्स ऑफ ऑथॉरिटी’ या पुस्तकांतील निवडक लेख.
माझे पप्पा हेमंत करकरे । Majhe Pappa Hemant Karkare
₹200.0026 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी आठ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट केले, स्वैर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रतिकारात नऊ अतिरेकी ठार झाले आणि अजमल कसाब हा अतिरेकी जिवंत हाती लागला. चार दिवस चाललेल्या त्या धुमश्चक्रीत पावणेदोनशे लोक मृत्युमुखी पडले. त्यात महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तो दहशतवादी हल्ला भारताच्या अस्मितेवरील हल्ला होता, जागतिक स्तरावर त्याची दखल घेतली गेली, 26/11 या नावाने तो ओळखला जातो. हेमंत करकरे यांची ओळख भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) कर्तबगार अधिकारी म्हणून महाराष्ट्राला होती. साहजिकच, त्यांच्या मृत्यूमुळे सर्व स्तरांतील लहान-थोर हळहळले. त्यांच्या कुटुंबीयांवर तर तो खूपच मोठा आघात होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीचे (कविता यांचे) धैर्य आणि बाणेदार वर्तन देशभर विशेष आदराचा विषय बनले. त्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांची कन्या जुई हिने हेमंत करकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांचे कुटुंबीय, मित्र, नातलग, सहकारी व समाजातील अन्य प्रतिष्ठित लोक यांच्याशी संवाद साधला. त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे.