‘केला होता अट्टहास’ म्हणजे हिंदी साहित्यिक शिवदयाल यांच्या “एक और दुनिया होती” या कांदबरीचा अनुवाद.
कादंबरीचं कथानक अनेक व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंधातून विणलं गेलं आहे आणि त्यात मुख्यतः अन्याय्य समाजव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे, परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपलं आयुष्य खर्ची घालणारे, ‘समग्र क्रांती’च्या विचारांनी भारलेले तरुण आहेत. तरुणांची ही संघटना, कसेल त्याला जमीन देण्यासाठी जमिनींशी संबंधित लढ्यांमध्ये कार्यरत आहे. सत्तर ऐंशीच्या दशकातील चळवळींप्रमाणेच आजही जमिनींचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, आरक्षणांचे, बेकारांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या कारणांनी चळवळी सुरूच आहेत. कधी स्थानिक पातळीवर तर कधी व्यापक स्वरूपात. यांच्या मुळाशी फक्त राजकारणच असतं. असंही नाही. म्हणूनच समकालीन वास्तवातही ही कादंबरी महत्त्वाची वाटते.