Shop

Saleनवी पुस्तके

बाभळीच्या बाया | Babhalichya Baya

200.00

“प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वच लोकांना हे वाटत होतं की, मी तिथे नोकरीला लागल्याने माझ्या बायांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय, त्यांची प्रगती झालीये, त्यांचं भलं झालंय. पण हे पूर्ण सत्य नाहीये. लेखमालिकेत निसटून गेलेला माझ्या जडणीघडणीचा भाग मी या पुस्तकात मांडलाय. जेवढा परिणाम माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात झाला, त्यापेक्षा कैकपटीने जास्त माझ्या आयुष्यात झाला. आत्मसन्मान आणि नैराश्याने भरलेल्या माझ्या आयुष्याला त्यांनी पाठीचा कणा दिला, संघर्षाचं बळ दिलं. माझा अतिशय खचलेला, आतला पैलू मी ‘सुरवंट ‘मधून मांडलाय. ते लिहिताना मला धाडस लागलं, पोटात कालवाकालव झाली, पण वाटलं लिहू या… कारण हा प्रवास केवळ माझ्या बायांचाच नव्हता. आमच्या विदर्भात सर्वांत कोरड्या, उष्ण भागातही जे झाड तग धरून उभं राहतं ते म्हणजे बाभूळ. त्याला स्वतःचं अस्तित्व टिकवता येतं… अगदी माझ्या बायांसारखं”

Saleनवी पुस्तके

बोधाचा जोडला तारा | Bodhacha Jodala Tara

280.00

“साहित्याची सगळ्यात मोठी ताकद त्याच्या संदिग्धतेमध्ये आहे. निसंदिग्ध, उघडं करून, सगळं स्पष्ट करून सांगणं ही साहित्याची पद्धत नाही. लेखक संदिग्धपणे सांगणार. ते प्रतीत होणं, समजणं आणि त्यात जे स्पष्टपणे म्हटलेलं नाही तेसुद्धा जाणवणं; ही प्रक्रिया वाचकांच्या मनात होणार. ती पूर्णत्वाला गेली की, त्याचा आनंद खूप मोठा असतो.”

“साहित्य आणि सामाजिक जाणीव या परस्परविरोधी गोष्टी नाहीत… सामाजिक जाणीव ही साहित्याची सहज, सुलभ अशी सहचारिणी आहे. त्यामुळे एकाच मनात त्या सुखाने नांदू शकतात. दुराग्रही, झापडबंद विचारांचं साहित्याला ओझं होतं, पण सामाजिक जाणिवेचं नाही.”

“समाज पुरेसा मोकळा, आधुनिक आणि उदारमतवादी पाहिजे; तर मग साहित्य बहरून येऊ शकतं. समाज अस्मितावादी, स्वकेंद्री, संकुचित आणि आतल्या आत बघणारा झाला, तर त्याचा साहित्यावर विपरीत परिणाम होईल.”

…मिलिंद बोकील यांच्याशी संवाद

Saleनवी पुस्तके

प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध | Prawahasathi Prawahaviruddha

560.00

2013 ते 2023 या दहा वर्षांत मी साधना साप्ताहिकात चारशे संपादकीय लेख लिहिले, त्यातील सर्वोत्तम शंभर लेख या पुस्तकात घेतले आहेत. त्यामुळे, कोणते विषय आलेले नाहीत किंवा कोणत्या विषयांवर आणखी लिहायला हवे होते, अशा प्रकारच्या अपेक्षा या पुस्तकातील लेख वाचून व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. उर्वरित तीनशे लेखांमध्ये बरेच वेगवेगळे विषय येऊन गेलेले आहेत. या पुस्तकात निवडलेले लेख असे आहेत, जे परिपूर्णतेच्या जवळ जाणारे आहेत, जे आज-उद्याच्या वाचकांना वाचायला आवडतील आणि मुख्य म्हणजे त्या दशकात साधनाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत काय भूमिका होती हे दाखवू शकतील.

अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होत असतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा वा करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच, एका मयदिनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. ‘सम्यक सकारात्मक’ हा माझा दृष्टीकोन आहे, त्यातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल. अर्थातच, एका प्रवाहासाठी दुसऱ्या प्रवाहाविरुद्ध आणि एका प्रवाहासाठी त्याच प्रवाहाविरुद्धही ! इथे मला विरोधासाठी विरोध अपेक्षित नाही, रचनात्मक वाटचाल अभिप्रेत आहे…

भूमिका विशेषांक | Bhumika Visheshank

50.00

क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाचा 50 वा प्रयोग पुण्यात होत आहे. त्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने विशेषांक तयार केला आहे. त्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाआधी झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक या दोघांनी या नाटकाच्या लेखनामागील व दिग्दर्शनाची प्रक्रिया उलगडून सांगणारे दीर्घ लेख या अंकासाठी लिहिले आहेत. आणि तीन दशकांनंतर मराठी रंगभूमीवर या नाटकाद्वारे दमदार पुनरागमन करणारे अभिनेते सचिन खेडेकर यांची विनायक पाचलग यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही या अंकाचे मोठे आकर्षण आहे. शिवाय, या नाटकात विविध पात्र रंगवणाऱ्या समिधा गुरु, सुयश झुंजुरके, जाई खांडेकर, जयश्री जगताप व अतुल महाजन या पाच कलाकारांचे लेखही आहेत. नाटकातील विविध प्रसंगांच्या छायाचित्रांसह तयार केलेला हा बावन्न पानांचा अंक पूर्णतः बहुरंगी आहे.

पत्र-पाथेय | Patra-Patheya

320.00

भूदान-ग्रामदान आंदोलन काळात विनोबांनी हजारो व्याख्याने दिली, चर्चा केल्या. त्यांनी अनेक पत्रेही लिहिली. आंदोलनाच्या प्रणेत्याचे-नेत्याचे मानस तर या पत्रांमधून प्रकट झालेले आहेच; या पत्रांमध्ये रणनीती, कार्यक्रम, कार्यशैली वगैरेंबाबतचे विचार आहेत. कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत पातळीवर संवादही आहे. पत्रांमधून बरेचदा अशी सामग्री सापडते, जी मुद्रित दस्तऐवजांमध्ये नसते. लेख व भाषणे यांचे स्वतःचे महत्त्व असते. त्यांच्यात एखाद्या विषयाची मुद्देसूद मांडणी असते. पत्रांमध्ये हृद्गत प्रकट झालेले असते, अंतरीचा जिव्हाळा प्रकट झालेला असतो. पत्रलेखकाच्या आणि पत्र-प्राप्तकर्त्याच्याही स्वभावाच्या विविध पैलूंवर त्यांतून प्रकाश पडतो. म्हणूनच विनोबांची पत्रे हा भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो वाचकांसमोर येण्याने भूदान-ग्रामदानविषयक विमर्शात मोलाची भर पडणार आहे.

Saleनवी पुस्तके

भारतीय अर्थकारणावरील निबंध | Bhartiya Arthkarnavaril Nibandh

360.00

“स्थानिक सत्तेचे सर्वांत कनिष्ठ एकक विचारात घ्यायचे झाले तर भारतातील ग्रामसमुदायाइतक्या स्वयंपूर्ण व स्वावलंबी एककासारखा कोणताच दाखला युरोपातील कोणत्याही देशात सापडत नाही. रशियातील ‘मीअ’ (Mere), जर्मनीमधील ‘गाउ’ (Gau), फ्रान्समधील ‘कमिन’ (Commune), इंग्लंडमधील ‘पॅरिश’ (Parish) यांचा उगम भारतीय गावाशी मिळताजुळता असला तरी, जुन्या काळी भारतीय ग्रामसमुदाय पूर्ण स्वातंत्र्य बाळगून होता, तसे मात्र या इतर देशांमधील रचनांबाबत म्हणता येत नाही. पण, भारतातील लोकांनी सभ्य व सामुदायिक जीवनाचा पुढील विकास मात्र साधला नाही.

जुन्या ग्रीक व रोमन समुदायांनी अनुक्रमे ‘सिव्हिटास’ व ‘डेमॉस’ या रचना परिपूर्णरीत्या विकसित केल्या. इटलीतील काही शहरे, जर्मनीतील काही स्वतंत्र शहरे, नेदरलँड्स व स्वित्झर्लंड आणि युरोपीय इतिहासातील सर्वोत्तम काळाचा अपवाद वगळता ग्रीक व रोमन समुदायांच्या रचनांच्या तोडीची कामगिरी इतरांना फारशी करता आली नाही.”

– न्या. महादेव गोविंद रानडे (इंग्लंड व भारत येथील स्थानिक शासन)

 

   

मानसरंगचे अंतरंग | Manasrangche Antarang

80.00

मन, मनाचे व्यवहार, मानसिक आजारांची, लक्षणे, कारणे आणि उपाय यांवर काही वर्षांपूर्वी डॉ. हमीद दाभोलकर या मनोविकार तज्ज्ञासोबत, मी आणि राजू इनामदार यांनी ‘मनोविकार संवाद कार्यशाळा’ घेतली. त्यात आम्ही संवादाच्या विविध पद्धतींवर काम केले. विविध आजारांची माहिती लोकांना देण्याकरता पोस्टर, घोषवाक्य, गाणी आणि नाटक यांचा प्रभावी वापर कसा करता येईल याचा विचार केला. त्यात घुसळण होऊन अचूक शास्त्रीय माहिती ही कलात्मक संवादी पद्धतीने देण्याचे मार्ग आम्हाला दिसले. त्यातील एक मार्ग म्हणजे Community Theatre सुरू करून लोकांशी संवाद साधणे हा होता. नाटक करताना करणारे आणि बघणारे या दोघांचेही शिक्षण होते. विचारांची बीजे दृक्-श्राव्य रूपातून खोलवर रुजतात. जिवंत अनुभव हा प्रभावशाली असतो. हे सर्व लक्षात घेऊन ‘मानसरंग नाट्यमहोत्सव’ भरवावा असे ठरले. तीन वर्षे ते महोत्सव भरले. त्या संपूर्ण प्रक्रियेची झलक दाखवणारी ही पुस्तिका आहे.

जिंकुनी मरणाला | Jinkuni Maranala

120.00

कोणतेही लेखन वाचताना मन पुलकित झाल्याचा अनुभव आला किंवा ‘वाह, भले’ असे उद्‌गार मनोमन उमटले की, लेखकाच्या यशस्वितेची वेगळी पावती देण्याचे कारणच उरत नाही.

वसंतरावांचे लेखन वाचताना हा अनुभव मला अनेकदा आला.

त्यांचे सगळेच निबंध कसलेल्या नर्तकीच्या पदन्यासाप्रमाणे रुमझुमणारे आहेत.

हवा तो भाव क्षणात साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे.

संस्कृत व मराठी भाषांच्या संगमात भिजून चिंब झालेली त्यांची लेखणी परिच्छेदामागून परिच्छेद अशा प्रकारे फुलवीत जाते की, वाचकाला हा ताटवा अधिक मनोहारी होता की तो असा भ्रम पडावा.

– ना. ग. गोरे

1 22 23 24 30