शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!
अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.
गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.
– विनय हर्डीकर

