गेल्या पंधरा-वीस वर्षांत जागतिक स्तरावर अनेक वेगवेगळे प्रयोग होताहेत. अनेक देशांत, अगदी अपारंपरिक देशांतसुद्धा. या आगळ्यावेगळ्या धडपडीची दखल घेतली जाते जगातल्या महत्त्वाच्या जागतिक चित्रपट महोत्सवांत. तिथे जोखली जातात नव्या संवेदनांची स्पंदनं, नव्या जाणिवा. कधी अंतर्मुख करणाऱ्या, तर कधी बराच काळ मेंदूला सुखद धक्का देणाऱ्या. कधी कधी काही चित्रपट त्यांच्या देशातल्या सामाजिक-राजकीय घडामोडी, मानवी समस्या, स्त्री-पुरुष संबंध, तरुणाईतले नाजूक अनुबंध, युद्धाचे घनघोर आघात आणि त्याचबरोबर राज्यसत्तेने आणलेली कलात्मक आविष्कारावरची तथाकथित नैतिक बंधनं या सगळ्या कलाबाह्य गोष्टींवर मात करीत मैलाचा दगड ठरतात. त्या कलाकृतींना कोणी नाही थांबवू शकत. इतकंच नव्हे, तर मागच्या काही क्लासिक्ससुद्धा माना डोलवून दखल घेतात. इथे भेटणाऱ्या दिग्दर्शकांनी उत्तम कलाकृती दिलेल्या आहेत यात शंकाच नाही. त्यांनी परंपरांचं ओझं झेलत, पडताळत मागच्या क्लासिक्सना अभ्यासत वाटचाल केलीय की या सगळ्या गोष्टी झुगारून देऊन स्वतंत्र वाटचाल केलीय हे वाचकांनी पारदर्शीपणे पाहायला हवं.
– डॉ. जब्बार पटेल (प्रस्तावनेतून)
मुळातच सिनेमाविषयी लिखाण करताना माझा मुख्य उद्देश हाच असतो. आपल्याला सिनेमाविषयी किती कळतं हे सांगणं मला महत्त्वाचं वाटत नाही. त्याऐवजी आपल्याला आवडलेल्या कलाकृतीविषयी लिहावं असं मला वाटतं. यातले अनेक सिनेमे सगळ्यांना पाहता येत नाहीत, त्यामुळे त्या सिनेमांची आणि सिनेमांच्या दिग्दर्शकांची साध्यासोप्या भाषेत ओळख करून द्यावी असं वाटतं. ते वाचून एखाद्या वाचकाला एखाद्या दिग्दर्शकाचा / दिग्दर्शिकेचा शोध घ्यावा वाटला, त्यांचं काम एक्सप्लोअर करावंसं वाटलं तरी खूप झालं की!
– मीना कर्णिक (मनोगतामधून)