धर्म राज्यसंस्थेला खातो म्हणजे काय ? धर्म काय वाघ आहे का की तो राज्यसंस्थेला खाईल ? राज्यसंस्था तर किती तरी बलवान असते. तिच्याकडे पोलीस, सैनिक, विमाने, रणगाडे असतात. धर्म कसा तिला खाईल ?
धर्म वाघासारखा खात नाही तर वाळवीसारखा खातो. धर्माची वाळवी कशी लागते ह्याचे उत्तम उदाहरण कुंभमेळ्याचे. कुंभमेळ्याने राज्यसंस्थेला आपली नेहमीची कार्ये बाजूला ठेवून भाविकांची व्यवस्था ठेवायला भाग पाडले. व्यवस्था म्हणजे काय? तर बांबूचे कठडे बांधणे, पार्किंगची व्यवस्था करणे, विशेष गाड्या सोडणे, इस्पितळे उभारणे, हरवले-सापडल्याची नोंद घेणे, इत्यादी. ह्या कामासाठी शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचाऱ्यांची फौज जुंपली गेली.
राज्यसंस्थेची शक्ती जी शाळा दवाखाने चालवणे, उद्योगधंदे उभारणे, जलसिंचन पुरवणे, कौशल्य-निर्मिती करणे, शेती सुधारणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी लागली पाहिजे ती भाविकांच्या अंघोळीसाठी लावली गेली.
सर्वात शोचनीय गोष्ट म्हणजे केवळ निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच नाही तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना धर्माने संगमावर डुबकी मारायला लावली. धर्म राज्यसंस्थेला खातो ते अशा प्रकारे !