महाराष्ट्रात विनोबा | Maharashtrat Vinoba
₹360.00विनोबा महाराष्ट्रात आले तोपर्यंत लाखो एकर जमीन दानात मिळाली होती. हजारो गावे ग्रामदान झाली होती.
भूदान-यज्ञादरम्यान अनेक विचार प्रकट झाले होते, अनेक कार्यक्रम पुढे आले होते. ही सगळी शिदोरी घेऊन विनोबा त्यांच्या प्रिय महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रापुढे त्यांनी हृदय मोकळे केले. यामुळेच त्यांच्या येथील अनेक भाषणांना वेगळ्याच जिव्हाळ्याचा स्पर्श आहे. या पदयात्रेतील त्यांच्या भाषणांच्या संपादनातून ‘महाराष्ट्रात विनोबा’ पुस्तकाचे चार भाग प्रकाशित झाले (1958-59).
या भाषणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती मराठीत आहेत. भारतभरच्या पदयात्रेत महाराष्ट्र आणि गुजरातचा अपवाद वगळता विनोबा हिंदीत बोलले. फक्त महाराष्ट्रात मराठीत. त्यांची मराठी वक्तृत्वशैली या पुस्तकामध्ये दिसते तशी साहजिकच अन्यत्र दिसत नाही. विनोबांच्या विविध विषयांवरील विचारांना संकलित-संपादित करून अनेक पुस्तके विभिन्न भाषांमध्ये तयार झाली आहेत. ती उपयोगी आहेतच. मात्र मूळ भाषणांमधील खुमारी त्यांच्यात असू शकत नाही.
जनांचा प्रवाहो चालिला | Janancha Pravaho Chalila
₹240.00जॉर्ज ऑर्वेलच्या ‘होमेज टू कॅटॅलोनिया’ या पुस्तकाने माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. स्पॅनिश यादवी युद्धात ऑर्वेल सैनिक म्हणून गेला खरा, पण बार्सेलोनाच्या डोंगराळ भागात युद्धाचा फारसा जोरच नव्हता. गोळीबार करण्याचे प्रसंगसुद्धा हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच त्याच्या वाट्याला आले. तरीही स्वतःचे अनुभव सांगायचे, त्यांचं विश्लेषण करायचं, निरीक्षणे व निष्कर्ष नोंदवून ठेवायचे असे ठरवून एक अतिशय वाचनीय पुस्तक त्यानं लिहिलं. यादवी युद्धामुळे दुभंगलेला स्पेनचा समाज त्याच्या शब्दांमधून साकार झाला, मूर्त झाला.
मी तेच तंत्र अनुसरायचं ठरवलं. सगळं खरं सांगायचं, मोकळेपणाने सांगायचं आणि त्याचा विचार करायचा व मतं मांडायची एवढीच शैली मी वापरली. कोणताही विशिष्ट फॉर्म डोळ्यांपुढे ठेवला नाही. त्यामुळे एका मनमोकळ्या आत्मशोधाचं स्वरूपही आपोआप व सावकाश, पण निश्चितपणे येत गेलं. परिणामी, व्यक्तिस्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य, लोकशाही, प्रामाणिकपणा व सहानुभूती या मूल्यांचा मी निष्ठा म्हणून स्वीकार कसा करीत गेलो, हेही तपासून पाहण्याची गरज मला जाणवू लागली.
एक्स्प्रेस पुराण | Express puran
₹160.00उपजत कुतूहल घेऊन विनय हर्डीकर अनेक क्षेत्रांत गेली पाच दशके विहार करत आहेत. या दरम्यान ते जिथे रमतात, तिथे खोल बुडी मारून तळ पाहून येतात. आणि कालांतराने काठाशी बसून तो अनुभव आपल्या वाचकांशी साद्यंत संवादतात. यातून त्यांची उत्कट आत्मनिवेदनात्मक शैली साकारलेली आहे.
1981 ते 1986 या काळात अशीच बुडी त्यांनी इंग्रजी पत्रकारितेत मारली होती, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रसमूहात फिरता शोधपत्रकार म्हणून. त्या अनुभवांचे पुराण ते इथे सांगत आहेत, अर्थात हे करताना आत्मनिष्ठ अनुभवकथनातून वर्तमानाचा इतिहास नोंदवण्याची बांधिलकी ते सोडत नाहीत.
या आग्रहातून आनंद, औत्सुक्य, फजिती, घालमेल, विषण्णता, रोमांच इत्यादी भावभावनांचा डौलदार स्वानुभव मांडतानाच ते तत्कालीन समाजातल्या आंतरसंबंधांची गुंतागुंत, भारतातल्या पत्रकारितेचे राष्ट्रीय व प्रादेशिक स्वरूप आणि इथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक निष्ठांचा अविरत सुरू असलेला झगडा यांचा (मर्यादित परंतु स्वयंपूर्ण) छेद वाचकांच्या जाणिवेत प्रतिरोपित करतात.
द्रविड महाराष्ट्र | Dravid Maharashtra
₹60.00भाषेच्या संबंधात मराठी भाषा संस्कृत कुळातली आहे हे ठरल्यावर तिची शब्दसंपदाही पूर्णतया संस्कृत कुळातूनच सिद्ध करणे क्रमप्राप्त मानले गेले. तमिळ कुळातील शब्दभांडाराशी तिची प्राथमिक तुलनाही झाली नाही. स्थळनामांच्याही अभ्यासात नवे पाऊल पडलेले नाही. वस्तुस्थिती मात्र वेगळीच दिसते. संस्कृत कुळावरून मराठीतले जे शब्द व्युत्पादिता येत नाहीत, त्यातले बहुसंख्य तमिळ असावेत. तसेच मराठी मुलुखातील बहुसंख्य स्थळनामांचा संस्कृत, प्राकृत, कानडी वा तेलुगू भाषांवरून अर्थ लागत नाही; तमिळवरून मात्र लागतो. खास महाराष्ट्राची म्हणून मानली गेलेली खंडोबा-विठोबासारखी महादैवते किंवा बोलाई-फिरंगाईसारखी लोकदैवते यांचाही इतिहास आणि अर्थ आपल्याला तमिळ आदिसाहित्यावरून चांगला उमगू शकतो. त्यामुळे, महाराष्ट्रादी नावांचे मूळ तमिळमध्ये शोधण्यास सबळ कारण आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत | Dr. Babasaheb Ambedkar tyanchyach shabdant
₹70.00हे पुस्तक लिहिण्याची पद्धत मोठी अफलातून आहे. प्रत्यक्ष न घेतलेल्या (काल्पनिक) मुलाखतींवर हे पुस्तक आधारलेले आहे. तरीही मुलाखती वास्तवच वाटतात. पुस्तकाची अशी रचना केली आहे की, एकदा वाचायला सुरुवात केल्यावर पुढे वाचतच राहावेसे वाटते.
मुलाखती काल्पनिक तरीही वास्तवावर आधारलेल्या असल्याने, बाबासाहेबांच्या हयातीनंतरच्याही काही घटना या पुस्तकात आल्या आहेत. त्याबाबतही बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त विचारांचा समावेश करता यावा म्हणून. त्यात खटकण्यासारखे काही नाही.
बाबासाहेबांचे म्हणणे बाबासाहेबांच्या तोंडून इतक्या सोप्या भाषेत सांगणे हे अवघड काम आहे. प्रधानसरांनी ते यशस्वीपणे करून दाखविले आहे.
स्त्रीपुरुषतुलना | Streepurushtulana
₹200.00भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक महत्त्वाचे मानले जाते. का, तर ते सत्तांतराचे शतक आहे, नव्या जीवनजाणिवांच्या आरंभाचे शतक आहे, वैचारिक कलहाचे शतक आहे, आत्मपरीक्षणाचे शतक आहे, परंपरेचा आंधळेपणाने स्वीकार न करता परंपरेला आव्हान देणारे शतक आहे, मूलभूत प्रश्नांची जाग आणणारे शतक आहे, परंपरेला आक्रमकपणे सामोरे जाऊन नवा विचार मांडणाऱ्यांचे शतक आहे, नव्या शक्तीच्या उपासनेचे शतक आहे, एवंच, प्रबोधनाचे शतक आहे. ‘तत्पूर्वीच्या एक हजार वर्षांत जे घडले नाही’ ते ज्या शतकात घडले असे शतक आहे, मराठी वाङ्गयाच्या दृष्टीने नवनवीन लेखने व लेखनप्रकार ज्या शतकात निर्माण झाले असे शतक आहे. या शतकाने मराठी वाङ्गयाला जी अनमोल रत्ने दिली, त्यांपैकी एक म्हणजे ताराबाई शिंदे (1850-1910) यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ हे पुस्तक. या पुस्तकात स्त्री-पुरुषांमधील सारा असमतोल दूर करून स्त्रीजातीला पुरता न्याय मिळवून द्यावा अशी खटपट आहे. इतके आधुनिक क्रांतदर्शी विचार इतक्या तर्कशुद्ध पद्धतीने एका स्त्रीने मांडलेले, मराठी गद्याने पहिल्यांदाच अनुभवले. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (1823-1892) आणि महात्मा जोतीराव फुले (1827-1890) यांच्या लेखणीने ही करामत यापूर्वी केली असली, तरी एका स्त्रीने हे धैर्य दाखविल्याचा हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल.
नामदार गोखले चरित्र | Namdar Gokhale Charitra
₹240.001866 ते 1915 असे जेमतेम 49 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांचे सार्वजनिक आयुष्य तीन दशकांचे होते. नेक नामदार अशी त्यांची ओळख देशभर रूढ झाली. पण त्यांची सुरुवातीची ओळख सुधारकाग्रणी गो. ग. आगरकर व न्या. म. गो. रानडे यांचे शिष्य अशी होती. तर अखेरच्या काळातील ओळख मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू अशी होती.
त्यांचे दहावे स्मृती वर्ष आले तेव्हा, म्हणजे 1924 मध्ये त्यांचे चरित्रलेखन स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेत पांडुरंग सदाशिव साने या 24 वर्षांच्या तरुणाने भाग घेतला, तेव्हा तो नुकताच एम.ए. झाला होता. त्या तरुणाने पुस्तक लिहायला सुरुवात तर लगेच केली, पण ते वाढत गेले आणि दरम्यान, स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली.
आणि मग ते हस्तलिखित, त्या तरुणाच्या दत्तो वामन पोतदार या शिक्षकाने एका प्रकाशकाकडे सोपवले. ते पुस्तक फेब्रुवारी 1925 मध्ये प्रकाशित झाले. नामदार गोखले यांचे विस्तृत म्हणावे असे ते पहिले चरित्र आणि त्या तरुणाचे प्रकाशित झालेले ते पहिले पुस्तक. त्यानंतर पाच वर्षांनी तो तरुण, संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरुजी या नावाने ओळखला जाऊ लागला.