नियोजित विशेषांक एक थीम घेऊन काढणार आहोत, ‘दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन’ अशी ती थीम आहे.
सामान्यतः वय वर्षे 25 च्या आत-बाहेरच्या टप्प्यावर आपला स्वतःचा असा एक दृष्टीकोन आकाराला येतो. अर्थातच, तो दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये अनेक घटक कारणीभूत असतात; मात्र काही जणांच्या बाबतीत वाचन हा विशेष महत्त्वाचा, कदाचित सर्वांत महत्त्वाचा घटक ठरलेला असतो.
तर ज्यांचा निश्चित व निर्णयात्मक असा दृष्टीकोन आकाराला येण्यात वाचन हा विशेष महत्त्वाचा घटक ठरला असावा, अशा 16 व्यक्तींना आम्ही या अंकासाठी लेख लिहिण्याची विनंती केली आहे.
1500 शब्द मर्यादेतील लेख म्हणजे अंकाची चार पाने प्रत्येकासाठी राखून ठेवली आहेत. दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन कोणत्या प्रकारचे होते आणि त्या वाचनाने दृष्टीकोन आकाराला येण्याची प्रक्रिया कशी गतिमान केली, हा मध्यवर्ती बिंदू ठेवून तो लेख लिहावा, अशी विनंती त्या सर्वांना केली आहे. अर्थातच, त्यानंतरच्या टप्प्यातील किंवा कालखंडातले वाचन, बदललेल्या धारणा हे या लेखांमध्ये अपेक्षित नाही.
कारण, या थीमचा मुख्य हेतू हा आहे की, हा अंक वाचून आजच्या तरुण पिढीला स्वतःचे मूल्यमापन करता यावे, स्वतःचा दृष्टीकोन तपासून घेता यावा. म्हणजे या अंकातील मान्यवरांना त्यांच्या पंचविशीच्या टप्प्यावर वाचनाद्वारे काय मिळाले आणि त्या तुलनेत विचार प्रक्रियेच्या बाबतीत आपण नेमके कुठे आहोत, याचा अंदाज आजच्या युवा वर्गाला यावा. शिवाय, दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये वाचन किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि त्यामध्ये किती विविध स्तर व प्रकार असतात, हेही या अंकातून अधोरेखित होऊ शकेल.
