शाळा. घर आणि परिसर या तीनही ठिकाणी होणारे शिक्षण परस्परावलंबी असून परस्परांवर प्रभाव टाकणारे असे असते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा एकसंध विचार करावा लागतो; आणि तो तसा करताना या साऱ्यांच्या परस्परसंबंधांचे धागे, त्यांची गुंतागुंत, त्यांतून होणारी मुलांच्या मनाची घुसळण या साऱ्याच बाबी एका व्यापक कॅनव्हासवर चित्रित व्हाव्या लागतात. प्रतिभा भराडे यांनी लिहिलेले हे पुस्तक हा असा शाळा, घर आणि परिसर यांच्या परस्पर संबंधांतून मुलांच्या जीवनावर घडणाऱ्या परिणामांचे व्यामिश्र चित्र रेखाटणारा कॅनव्हास आहे. एका कादंबरीचा व्याप या पुस्तकाने सांभाळला आहे. शिक्षणविषयक पुस्तकांमधील एक अनोखे असे हे पुस्तक आहे. अत्यंत आकर्षक गोष्टीवजा भाषा, अनुभवांतून उलगडलेले छोटे-छोटे प्रसंग, त्यांचे व्यावहारिक विश्लेषण आणि यांतील सर्व घटनांमागे असलेला व्यापक शैक्षणिक व सामाजिक वातावरणाचा पडदा यामुळे हे पुस्तक हा मराठी साहित्यातील वास्तवतेचा प्रकाश पाडणारा एक हिरा आहे, असे खासच म्हणता येईल. भावनेला भिडणारे त्यांचे प्रसंगचित्रण फार मोठे वाङ्मयीन मूल्य असलेले असे आहे.
रमेश पानसे
Reviews
There are no reviews yet.