सामाजिक

Saleनवी पुस्तके

दृष्टी आरोग्यक्रांतीची | Drushti Aarogyakrantichi

240.00

ग्रामीण भागातील एक विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल, यावर सक्रिय होतो. त्या दृष्टीने विविध उपक्रम आखतो. त्यातूनच पुढे ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’, ‘महिला बचतगट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ असे उपक्रम साकारतात. त्या स्थानिक ‘भारतवैद्य’ उपक्रमातूनच पुढे राष्ट्रीय पातळीवर ‘आशा’ साकारते. ‘व्यवस्थेसाठी माणूस नाही, तर माणसासाठी व्यवस्था’ हे ब्रीद कठोरपणे पाळत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. शशिकांत अहंकारी आजन्म प्रयत्नशील राहिले. ग्रामीण आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठी नवी दृष्टी देणारा त्यांचा जीवन प्रवास हृद्य तर आहेच, पण अनुकरणीयही आहे.

वीणा गवाणकर

 

Saleनवी पुस्तके

न्या. म.गो.रानडे यांचे तीन ग्रंथ | Nya. M. G. Ranade Yanche Tin Granth

1,200.00

1842 ते 1901 असे 60 वर्षांचे आयुष्य न्यायमूर्ती रानडे यांच्या वाट्याला आले. त्यांच्या भाषणांचे व निबंधाचे संग्रह असलेले

1. Essays on Indian Economics.
2. Religious and Social Reforms.
3. Miscellaneous Writings.

हे तीन ग्रंथ 1896 ते 1906 या काळात प्रकाशित झाले होते.

मात्र या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद मराठीत यापूर्वी कधीच झाले नाहीत.
आता या तिन्हींचे अनुवाद अनुक्रमे

1. भारतीय अर्थकारणावरील निबंध.
2. धार्मिक व सामाजिक सुधारणा.
3. संकीर्ण निबंध.

या तीन शीर्षकांखाली साधना प्रकाशनाकडून आले आहेत. अवधूत डोंगरे यांनी या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद केले आहेत.
या तीन अनुवादित ग्रंथांना अनुक्रमे नीरज हातेकर, अरविंद गणाचारी व अभय टिळक यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.
या लेखनाचे त्या काळातील महत्त्व आणि आजच्या काळातील उपयुक्तता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न तिन्ही प्रस्तावनाकारांनी केला आहे

Saleनवी पुस्तके

मानसरंगचे अंतरंग | Manasrangche Antarang

80.00

मन, मनाचे व्यवहार, मानसिक आजारांची, लक्षणे, कारणे आणि उपाय यांवर काही वर्षांपूर्वी डॉ. हमीद दाभोलकर या मनोविकार तज्ज्ञासोबत, मी आणि राजू इनामदार यांनी ‘मनोविकार संवाद कार्यशाळा’ घेतली. त्यात आम्ही संवादाच्या विविध पद्धतींवर काम केले. विविध आजारांची माहिती लोकांना देण्याकरता पोस्टर, घोषवाक्य, गाणी आणि नाटक यांचा प्रभावी वापर कसा करता येईल याचा विचार केला. त्यात घुसळण होऊन अचूक शास्त्रीय माहिती ही कलात्मक संवादी पद्धतीने देण्याचे मार्ग आम्हाला दिसले. त्यातील एक मार्ग म्हणजे Community Theatre सुरू करून लोकांशी संवाद साधणे हा होता. नाटक करताना करणारे आणि बघणारे या दोघांचेही शिक्षण होते. विचारांची बीजे दृक्-श्राव्य रूपातून खोलवर रुजतात. जिवंत अनुभव हा प्रभावशाली असतो. हे सर्व लक्षात घेऊन ‘मानसरंग नाट्यमहोत्सव’ भरवावा असे ठरले. तीन वर्षे ते महोत्सव भरले. त्या संपूर्ण प्रक्रियेची झलक दाखवणारी ही पुस्तिका आहे.

Saleनवी पुस्तके

ज्वारीची कहाणी | Jwarichi Kahani

120.00

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने, 2022 या वर्षी मराठीतील ललित, वैचारिक, साहित्य प्रकारांत तीन तरुणांना अभ्यासवृत्ती प्रदान केली होती, त्यातील एक होता धनंजय सानप. या तरुणाने निवडलेला विषय होता ‘ज्वारी पिकाचा अभ्यास’. साधारणतः एक वर्षभर त्याने लायब्ररी वर्क आणि फिल्ड वर्क केले, त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे. अतिशय सुबोध पद्धतीने ज्वारी या पिकाची कहाणी त्याने सांगितली आहे. यामध्ये इतिहास आहे, वर्तमानही आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शनही!

ज्वारी पिकाच्या संदर्भातील सर्व प्रमुख आयाम या पुस्तकातून पुढे येतात. त्यामुळे शेतकरी, राज्यकर्ते, धोरण आखणारे व ते राबवणारे आणि अर्थातच शेतीशी निगडित अभ्यास संशोधन करणारे यांना हे पुस्तक विशेष उपयुक्त वाटेल. मात्र सर्वसामान्य व जिज्ञासू मराठी वाचकांनाही हे पुस्तक रंजक व उद्बोधक वाटेल. कारण महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनातील मुख्य आहारात (ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ) ज्वारीचे स्थान अग्रभागी आहे.

Saleनवी पुस्तके

गोष्ट मेंढा गावाची | Goshta Mendha Gavachi

240.00

मेंढा गावाची ही गोष्ट कशासाठी सांगितली आहे? ही एवढ्यासाठीच सांगितली आहे की ज्यांना एरवी ग्रामीण-आदिवासी म्हणून संबोधले जाते ती माणसे किती शांतपणे, सभ्यपणे आणि तरीही किती निश्चयाने आपले जीवन जगत असतात ते बाकीच्यांना समजावे म्हणून. आज आपल्या खेड्यात असो वा शहरात, सर्वत्र नुसता दुराग्रह, हेकटपणा आणि असहकार भरून राहिलेला आहे. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झालेली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही; उलट, त्यामध्ये अधिकाधिक भय आणि असुरक्षितता दाटून राहिलेली आहे. समुदायात जगताना निरामय, आनंदी, निर्भय जीवनाचा प्रत्यय येत नाही. मात्र या गोष्टींची तहान माणसाला कायमच आहे आणि म्हणून अशा उदाहरणांचा मानवी मन सदैव वेध घेत असते. मेंढा हे असले एक उदाहरण आहे.

Saleनवी पुस्तके

महाराष्ट्रात विनोबा | Maharashtrat Vinoba

360.00

विनोबा महाराष्ट्रात आले तोपर्यंत लाखो एकर जमीन दानात मिळाली होती. हजारो गावे ग्रामदान झाली होती.

भूदान-यज्ञादरम्यान अनेक विचार प्रकट झाले होते, अनेक कार्यक्रम पुढे आले होते. ही सगळी शिदोरी घेऊन विनोबा त्यांच्या प्रिय महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रापुढे त्यांनी हृदय मोकळे केले. यामुळेच त्यांच्या येथील अनेक भाषणांना वेगळ्याच जिव्हाळ्याचा स्पर्श आहे. या पदयात्रेतील त्यांच्या भाषणांच्या संपादनातून ‘महाराष्ट्रात विनोबा’ पुस्तकाचे चार भाग प्रकाशित झाले (1958-59).

या भाषणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती मराठीत आहेत. भारतभरच्या पदयात्रेत महाराष्ट्र आणि गुजरातचा अपवाद वगळता विनोबा हिंदीत बोलले. फक्त महाराष्ट्रात मराठीत. त्यांची मराठी वक्तृत्वशैली या पुस्तकामध्ये दिसते तशी साहजिकच अन्यत्र दिसत नाही. विनोबांच्या विविध विषयांवरील विचारांना संकलित-संपादित करून अनेक पुस्तके विभिन्न भाषांमध्ये तयार झाली आहेत. ती उपयोगी आहेतच. मात्र मूळ भाषणांमधील खुमारी त्यांच्यात असू शकत नाही.

 

Saleनवी पुस्तके

जनांचा प्रवाहो चालिला | Janancha Pravaho Chalila

240.00

जॉर्ज ऑर्वेलच्या ‘होमेज टू कॅटॅलोनिया’ या पुस्तकाने माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. स्पॅनिश यादवी युद्धात ऑर्वेल सैनिक म्हणून गेला खरा, पण बार्सेलोनाच्या डोंगराळ भागात युद्धाचा फारसा जोरच नव्हता. गोळीबार करण्याचे प्रसंगसुद्धा हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच त्याच्या वाट्याला आले. तरीही स्वतःचे अनुभव सांगायचे, त्यांचं विश्लेषण करायचं, निरीक्षणे व निष्कर्ष नोंदवून ठेवायचे असे ठरवून एक अतिशय वाचनीय पुस्तक त्यानं लिहिलं. यादवी युद्धामुळे दुभंगलेला स्पेनचा समाज त्याच्या शब्दांमधून साकार झाला, मूर्त झाला.

मी तेच तंत्र अनुसरायचं ठरवलं. सगळं खरं सांगायचं, मोकळेपणाने सांगायचं आणि त्याचा विचार करायचा व मतं मांडायची एवढीच शैली मी वापरली. कोणताही विशिष्ट फॉर्म डोळ्यांपुढे ठेवला नाही. त्यामुळे एका मनमोकळ्या आत्मशोधाचं स्वरूपही आपोआप व सावकाश, पण निश्चितपणे येत गेलं. परिणामी, व्यक्तिस्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य, लोकशाही, प्रामाणिकपणा व सहानुभूती या मूल्यांचा मी निष्ठा म्हणून स्वीकार कसा करीत गेलो, हेही तपासून पाहण्याची गरज मला जाणवू लागली.

Saleनवी पुस्तके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत | Dr. Babasaheb Ambedkar tyanchyach shabdant

70.00

हे पुस्तक लिहिण्याची पद्धत मोठी अफलातून आहे. प्रत्यक्ष न घेतलेल्या (काल्पनिक) मुलाखतींवर हे पुस्तक आधारलेले आहे. तरीही मुलाखती वास्तवच वाटतात. पुस्तकाची अशी रचना केली आहे की, एकदा वाचायला सुरुवात केल्यावर पुढे वाचतच राहावेसे वाटते.

मुलाखती काल्पनिक तरीही वास्तवावर आधारलेल्या असल्याने, बाबासाहेबांच्या हयातीनंतरच्याही काही घटना या पुस्तकात आल्या आहेत. त्याबाबतही बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त विचारांचा समावेश करता यावा म्हणून. त्यात खटकण्यासारखे काही नाही.

बाबासाहेबांचे म्हणणे बाबासाहेबांच्या तोंडून इतक्या सोप्या भाषेत सांगणे हे अवघड काम आहे. प्रधानसरांनी ते यशस्वीपणे करून दाखविले आहे.

 

     

1 2 10