26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी आठ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट केले, स्वैर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रतिकारात नऊ अतिरेकी ठार झाले आणि अजमल कसाब हा अतिरेकी जिवंत हाती लागला. चार दिवस चाललेल्या त्या धुमश्चक्रीत पावणेदोनशे लोक मृत्युमुखी पडले. त्यात महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तो दहशतवादी हल्ला भारताच्या अस्मितेवरील हल्ला होता, जागतिक स्तरावर त्याची दखल घेतली गेली, 26/11 या नावाने तो ओळखला जातो. हेमंत करकरे यांची ओळख भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) कर्तबगार अधिकारी म्हणून महाराष्ट्राला होती. साहजिकच, त्यांच्या मृत्यूमुळे सर्व स्तरांतील लहान-थोर हळहळले. त्यांच्या कुटुंबीयांवर तर तो खूपच मोठा आघात होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीचे (कविता यांचे) धैर्य आणि बाणेदार वर्तन देशभर विशेष आदराचा विषय बनले. त्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांची कन्या जुई हिने हेमंत करकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांचे कुटुंबीय, मित्र, नातलग, सहकारी व समाजातील अन्य प्रतिष्ठित लोक यांच्याशी संवाद साधला. त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे.