माणूस आहे म्हणून | MANUS AAHE MHANUN
₹100.00माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी हे गेल्या दहा वर्षांपासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. ‘माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी हे गेल्या दहा वर्षांपासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. ‘माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
आज मराठीमध्ये हेतूपूर्वक लिहिलेल्या स्फूर्तिगीतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ‘मनोविकास’ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्त्वाचे आहे. वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारित भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो. मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही, याचा मला एक फायदा असा झाला की, त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या. माझे संगीतशिक्षण सुरू असते ते ‘कानसेन’ म्हणूनच. पण, ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार-संगीत नियोजक, माझे मित्र-मैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो.
नेहमीचा पाऊस तयार होतो त्याची एक टप्प्याटप्प्याची कृती असते. समुद्राचे पाणी, हवेचे प्रवाह आणि उष्णता ह्यांच्या प्रक्रियेमध्ये काही बदल घडले तर त्याच घटकांमधून चक्रीवादळ तयार होते असं शास्त्रज्ञ सांगतात. जगण्याच्या लयीमध्ये असे विलक्षण बदल झाले की नेहमीच्या सवयी विस्कटतात आणि आरोग्याला त्रास देणाऱ्या सवयी तयार होतात. वेगवेगळ्या व्यसनांची वादळे, कुटुंबांच्या आकाशामध्ये अशीच तयार होतात. वादळ तयार झाले की त्याचा भरकटलेला प्रवास सुरू होतो. शेवटी ते कोणत्यातरी किनाऱ्यावर धडकते. तिथे खूपच नुकसान करून जाते. त्या किनाऱ्याचा काही दोष असतो का त्यात ?… पण किनारासुद्धा निसर्गाचाच भाग नाही का. प्रत्येक वेळी शिस्तशीर पावसाने यावे आणि सुखसमृद्धी आणावी असे होत नाही. व्यसनांच्या वादळाच्या किनाऱ्यावर असतात व्यसनात अडकलेल्या माणसाचे कुटुंबीय. कुणाची पत्नी, कुणाचे आई-वडील, भाऊ-बहिणी आणि हो, अनेकांची मुले. वेगवेगळ्या वयांची, बुद्धीची, क्षमतांची.
धर्म राज्यसंस्थेला खातो म्हणजे काय ? धर्म काय वाघ आहे का की तो राज्यसंस्थेला खाईल ? राज्यसंस्था तर किती तरी बलवान असते. तिच्याकडे पोलीस, सैनिक, विमाने, रणगाडे असतात. धर्म कसा तिला खाईल ?
धर्म वाघासारखा खात नाही तर वाळवीसारखा खातो. धर्माची वाळवी कशी लागते ह्याचे उत्तम उदाहरण कुंभमेळ्याचे. कुंभमेळ्याने राज्यसंस्थेला आपली नेहमीची कार्ये बाजूला ठेवून भाविकांची व्यवस्था ठेवायला भाग पाडले. व्यवस्था म्हणजे काय? तर बांबूचे कठडे बांधणे, पार्किंगची व्यवस्था करणे, विशेष गाड्या सोडणे, इस्पितळे उभारणे, हरवले-सापडल्याची नोंद घेणे, इत्यादी. ह्या कामासाठी शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचाऱ्यांची फौज जुंपली गेली.
राज्यसंस्थेची शक्ती जी शाळा दवाखाने चालवणे, उद्योगधंदे उभारणे, जलसिंचन पुरवणे, कौशल्य-निर्मिती करणे, शेती सुधारणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी लागली पाहिजे ती भाविकांच्या अंघोळीसाठी लावली गेली.
सर्वात शोचनीय गोष्ट म्हणजे केवळ निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच नाही तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना धर्माने संगमावर डुबकी मारायला लावली. धर्म राज्यसंस्थेला खातो ते अशा प्रकारे !
कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य आणि अनुवाद इत्यादी प्रकारांत अत्यंत दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण असे लेखन करणारे भारत सासणे मराठीतील विशेष महत्त्वाचे साहित्यिक मानले जातात. २०२२ मध्ये उदगीर (जिल्हा लातूर) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या संमेलनाच्या निमित्ताने त्यांची दीर्घ मुलाखत दासू वैद्य यांनी घेतली, त्या मुलाखतीचे हे पुस्तक आहे. शिवाय यात परिशिष्ट म्हणून सासणे यांचे दोन लेख समाविष्ट केले आहेत. दासू वैद्य यांची ओळख मराठीतील आघाडीचे कवी अशी आहे, मात्र त्यांनी त्यांचा एम. फील.चा प्रबंध ‘भारत सासणे यांच्या कथा’ या विषयावर लिहिला, तर पीएच.डी.चा प्रबंध ‘भारत सासणे यांचे साहित्य’ या विषयावर लिहिला आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या मुलाखतीचे मोल विशेष आहे.
भाषेच्या संबंधात मराठी भाषा संस्कृत कुळातली आहे हे ठरल्यावर तिची शब्दसंपदाही पूर्णतया संस्कृत कुळातूनच सिद्ध करणे क्रमप्राप्त मानले गेले. तमिळ कुळातील शब्दभांडाराशी तिची प्राथमिक तुलनाही झाली नाही. स्थळनामांच्याही अभ्यासात नवे पाऊल पडलेले नाही. वस्तुस्थिती मात्र वेगळीच दिसते. संस्कृत कुळावरून मराठीतले जे शब्द व्युत्पादिता येत नाहीत, त्यातले बहुसंख्य तमिळ असावेत. तसेच मराठी मुलुखातील बहुसंख्य स्थळनामांचा संस्कृत, प्राकृत, कानडी वा तेलुगू भाषांवरून अर्थ लागत नाही; तमिळवरून मात्र लागतो. खास महाराष्ट्राची म्हणून मानली गेलेली खंडोबा-विठोबासारखी महादैवते किंवा बोलाई-फिरंगाईसारखी लोकदैवते यांचाही इतिहास आणि अर्थ आपल्याला तमिळ आदिसाहित्यावरून चांगला उमगू शकतो. त्यामुळे, महाराष्ट्रादी नावांचे मूळ तमिळमध्ये शोधण्यास सबळ कारण आहे
आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पाहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.
ग्वाल्हेर घराण्याची प्रख्यात गायिका म्हणून विदुषी नीला भागवत यांची भारतात व परदेशातही ओळख आहे. सुरुवातीला, संगीताच्या जोडीने त्यांनी नृत्य, नाट्य, या कलेच्या प्रांतात, तसेच मराठी साहित्य व समाजशास्त्राचा अभ्यास व काही काळ प्राध्यापकी अशी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. पण पुढील टप्प्यांत संगीत हेच त्यांच्या जीवनाचं श्रेयस व प्रेयस बनलं असं दिसतं. एक प्रयोगशील, अनवट वाटा धुंडाळणारी गायिका, आपली डावी विचारसरणी व स्त्रीवादी भूमिका आपल्या गायन कलेतूनही सुस्पष्टपणे व्यक्त करणारी सर्जनशील कलाकार, अशी त्यांची प्रतिमा भारतात व परदेशांतही आहे. संगीत क्षेत्रात ही काहीशी दुर्मीळ बाबच म्हणावी लागेल. अशा समाजाभिमुख कलाकार व्यक्तित्वाचा वेध घेणं म्हणजे तिच्या जडणघडणीचा काळ व अवकाश यातील ताणे-बाणे समजून घेणं होय.