रानडे, गांधी आणि जीना | Ranade, Gandhi ani Jinnah
₹200.00डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 18 जानेवारी 1943 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पुण्यात इंग्रजीतून एक भाषण दिलं. ते त्याच वर्षी एप्रिल महिन्यात ‘रानडे, गांधी अँड जीना’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं. त्या संपूर्ण पुस्तकाचं हे नवीन मराठी भाषांतर आहे.
या भाषणाच्या शीर्षकात तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावं असली तरी, प्रत्यक्षात हे भाषण त्या व्यक्तींपेक्षा डॉ. आंबेडकरांच्या आस्थेचे प्रश्न आणि त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन साररूपात मांडणारं आहे. म्हणजेच आंबेडकरांच्या विचारविश्वाचा गाभा या भाषणात सापडतो. इतिहासाची जडणघडण आणि त्यामधील मानवी कर्तेपणाचं स्थान, राजकीय आणि सामाजिक लोकशाहीचा विचार, सामाजिक सद्सद्विवेकबुद्धी, श्रेणीबद्ध विषमतेच्या रूपातील जातिव्यवस्था, माध्यमांचा व्यवहार, धर्माचं मानवी जीवनातलं स्थान, या विषयांसोबतच उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद इत्यादी विचारसरण्यांबद्दलची आंबेडकरांची मतंही या भाषणातून वाचायला मिळतात.
या भाषणाच्या अनुषंगाने आंबेडकरांच्या विचारव्यवहारातील धागेदोरे जोडून काहीएक आकृती स्पष्ट करण्याचा प्रयत्न सविस्तर विवरणात्मक टिपांमधून केला आहे. आंबेडकरांच्या भाषणात येणाऱ्या विपुल संदर्भाचे स्रोत नोंदवणं, तसंच त्यांनी या भाषणात नोंदवलेल्या मुद्द्याची त्यांच्या इतर विचारव्यवहाराशी कशी सांगड बसते याची उकल करणं, आणि त्यातील वाद-संवादाच्या शक्यतांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करणं, अशा उद्देशाने या टिपा लिहिल्या आहेत.
प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध | Prawahasathi Prawahaviruddha
₹560.002013 ते 2023 या दहा वर्षांत मी साधना साप्ताहिकात चारशे संपादकीय लेख लिहिले, त्यातील सर्वोत्तम शंभर लेख या पुस्तकात घेतले आहेत. त्यामुळे, कोणते विषय आलेले नाहीत किंवा कोणत्या विषयांवर आणखी लिहायला हवे होते, अशा प्रकारच्या अपेक्षा या पुस्तकातील लेख वाचून व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. उर्वरित तीनशे लेखांमध्ये बरेच वेगवेगळे विषय येऊन गेलेले आहेत. या पुस्तकात निवडलेले लेख असे आहेत, जे परिपूर्णतेच्या जवळ जाणारे आहेत, जे आज-उद्याच्या वाचकांना वाचायला आवडतील आणि मुख्य म्हणजे त्या दशकात साधनाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत काय भूमिका होती हे दाखवू शकतील.
अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होत असतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा वा करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच, एका मयदिनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. ‘सम्यक सकारात्मक’ हा माझा दृष्टीकोन आहे, त्यातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल. अर्थातच, एका प्रवाहासाठी दुसऱ्या प्रवाहाविरुद्ध आणि एका प्रवाहासाठी त्याच प्रवाहाविरुद्धही ! इथे मला विरोधासाठी विरोध अपेक्षित नाही, रचनात्मक वाटचाल अभिप्रेत आहे…
पत्र-पाथेय | Patra-Patheya
₹320.00भूदान-ग्रामदान आंदोलन काळात विनोबांनी हजारो व्याख्याने दिली, चर्चा केल्या. त्यांनी अनेक पत्रेही लिहिली. आंदोलनाच्या प्रणेत्याचे-नेत्याचे मानस तर या पत्रांमधून प्रकट झालेले आहेच; या पत्रांमध्ये रणनीती, कार्यक्रम, कार्यशैली वगैरेंबाबतचे विचार आहेत. कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत पातळीवर संवादही आहे. पत्रांमधून बरेचदा अशी सामग्री सापडते, जी मुद्रित दस्तऐवजांमध्ये नसते. लेख व भाषणे यांचे स्वतःचे महत्त्व असते. त्यांच्यात एखाद्या विषयाची मुद्देसूद मांडणी असते. पत्रांमध्ये हृद्गत प्रकट झालेले असते, अंतरीचा जिव्हाळा प्रकट झालेला असतो. पत्रलेखकाच्या आणि पत्र-प्राप्तकर्त्याच्याही स्वभावाच्या विविध पैलूंवर त्यांतून प्रकाश पडतो. म्हणूनच विनोबांची पत्रे हा भूदान-ग्रामदान आंदोलनाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. तो वाचकांसमोर येण्याने भूदान-ग्रामदानविषयक विमर्शात मोलाची भर पडणार आहे.
दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन | Drushtikon Aakarala Yeiparyantche Wachan
₹50.00नियोजित विशेषांक एक थीम घेऊन काढणार आहोत, ‘दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन’ अशी ती थीम आहे.
सामान्यतः वय वर्षे 25 च्या आत-बाहेरच्या टप्प्यावर आपला स्वतःचा असा एक दृष्टीकोन आकाराला येतो. अर्थातच, तो दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये अनेक घटक कारणीभूत असतात; मात्र काही जणांच्या बाबतीत वाचन हा विशेष महत्त्वाचा, कदाचित सर्वांत महत्त्वाचा घटक ठरलेला असतो.
तर ज्यांचा निश्चित व निर्णयात्मक असा दृष्टीकोन आकाराला येण्यात वाचन हा विशेष महत्त्वाचा घटक ठरला असावा, अशा 16 व्यक्तींना आम्ही या अंकासाठी लेख लिहिण्याची विनंती केली आहे.
1500 शब्द मर्यादेतील लेख म्हणजे अंकाची चार पाने प्रत्येकासाठी राखून ठेवली आहेत. दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन कोणत्या प्रकारचे होते आणि त्या वाचनाने दृष्टीकोन आकाराला येण्याची प्रक्रिया कशी गतिमान केली, हा मध्यवर्ती बिंदू ठेवून तो लेख लिहावा, अशी विनंती त्या सर्वांना केली आहे. अर्थातच, त्यानंतरच्या टप्प्यातील किंवा कालखंडातले वाचन, बदललेल्या धारणा हे या लेखांमध्ये अपेक्षित नाही.
कारण, या थीमचा मुख्य हेतू हा आहे की, हा अंक वाचून आजच्या तरुण पिढीला स्वतःचे मूल्यमापन करता यावे, स्वतःचा दृष्टीकोन तपासून घेता यावा. म्हणजे या अंकातील मान्यवरांना त्यांच्या पंचविशीच्या टप्प्यावर वाचनाद्वारे काय मिळाले आणि त्या तुलनेत विचार प्रक्रियेच्या बाबतीत आपण नेमके कुठे आहोत, याचा अंदाज आजच्या युवा वर्गाला यावा. शिवाय, दृष्टीकोन आकाराला येण्यामध्ये वाचन किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि त्यामध्ये किती विविध स्तर व प्रकार असतात, हेही या अंकातून अधोरेखित होऊ शकेल.
आचार्य जावडेकर : पत्रे आणि संस्मरणे | Acharya Javadekar : Letters and Memoirs |
₹100.00एका पत्राचा अपवाद वगळता उपलब्ध सर्व पत्रे आचार्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेली आहेत. त्यांच्या पिढीतल्या काही स्त्रियांनी आत्मचरित्रवजा लेखन केले असले तरी ती बहुतेक अत्यंत भक्तिभावाने त्यांनी आपल्या पतींची लिहिलेली चरित्रेच आहेत. एकूणच स्त्रियांच्या आत्मकथनपर लेखनांतून त्यांच्या पतीविषयीचाच पसारा जास्त असतो. मग त्या जुन्या जमान्यातल्या स्त्रिया असोत की नव्या जमान्यातल्या. मात्र, आजवरच्या पुरुषांच्या आत्मकथनपर लेखनांतून त्यांच्या पत्नीला अजिबातच स्थान दिसत नाही. क्वचित असले तरी अगदी पुसट अंधुक चित्रासारखे ! तत्कालीन पत्रव्यवहारांतूनही पत्नीविषयीचा भाव मोकळेपणाने व्यक्त झालेला दिसत नाही. आचार्यांसारख्या धीर-गंभीर वृत्तीच्या आणि समाजालाच आयुष्य वाहिलेल्या व्यक्तीबाबत तर ही बाब उंबराला फूल येण्याइतकीच दुर्घट म्हणावी लागेल.
परंतु योगायोगाने या सुमारे 21-22 पत्रांतून हे अघटित घडलेले दिसते. आचार्य जावडेकर या व्यक्तीचा आपल्या कुटुंबीयांविषयीचा, पत्नीविषयीचा भाव व्यक्त करणारा अस्सल पुरावा म्हणून ही पत्रे महत्त्वाची आहेतच. पण तत्कालीन दांपत्यजीवनातील दृढ परंतु अभिजात संयमी भावबंधाचे लेखन म्हणून त्यांचे महत्त्व अधिक आहे असे वाटते.
सुशीलाबाईंच्या लेखनातून दिसणारे तत्कालीन कौटुंबिक, सामाजिक जीवनाचे चित्र आणि विशेषतः स्त्रीजीवन हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील ध्येयनिष्ठ व्यक्तींच्या जीवनातील हे वास्तव लेखन समाजशास्त्राच्या अभ्यासकांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे
संकीर्ण निबंध | Sankirna Nibandha
₹480.00“सर्वंकष दृष्टीने पाहिले तर इथे मांडलेले चित्र अजिबात समाधानकारक नाही, हे खरे आहे. मराठी भाषेने प्रगतीचा जो टप्पा सध्या गाठला आहे, त्यात पूर्णत्वास गेलेले गतकालीन यश नसून भविष्यासाठीची आश्वासकता दिसते आहे, या दृष्टीने त्याचे कौतुक व्हायला हवे. चाळीस वर्षांच्या तुटपुंज्या कालावधीचा विचार केल्यावर मात्र आपल्याला एवढ्याशा काळात झालेल्या कामाचे प्रमाण पाहून आश्चर्य वाटते. विशेषतः या इलाक्यातील भगिनी भाषांचे तुलनात्मक दारिद्र्य लक्षात घेता मराठीतील काम लक्षणीय ठरते.
मराठीने आत्तापर्यंत साधलेल्या प्रगतीचे अवाजवी अवमूल्यन केल्याचा आरोप माझ्यावर लावला जाणार नाही, अशी मला आशा आहे. परंतु, परक्याच्या दृष्टीकोनातून आपल्या सध्याच्या साहित्याकडे पाहणाऱ्या कोणालाही हे साहित्य बहुतांशाने अंधश्रद्धाळू वा बालिश वाटेल, यात काही शंका नाही. ही निंदा पुसून काढण्यासाठी अनेक शतके कळकळीचे प्रयत्न करावे लागतील. परंतु, वर्तमानकाळ अनेक अर्थानी आश्वासक आहे, आणि लवकरच मराठी आधुनिक भारतातील प्रगत भाषांमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावेल, अशी स्पष्ट शक्यताही दिसते आहे.”
न्या. महादेव गोविंद रानडे (देशी प्रकाशनसूचीमधील मराठी भागाबद्दल टिप्पणी)
धार्मिक व सामाजिक सुधारणा | Dharmik Va Samajik Sudharana
₹360.00“युरोपीय देशांमध्येसुद्धा लसीकरणाला विरोध करणारे डॉक्टर आहेत, औषधे न घेता शरीर स्वतःहून बरे होईल असे मानणारे ‘शेकर ‘पंथीय लोक आहेत, पृथ्वी सूर्याभोवती फिरते व स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरते या सत्यापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पुस्तकपंडित आहेत.
अनेक महान बुद्धिमान व्यक्तींमध्येही विरोधाभासाविषयीचे प्रेम दिसून येते. या दुबळेपणाला ते कवटाळून असतात आणि त्यांच्या इतर कार्यांमधील श्रेष्ठत्व वाढू लागले की, त्यासोबत बांडगुळाप्रमाणे या दुबळेपणाचीही वाढ होत जाते. या अनैसर्गिक घडामोडी बाजूला ठेवल्यावर असे स्पष्ट होते की, प्रत्येक देशात लोकमताला आकार देणारे व एकंदर समुदायाला सजग करणारे बऱ्यापैकी अल्पसंख्याक असतात आणि त्यांच्या मनात वाजवी निर्धार निर्माण करायला वाव आहे. विचार न करणाऱ्या प्रचंड बहुसंख्याकांना यात गणता येणार नाही.”
न्या. महादेव गोविंद रानडे
(सामाजिक प्रश्नांबाबतचे सरकारी कायदे)



