खंड 1
इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीचा सामना करण्यासाठी जनता पक्ष निर्माण झाला होता. ‘आपापले स्वतंत्र अस्तित्व समाप्त करून एक पक्ष बनवलात, तरच मी निवडणुकीत प्रचार करायला उतरेन’ अशी अट जयप्रकाशांनी घातल्याने आणि जन मताचा प्रचंड रेटा असल्यामुळे संघटना काँग्रेस, भारतीय क्रांती दल, जनसंघ आणि समाजवादी असे विभिन्न विचारसणींचे चार पक्ष एकत्र आले आणि त्यातून बनलेल्या जनता पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश संपादन करता आले. एकमेकांचे पाय न ओढता व एकमेकांवर कुरघोडी न करता सर्वसहमतीने जनता पक्ष आणि केंद्र सरकार चालवले असते, तरच ऐक्य टिकू शकले असते. पंतप्रधानपदावर मोरारजींची निवड करताना अथवा पक्षाध्यक्ष म्हणून चंद्रशेखरांची निवड करताना हेच तत्त्व अवलंबण्यात आले होते. मात्र घटकवाद अस्तित्वात होताच आणि दुहेरी निष्ठा बाळगणारा जनसंघ याबाबत सर्वाधिक दोषी होता. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संख्याबळाचा वापर करून जनता पक्ष आणि विविध राज्यांमधली सरकारे काबीज करणे हे जनसंघाचे उद्दिष्ट होते. त्यातून जनता पक्ष कसा पोखरला गेला हे या खंडात सांगितले आहे.
खंड 3
इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीमुळे भारतात हुकुमशाही राजवट निर्माण झाली होती. त्या दडपशाहीला उलथवून टाकण्यासाठी आपापसांतले मतभेद बाजूला सारून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज होती. त्याप्रमाणे संघटना काँग्रेस, भारतीय क्रांती दल, जनसंघ आणि समाजवादी हे चार पक्ष एकत्र आले खरे; पण त्यांच्यातला एकोपा वरवरचा होता. एकीकडे केंद्र आणि राज्य पातळीवरचा घटक पक्षांमधला सत्तासंघर्ष, तर दुसरीकडे जनसंघ आणि इतर घटक पक्षांमधला वैचारिक संघर्ष यामुळे जनता पक्ष खिळखिळा होऊ लागला. हरियाणा, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांना वारंवार विश्वासदर्शक ठराव पास करण्यासाठी भाग पाडण्यात आले. त्यातून केंद्रात अस्थिरता निर्माण होईल, असा धोक्याचा इशारा लिमयेंनी दिला होता. पण विनाशाकडे नेणारा हा सत्तेचा खेळ थांबला नाही. त्यात चरणसिंग विरुद्ध मोरारजी हा सत्तासंघर्ष आणि राजनारायण यांच्या बडतर्फीचे वादग्रस्त प्रकरण यांची भर पडली. जुलै १९७८ मध्ये मधु लिमयेंच्या भगीरथ प्रयत्नांनंतर फूट सांधली गेली. पण ही ओढून-ताणून आणलेली शांतता क्षणभंगुर ठरली.
खंड 4
विभिन्न विचारसरणीचे चार पक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी १९७७ मध्ये एकत्र आले. त्यापैकी संघटना कांग्रेस, भारतीय क्रांती दल आणि समाजवादी हे तीन पक्ष स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आणि मूल्ये मानणारे होते. जनसंघ मात्र पूर्णतः वेगळ्या विचारधारेशी निगडित असा धर्माधिष्ठित घटक पक्ष होता. या नव्या एकत्रित जनता पक्षाचे सरचिटणीस या नात्याने सर्वसंमतीच्या आधारे पक्ष चालवण्याचा आग्रह लिमयेंनी धरला. परंतु वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून निर्माण होणाऱ्या सत्तासंघर्षाने जनता पक्षाला ग्रासले. मग चरणसिंग आणि मोरारजी यांनी एकमेकांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले. तेव्हा संसदीय पक्षातल्या संख्याबळाचा वापर करून जनाधार असलेल्या नेत्यांना सत्ताच्युत करू नये, असा आग्रह धरून लिमयेंनी फाटाफूट साधण्याचा निकराचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. त्यामुळे सरकार ठप्प झाले आणि अखेरीस गडगडले. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी इंदिरा गांधी सज्जच होत्या. ‘सरकार उनकी जो चला सके’ अशी घोषणा देत त्या १९८० ची निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर आल्या आणि जनता पक्षाचा अनोखा प्रयोग संपुष्टात आला. या वादळी पर्वात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या मधु लिमयेंनी सादर केलेल्या इतिहासाचा हा खंड.
Reviews
There are no reviews yet.