मी मूल्यांसाठी तुरुंगवास भोगला. ज्यांच्या दर्शनासाठी लोक येतात, त्यांचा रोष ओढवून घेतला. त्यांच्याशी असलेले पितृवत संबंध फुंकून टाकले. पण विचारांची कास सोडली नाही आणि थोरा-मोठ्यांचे पदर कधी सोडले नाहीत. ज्यांना मी ऐकविले ते महाराष्ट्राचे नामवंत वक्ते आणि आत-बाहेर संतवृत्ती धारण करणारे माझेच वडीलधारे होते. ते कमालीचे प्रामाणिक होते. माझे ऐकून ते म्हणाले, “तू म्हणतोस ते खरे आहे.’ मला माणसांचा मोह सोडवत नाही.. त्यासाठी त्यांच्या प्रमादांकडे दुर्लक्ष करणे कमीपणाचे वाटत नाही. पण त्यांच्याविषयीच्या माझ्या विश्वासाचे टवके मात्र नेहमीच उडत असतात.
‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.
Reviews
There are no reviews yet.