Shop

Saleनवी पुस्तके

मला प्रभावित करून गेलेले पुस्तक | Mala Prabhavit Karun Gelele Pustak

160.00

या पुस्तकातून अशा निष्कर्षाप्रत सहज येता येईल की, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळी पुस्तके प्रभाव टाकून जाऊ शकतात. यातून ‘वाचनाचे’ व अधिक चांगल्या वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. शिवाय, अभिजात किंवा संशोधनपर किंवा अस्सल जीवनानुभव सांगणारी किंवा अद्भुत अनोखे विश्व दाखवणारी किंवा कल्पकता प्रतिभा यांना बढावा देणारी पुस्तके, प्रभाव टाकून जाण्याची क्षमता जास्त बाळगून असतात. म्हणजे तशी पुस्तके वाचण्याची सवय असेल तर आपला सभोवताल समजून घेण्यासाठी ती विशेष उपयुक्त ठरतात!

ही गुणवैशिष्ट्ये तरुणाईच्या संदर्भात अधिक महत्त्वाची ठरू शकतात. कारण त्यांचे मानस अशाच मार्गदर्शकांच्या किंवा बियाणांच्या शोधात असते. अर्थातच हे एक सर्वपरिचित साधे सत्य आहे, पण प्रयोगातून पुढे आलेले! म्हणून याचे महत्त्व अधिक!

सारांश, हे पुस्तक वाचनाची सवय असलेल्या, बन्यापैकी राजकीय-सामाजिक भान आलेल्या व ‘स्व’ची जाणीव झालेल्या तरुणाईला अंधुक का होईना दिशा दाखवणारे वाटू शकेल.

 

         

आधार नसलेली माणसं | Aadhar Nasleli Mansa

160.00

वंचितांबरोबर काम करण्यामुळे माझं सारं जीवनच बदलून गेलं. जीवनाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. या जनसमुदायांच्या जीवनात डोकावून बघण्याची संधी मला मिळाली आणि ध्येयहीन जीवनाला निश्चित ध्येय लाभलं. ध्येय नव्हतं असं नाही म्हणत, पण ध्येय सतत बदलत होतं. लहान होते, तेव्हा खेळात पुढे येण्याची आतुरता होती. पुढे सायन्स घेऊन इंजिनीयर व्हायचं होतं आणि हे सारं एका बाजूला ठेवून शेवटी सनदी अधिकारी होण्याचा निर्धार केला. अहमदाबादलासुद्धा त्यासाठीच आले. परंतु अहमदाबादला आल्यानंतर जीवन नव्याच मार्गावर चालू लागलं. पत्रकारिता शिकता शिकताच देशातील गरीब-शोषितांची दुःखं खूप जवळून बघितली, समजून घेतली आणि त्यांच्याबरोबर राहिलेदेखील. मी ऊस कामगारांबरोबर दीड महिना राहिले. या दीड महिन्यानं मला मुळापासून हलवलं आणि बदलून टाकलं. माझा पुनर्जन्म झाला.

 

एक्स्प्रेस पुराण | Express puran

160.00

उपजत कुतूहल घेऊन विनय हर्डीकर अनेक क्षेत्रांत गेली पाच दशके विहार करत आहेत. या दरम्यान ते जिथे रमतात, तिथे खोल बुडी मारून तळ पाहून येतात. आणि कालांतराने काठाशी बसून तो अनुभव आपल्या वाचकांशी साद्यंत संवादतात. यातून त्यांची उत्कट आत्मनिवेदनात्मक शैली साकारलेली आहे.

1981 ते 1986 या काळात अशीच बुडी त्यांनी इंग्रजी पत्रकारितेत मारली होती, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रसमूहात फिरता शोधपत्रकार म्हणून. त्या अनुभवांचे पुराण ते इथे सांगत आहेत, अर्थात हे करताना आत्मनिष्ठ अनुभवकथनातून वर्तमानाचा इतिहास नोंदवण्याची बांधिलकी ते सोडत नाहीत.

या आग्रहातून आनंद, औत्सुक्य, फजिती, घालमेल, विषण्णता, रोमांच इत्यादी भावभावनांचा डौलदार स्वानुभव मांडतानाच ते तत्कालीन समाजातल्या आंतरसंबंधांची गुंतागुंत, भारतातल्या पत्रकारितेचे राष्ट्रीय व प्रादेशिक स्वरूप आणि इथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक निष्ठांचा अविरत सुरू असलेला झगडा यांचा (मर्यादित परंतु स्वयंपूर्ण) छेद वाचकांच्या जाणिवेत प्रतिरोपित करतात.

श्याम | Shyam

180.00

24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले. त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा 22 वर्षांचा कालखंड कोणी लिहिलेला नाही. त्यासाठीच त्यांनी स्वतःच लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तऐवज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. श्यामची आई मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून बालपण मांडले आहे, त्यात नंतरचा काळही थोडा येऊन जातो. ‘श्याम’ या पुस्तकात पाचवीसाठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. शालेय वयातील श्यामचे भावविश्व, विचारविश्व, श्यामचे अनुभव आणि त्यावरील श्यामचे चिंतन  ‘श्याम’ मधे आले आहे.

            

धडपडणारा श्याम । Dhadpadnara Shyam

200.00

‘धडपडणारा श्याम’ मध्ये दापोलीहून शिक्षणासाठी औंधला जाणे, सहा महिन्यांनी औंध सोडून पुण्यात येऊन मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण हा वय वर्षे 15 ते 18 हा कालखंड आला आहे. औंध आणि पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.

            

25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य | 25 Varshantil Dalitanche Swatantrya

200.00

भारत स्वतंत्र झाला त्या घटनेला 15 ऑगस्ट 1972 रोजी 25 वर्षे पूर्ण होणार होती, म्हणजे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जाणार होता. त्या पार्श्वभूमीवर साधना साप्ताहिकाने ’25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ या विषयावर विशेषांक काढला. त्या अंकाचे संपादन केले होते, त्यावेळी केवळ 27 वर्षे वय असलेले अनिल अवचट यांनी. त्या अंकात अकरा लेख, एक कथा, चार कविता आणि सहा अनुभव असा ऐवज होता. तो अंक उत्तमच होता, मात्र त्यातील राजा ढाले यांच्या लेखातील तीन-चार वाक्यांमुळे वादळ निर्माण झाले. त्या अंकावर आणि मुख्यतः त्या लेखावर अनेक लहान थोरांच्या मिळून 57 प्रतिक्रिया आल्या, त्यानंतरच्या सलग चार साधना अंकांत त्या प्रसिद्ध झाल्या.

तो संपूर्ण अंक आणि त्या निमित्ताने झडलेले वादसंवाद, या पुस्तकातून सादर करीत आहोत.

     

 

सुंदर पत्रे । Sundar Patre

200.00

सुधा, तुला अण्णांनी लिहिली तशी पत्रे मराठीत पूर्वी कोणी लिहिली नव्हती आणि पुढेही कोणी लिहील असे वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते, त्याप्रमाणे तुला लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरुजींचे – तुझ्या अण्णांचे मन स्पष्ट दिसून येत असे. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रांतून उमटलेले आहेत.

सुधाताई, तू मोठी भाग्याची. तुझ्या अण्णांचा थोरल्या भावावर जसा जीव होता तसाच तुझ्यावरही. देवाघरी जातानासुद्धा त्याचा फोटो त्यांनी आपल्या उजव्या खिशात ठेवला होता! गुरुजी नाना ठिकाणी हिंडत. नाना देश, नाना वेष, सृष्टीचे नाना प्रकार ते पाहत. त्यांची दृष्टी जरी भूमीकडे सदैव वळलेली दिसे, तरी त्यांच्या नजरेतून बारीकसारीक गोष्टदेखील निसटत नसे. त्यांची नजर जशी रत्नपारख्याची होती! ती चांगले तेवढे टिपून घेई आणि ज्यात आयब असेल, दोष असेल ते सोडून देई.

साऱ्या देशभर हिंडून आणि शेकडो ग्रंथ चाळून साक्षेपाने गोळा केलेल्या सुमधुर, सुरस, सुगंधी नि टपोर स्मृतींचे द्रोणच्या द्रोण भरून ते तुला दर शनिवारी पाठवीत. मग तू भाग्याची नाहीस का? आणि तुला पाठवलेल्या या भेटीचा स्वाद उभ्या महाराष्ट्रातल्या शेकडो, हजारो मुलांना गेले वर्षभर चाखायला मिळाला, हे त्यांचे भाग्य ! तुला लिहिलेली पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळांचा वारसा होणार आहे, हे तुझ्या अण्णांना ठाऊक होते. त्यांच्यापाशी आप-परभावच नव्हता. श्यामची आई साऱ्या महाराष्ट्राची आई झाली, तशी अण्णांची तू सुधाताई साऱ्या महाराष्ट्राची सुधाताई झाली आहेस.

– ना. ग. गोरे

             

तीन मुलांचे चार दिवस | Teen Mulanche Chaar Diwas

200.00

डिसेंबर 2015 मध्ये, पुणे शहरात राहणारी तीन मुले (आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे) ‘माणूस’ समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे, छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात – आदिवासींच्या प्रदेशात – सायकल प्रवास करीत गेले. मित्रांनी, ज्येष्ठांनी, कार्यकर्त्यांनी, पोलिसांनीही ‘तो डेंजर झोन आहे’ असे सांगितले असूनही हे तिघे गेले… आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावांत/पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर) त्यांना सोडून देण्यात आले.

तोपर्यंत ‘तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या’ महाराष्ट्रात झळकल्या… आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची ‘त्या’ चार दिवसांची डायरी, त्या सफरीचे मागचे-पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक.

तीन मुलांचे चार दिवस (अनुभवकथन) – आदिवासी प्रदेशात सायकलयात्रा करत गेलेले तीन तरुण सांगताहेत, नक्षलवाद्यांनी धरून ठेवले त्या चार दिवसांच्या मागचे-पुढचे अनुभव.

            

 

1 15 16 17 30