Bijali | बिजली
₹100.00सामाजिक तत्वज्ञान हे जर या कवीच्या काव्याचे प्रभावी वैशिष्ट्य, तर त्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप कोणते हेही लक्षात घेणे जरूर आहे. ‘बिजली’ तून व्यक्त होणारी जीवनदृष्टी प्रागतिक, व्यापक आणि सहानुभूतीमय आहे. प्रत्येक युगामध्ये सामाजिक प्रगतीचे एक सूत्र अनुस्यूत असते. इष्टानिष्टतेचा शब्दकूट कोणी कितीही पाडला तरी, ग्रीष्मातील वणव्याप्रमाणे हे सूत्र स्वतःच्या आवेगानेच सतत पुढे जात राहते आणि जाताना स्थितिनिष्ठेच्या जीर्ण गढ्यांचे दहन करून टाकते. हे सूत्र ज्याच्या ध्यानात येते, केवळ ध्यानात येत नाही तर आंतरिक भावनेने जो त्याचे ग्रहण करतो, त्याच्यासंबंधीची बौद्धिक निष्ठा व श्रद्वा ज्याच्या ठिकाणी निर्माण होते असाच कवी त्या युगधर्माचा उद्गाता आणि पुढील काळाचा प्रेषित होऊ शकतो:
श्री. वसंतराव बापट यांना हे सूत्र जाणवलेले आहे. ज्या प्रकारे जाणवायला हवे त्याच प्रकारे जाणवलेले आहे म्हणजे त्यात औट घटकेची उसनवारी नाही, तर आंतरिक निष्ठेतून उत्पन्न झालेला जिव्हाळा आहे; आत्मप्रत्ययाच्या ऐरणीवरून उठलेले स्फुल्लिंग आहेत. कवी समाजक्रांतीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यातच आजच्या युगधर्माचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे असे मी मानतो. प्रगतीचे मूलतत्व या दिशेवरुनच निश्चित होऊ शकते. वसंतरावांच्या काव्यामध्ये या तत्वज्ञानाच्या अनेक कला आपल्याला प्रकट झालेल्या दिसतात. किंबहुना त्यांच्या काव्याची प्रमुख प्रेरणा आणि त्याचे सामर्थ्य या जीवनदृष्टीमध्येच आहे.
वि. वा. शिरवाडकर (प्रस्तावनेतून)