Shop

जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru

280.00

जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रीय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.

 

            

 

ज्वारीची कहाणी | Jwarichi Kahani

120.00

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने, 2022 या वर्षी मराठीतील ललित, वैचारिक, साहित्य प्रकारांत तीन तरुणांना अभ्यासवृत्ती प्रदान केली होती, त्यातील एक होता धनंजय सानप. या तरुणाने निवडलेला विषय होता ‘ज्वारी पिकाचा अभ्यास’. साधारणतः एक वर्षभर त्याने लायब्ररी वर्क आणि फिल्ड वर्क केले, त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे. अतिशय सुबोध पद्धतीने ज्वारी या पिकाची कहाणी त्याने सांगितली आहे. यामध्ये इतिहास आहे, वर्तमानही आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शनही!

ज्वारी पिकाच्या संदर्भातील सर्व प्रमुख आयाम या पुस्तकातून पुढे येतात. त्यामुळे शेतकरी, राज्यकर्ते, धोरण आखणारे व ते राबवणारे आणि अर्थातच शेतीशी निगडित अभ्यास संशोधन करणारे यांना हे पुस्तक विशेष उपयुक्त वाटेल. मात्र सर्वसामान्य व जिज्ञासू मराठी वाचकांनाही हे पुस्तक रंजक व उद्बोधक वाटेल. कारण महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनातील मुख्य आहारात (ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ) ज्वारीचे स्थान अग्रभागी आहे.

Saleनवी पुस्तके

पक्षी उन्हाचा – सात विद्यापीठांच्या आवारात | Pakshi Unhacha – Sat Vidyapithanchya Aawarat

320.00

विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक या पाच प्रकारच्या भूमिका निभावताना डॉ. राजन हर्षे यांनी पुणे, जेएनयू (दिल्ली), सियान्स पो (पॅरिस), कोलंबिया (न्यू यॉर्क), हैदराबाद, अलाहाबाद आणि एसएयू (दिल्ली) या सात विद्यापीठांच्या आवारात मुशाफिरी केली आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन हा ध्येयवाद त्या सर्व भूमिकांना जोडणारा दुवा होता. तब्बल पाच दशकांच्या त्या प्रवासाचे एका जिप्सी वृत्तीने केलेले हे आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण आहे. या पुस्तकात बारा दीर्घ लेख आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाज जीवनावर भाष्य हे चार घटक या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे पुस्तक आत्मकथनात्मक वाटेल, प्रत्यक्षात हे एक प्रकारचे कार्यकथन आहे. मोठ्या निष्ठेने व सचोटीने कार्यरत राहताना, परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशात किती परिणामकारक काम करता येते, याचे प्रतिबिंब या पुस्तकात दिसेल.

 

       

श्यामची आई (सचित्र) | Shyamchi Aai (Sachitra)

280.00

साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित, सुजय डहाके दिग्दर्शित नवा चित्रपट 2023 च्या दिवाळीत येत आहे. त्या निमित्ताने त्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती, आता साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

पुस्तकात 42 प्रकरणे आहेत, त्यातील विविध प्रसंगांना अनुरूप अशी सिनेमातील 35 छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सिनेमातील श्यामची आई व वडील, आणि श्यामची भावंडे आहेत. आकर्षक छपाई व हार्ड बाऊंड स्वरूपातील ही आवृत्ती, कोणीही कोणालाही भेट देण्यासाठी आणि संग्रहात ठेवण्यासाठीही महत्त्वाचा ऐवज आहे.

Saleनवी पुस्तके

एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य | Eka Kombdyache Abhivyakti Swatantrya

100.00

ही कहाणी आहे गब्रू नावाच्या कोंबड्याची, त्याच्या आरवण्यासंबंधीची. गब्रूच्या आरवण्यामुळे झोपमोड होते अशी तक्रार केली जाते. त्या वेळेस कोंबड्याच्या बाजूने उभी राहतात सृजन कट्ट्यावरची मुलं. ही मुलं गोष्टी ऐकतात, सांगतात आणि लिहितातही!

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मोल त्यांनी ओळखलंय. चिकित्सक, संवादी वृत्ती. आणि संवेदनशीलता यामुळे या मुलांना परीक्षा, अभ्यास, शिकणे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याची डोळस दृष्टी आहे. कोंबड्याच्या आरवण्याच्या नैसर्गिक अभिव्यक्ती हक्कावर गदा येण्याची वेळ येते तेव्हा, ही धडपडणारी मुलं पुढाकार घेतात. पुढे होतो नाट्यमय प्रवास… त्यातून कुमारवयातील ऊर्जेला योग्य वाट मिळते. आणि मग मुलंही मोठ्यांपुढे आदर्श निर्माण करतात, याचा वस्तुपाठ आपल्यासमोर येतो.

कादंबरी रंजक तर आहेच, पण थेटपणे उपदेश न करता कल्पना आणि विचार करायला लावणारी आहे. परिणामी, ही कलाकृती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांविधानिक मूल्ये याविषयी जाणीव जागृती करते. कादंबरीत आलेल्या लोककथा, लोकगीते आणि प्राणी, पक्षी, निसर्ग यामुळे एका वेगळ्या विश्वाची सफर घडते. संघर्ष, नाट्य, चमत्कार, अद्भुत प्रसंग यामुळे कुतूहल वाढते. कहाणी उत्कंठावर्धक होते, कथानक झपाटून टाकते…!

 

   

माझी काटेमुंढरीची शाळा । Mazi Katemundharichi Shala

160.00

माझी काटेमुंढरीची शाळा (आत्मकथन) – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील खेडेगावातील एका शिक्षकाची आत्मवृत्तात्मक कादंबरी.

            

द्रविड महाराष्ट्र | Dravid Maharashtra

60.00

भाषेच्या संबंधात मराठी भाषा संस्कृत कुळातली आहे हे ठरल्यावर तिची शब्दसंपदाही पूर्णतया संस्कृत कुळातूनच सिद्ध करणे क्रमप्राप्त मानले गेले. तमिळ कुळातील शब्दभांडाराशी तिची प्राथमिक तुलनाही झाली नाही. स्थळनामांच्याही अभ्यासात नवे पाऊल पडलेले नाही. वस्तुस्थिती मात्र वेगळीच दिसते. संस्कृत कुळावरून मराठीतले जे शब्द व्युत्पादिता येत नाहीत, त्यातले बहुसंख्य तमिळ असावेत. तसेच मराठी मुलुखातील बहुसंख्य स्थळनामांचा संस्कृत, प्राकृत, कानडी वा तेलुगू भाषांवरून अर्थ लागत नाही; तमिळवरून मात्र लागतो. खास महाराष्ट्राची म्हणून मानली गेलेली खंडोबा-विठोबासारखी महादैवते किंवा बोलाई-फिरंगाईसारखी लोकदैवते यांचाही इतिहास आणि अर्थ आपल्याला तमिळ आदिसाहित्यावरून चांगला उमगू शकतो. त्यामुळे, महाराष्ट्रादी नावांचे मूळ तमिळमध्ये शोधण्यास सबळ कारण आहे

शब्दांचीच शस्त्रे | Shabdanchich Shastre

440.00

संपादकाच्या नावे व संपादकीय लेखनासाठी ओळखले जाणारे आजच्या काळातले एक मासिक आहे ‘पुरोगामी जनगर्जना’ आणि त्याचे संपादक आहेत डॉ.अभिजित वैद्य. स्वतःची अभ्यासांती बनलेली सुस्पष्ट व ठाम वैचारिक भूमिका आणि वृत्तपत्राच्या तुलनेत मासिक असल्यामुळे दीर्घ निर्बंधवजा विषयाचा सर्वांगीण वेध घेणाऱ्या अभ्यासू संपादकीय लेखनामुळे ‘पुरोगामी जनगर्जने’ला वैचारिक स्वरूप आणि स्वतःची वेगळी ओळख डॉ. अभिजित वैद्य यांच्यामुळे लाभली आहे. डॉ. वैद्य यांच्या पुरोगामी आणि मूल्याधिष्ठित भूमिकेचा प्रत्यय त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक लेखात येतो. त्यामुळेच वाचकांना वर्ण्य विषयाच्या सर्व बाजूचे ज्ञान होते, तसेच त्यांची वैचारिक जनहिताची ठाम भूमिकाही समजून येते. डॉ. अभिजित वैद्यांचे सर्व लेख शैलीदार व वाचनीय आहेत. त्यांची मराठी भाषा व्यंग, उपहास, अतिशयोक्ती अशा विविध भाषिक आयुधांनी संपन्न आहे. अनेक लेख त्यामुळे साहित्यगुणांनी संपन्न होत अभिजाततेकडे झुकतात. या पुस्तकातील बहुसंख्य लेखांना ‘लॉंग शेल्फ लाईफ’ प्राप्त झाले आहे.

   

 

1 3 4 5 30