नीती बडवे | Neeti Badwe
प्राध्यापक डॉ. नीती बडवे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर विभागात जर्मन साहित्य, भाषाशास्त्र, तसंच भाषा आणि साहित्यविषयक विचारप्रणाली याचं अध्यापन केलं.
त्यांनी मराठी, इंग्रजी आणि जर्मन ह्या भाषांमधे आणि ह्या भाषांमधून अनुवादही केले आहेत.
तसंच पीएच.डी.च्या संशोधन प्रकल्पांना आणि अनुवाद प्रकल्पांनाही मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी 'जर्मन स्टडीज' विषयावरच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमधे अनेक शोधनिबंध जर्मन भाषेत सादर केले आहेत. तसंच त्यांनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्या गोष्टी जर्मन भाषेत लिहिल्या आहेत आणि ह्या पुस्तकाचं अनेक जर्मन विद्यापीठांमधे वाचन आणि सादरीकरणही केलं आहे.
डॉ. नीती बडवे यांनी अनेक वर्षं अ-मराठी आणि अ-भारतीय लोकांना मराठी आणि हिंदी ह्या भाषा शिकवल्या आणि त्यासाठी 'Learning Marathi as a Foreign Language' (Module 1 & 2) आणि 'Learning Hindi as a Foreign Language' ही पुस्तकंही लिहिली आहेत.
'निवडक काफ्का' हे त्यांचं थेट जर्मन मधून मराठीत अनुवादित केलेलं पुस्तक आहे. शिवाय महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्या गोष्टींचं पुस्तक जर्मन बरोबर 'बिकट वाट' ह्या नावाने मराठीतही प्रसिद्ध झालं आहे. जर्मन भाषेमधे विकसित झालेल्या भाषाशास्त्रीय प्रणाली आणि परदेशी लोकांना मराठी शिकवताना आलेले अनुभव ह्यामुळे त्यांना मराठी भाषेकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन मिळाला. हे त्यांच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या 'अनंत अक्षर' ह्या मालिकेतल्या तीन पुस्तकांतून दिसतं : 'भाषेकडे बघताना...', 'मराठी भाषेकडे बघताना...' आणि 'बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे...' ही त्यांची विशेष महत्त्वाची पुस्तकं आहेत.
भाषा हा डॉ. नीती बडवे यांचा आत्मीयतेचा विषय आहे. जर्मन आणि मराठी ह्या दोन भाषा आणि संस्कृतींमधे त्या सातत्यानं मध्यस्थाचं काम करत आहेत.
Author's books
मुशाफिरी | Mushafiri
अनेक तहेच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि कामांच्या निमित्त नीती बडवे यांनी जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, नेदरलँड, फिनलँड, डेन्मार्क, इस्राएल, झेक रिपब्लिक, टर्की, कॅनडा, अमेरिका आणि सिंगापूर इत्यादी देशांना भेटी दिल्या.
त्या भेटींचे अनेक रसभरीत वृत्तांत या पुस्तकात सामावलेले असल्यामुळे, प्रत्येक लेखात वाचकाला काहीतरी नवीन वाचायला मिळते. लिहिण्याच्या ओघात त्या-त्या देशामधील सांस्कृतिक वैशिष्ट्ये, भाषा, लोक, प्रेक्षणीय स्थळे, खाद्यसंस्कृती, प्रवासातील विलक्षण अनुभव आणि त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींशी उत्स्फूर्तपणे वाढत गेलेल्या सुखद ऋणानुबंधांच्या कहाण्या, हे सर्व या पुस्तकात अतिशय हळुवारपणे गुंफले गेले आहे.
अशा ऋणानुबंधाच्या भावनिक ओलाव्यामुळे नीती बडवे मनाने केवळ पुणे किंवा महाराष्ट्रच नव्हे, तर भारताबाहेरील अनेक देशांशी एकरूप झाल्याचा प्रत्यय येतो. त्यांची लोकसंग्रह करण्याची हातोटी आणि मैत्री जतन करण्याची क्षमता पाहून वाचक थक्क होतील.
– राजन हर्षे (प्रस्तावनेतून)