6 जानेवारी 2020 रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या स्थापनेचे 200 वे वर्ष सुरू झाले. त्या दिवशी भल्या पहाटे मी डेक्कन कॉलेज परिसरात फिरायला गेलो. तेव्हा 150 वर्षांहून अधिक वयाचे केशवराव भेटले, अगदी अनपेक्षितपणे. तेव्हा त्यांच्याशी झालेला संवाद मुलाखतीच्या स्वरूपात नंतरच्या साधना साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या काळात केशवरावांच्या आणखी दहा मुलाखती झाल्या, त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी! केशवरावांच्या मुलाखती पूर्वनियोजित नव्हत्या, पण बहुतांश मुलाखती कोणता तरी एखादा विषय केंद्रस्थानी ठेवूनच झाल्या. तरुणाई, पत्रकारिता, आरक्षण, उदारीकरण पर्व, वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट, शिक्षण, असंसदीय भाषा, न्यायव्यवस्था, काँग्रेस-भाजप, निवडणूक आयोग इत्यादी.
केशवराव मुळात कमी बोलतात, संक्षिप्त उत्तरे देतात, त्यात प्रतिप्रश्नच जास्त असतात. त्या उत्तरात किंचितसा उपरोध असतो, तिरकसपणा असतो आणि समाज जीवनातील विसंगतीवर बोट ठेवून मर्मभेदी भाष्यही असते. मात्र प्रत्येक मुलाखत रंगात आली असतानाच, ‘चला, उशीर झालाय, निघतो मी’ या वाक्याने समारोप करतात. म्हणजे त्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर न देता निघून जातात. ते असे का करतात; त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देणे सोयीचे वाटत नाही, की देताच येत नाही ?
