Amha Ghari Dhan | आम्हा घरी धन
₹240.00महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार, तर 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी स्मरणिका किंवा विशेषांक दर वर्षी प्रसिद्ध होत आले आहेत. मात्र 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती असलेले अंक साधना साप्ताहिकाने प्रकाशित केले. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतुःसूत्री समोर ठेवून या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
त्या पाच वर्षात साहित्य विभागात दर वर्षी चार किंवा पाच पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये साहित्य जीवनगौरव, ललित ग्रंथ पुरस्कार, वैचारिक ग्रंथ पुरस्कार, अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, नाट्यलेखन पुरस्कार आणि विशेष ग्रंथ पुरस्कार किंवा पुरस्कार अशी वर्गवारी केलेली होती. त्या पाच वर्षांतील साहित्य पुरस्कारप्राप्त सर्व म्हणजे एकूण 22 व्यक्तींच्या मुलाखतींचे संकलन असलेले हे पुस्तक आहे.
महाराष्ट्रातील प्रबोधन पुढील दिशा | Maharashtratil Prabodhan Pudhil Disha
₹70.00धर्म राज्यसंस्थेला खातो म्हणजे काय ? धर्म काय वाघ आहे का की तो राज्यसंस्थेला खाईल ? राज्यसंस्था तर किती तरी बलवान असते. तिच्याकडे पोलीस, सैनिक, विमाने, रणगाडे असतात. धर्म कसा तिला खाईल ?
धर्म वाघासारखा खात नाही तर वाळवीसारखा खातो. धर्माची वाळवी कशी लागते ह्याचे उत्तम उदाहरण कुंभमेळ्याचे. कुंभमेळ्याने राज्यसंस्थेला आपली नेहमीची कार्ये बाजूला ठेवून भाविकांची व्यवस्था ठेवायला भाग पाडले. व्यवस्था म्हणजे काय? तर बांबूचे कठडे बांधणे, पार्किंगची व्यवस्था करणे, विशेष गाड्या सोडणे, इस्पितळे उभारणे, हरवले-सापडल्याची नोंद घेणे, इत्यादी. ह्या कामासाठी शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचाऱ्यांची फौज जुंपली गेली.
राज्यसंस्थेची शक्ती जी शाळा दवाखाने चालवणे, उद्योगधंदे उभारणे, जलसिंचन पुरवणे, कौशल्य-निर्मिती करणे, शेती सुधारणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी लागली पाहिजे ती भाविकांच्या अंघोळीसाठी लावली गेली.
सर्वात शोचनीय गोष्ट म्हणजे केवळ निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच नाही तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना धर्माने संगमावर डुबकी मारायला लावली. धर्म राज्यसंस्थेला खातो ते अशा प्रकारे !
सुंदर पत्रे । Sundar Patre
₹200.00सुधा, तुला अण्णांनी लिहिली तशी पत्रे मराठीत पूर्वी कोणी लिहिली नव्हती आणि पुढेही कोणी लिहील असे वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते, त्याप्रमाणे तुला लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरुजींचे – तुझ्या अण्णांचे मन स्पष्ट दिसून येत असे. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रांतून उमटलेले आहेत.
सुधाताई, तू मोठी भाग्याची. तुझ्या अण्णांचा थोरल्या भावावर जसा जीव होता तसाच तुझ्यावरही. देवाघरी जातानासुद्धा त्याचा फोटो त्यांनी आपल्या उजव्या खिशात ठेवला होता! गुरुजी नाना ठिकाणी हिंडत. नाना देश, नाना वेष, सृष्टीचे नाना प्रकार ते पाहत. त्यांची दृष्टी जरी भूमीकडे सदैव वळलेली दिसे, तरी त्यांच्या नजरेतून बारीकसारीक गोष्टदेखील निसटत नसे. त्यांची नजर जशी रत्नपारख्याची होती! ती चांगले तेवढे टिपून घेई आणि ज्यात आयब असेल, दोष असेल ते सोडून देई.
साऱ्या देशभर हिंडून आणि शेकडो ग्रंथ चाळून साक्षेपाने गोळा केलेल्या सुमधुर, सुरस, सुगंधी नि टपोर स्मृतींचे द्रोणच्या द्रोण भरून ते तुला दर शनिवारी पाठवीत. मग तू भाग्याची नाहीस का? आणि तुला पाठवलेल्या या भेटीचा स्वाद उभ्या महाराष्ट्रातल्या शेकडो, हजारो मुलांना गेले वर्षभर चाखायला मिळाला, हे त्यांचे भाग्य ! तुला लिहिलेली पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळांचा वारसा होणार आहे, हे तुझ्या अण्णांना ठाऊक होते. त्यांच्यापाशी आप-परभावच नव्हता. श्यामची आई साऱ्या महाराष्ट्राची आई झाली, तशी अण्णांची तू सुधाताई साऱ्या महाराष्ट्राची सुधाताई झाली आहेस.
– ना. ग. गोरे
बारा गावचं पाणी | Bara Gavcha Paani
₹120.00काही गर्भश्रीमंत काही नवश्रीमंत, काही राजाश्रयावर माजलेली, काही लोकाश्रयावर! काही काही केले तरी दरिद्रीच वाटणारी! काही चिरतरुण, चिरसुंदर, चिरसस्मित प्रत्येकाचा वेगळा सूर, वेगळा नूर. प्रत्येकाचा वेगळा गंध, वेगळा छंद… या गावांचे वेगवेगळे पाणी मला दिसले. – वसंत बापट
मुशाफिरी | Mushafiri
₹120.00अनेक तहेच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि कामांच्या निमित्त नीती बडवे यांनी जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, नेदरलँड, फिनलँड, डेन्मार्क, इस्राएल, झेक रिपब्लिक, टर्की, कॅनडा, अमेरिका आणि सिंगापूर इत्यादी देशांना भेटी दिल्या.
त्या भेटींचे अनेक रसभरीत वृत्तांत या पुस्तकात सामावलेले असल्यामुळे, प्रत्येक लेखात वाचकाला काहीतरी नवीन वाचायला मिळते. लिहिण्याच्या ओघात त्या-त्या देशामधील सांस्कृतिक वैशिष्ट्ये, भाषा, लोक, प्रेक्षणीय स्थळे, खाद्यसंस्कृती, प्रवासातील विलक्षण अनुभव आणि त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींशी उत्स्फूर्तपणे वाढत गेलेल्या सुखद ऋणानुबंधांच्या कहाण्या, हे सर्व या पुस्तकात अतिशय हळुवारपणे गुंफले गेले आहे.
अशा ऋणानुबंधाच्या भावनिक ओलाव्यामुळे नीती बडवे मनाने केवळ पुणे किंवा महाराष्ट्रच नव्हे, तर भारताबाहेरील अनेक देशांशी एकरूप झाल्याचा प्रत्यय येतो. त्यांची लोकसंग्रह करण्याची हातोटी आणि मैत्री जतन करण्याची क्षमता पाहून वाचक थक्क होतील.
– राजन हर्षे (प्रस्तावनेतून)