पूर्व खानदेशातील काही गावांत ‘तावडी बोली’ बोलली जाते. त्या बोलीतील हे पुस्तक आहे. एका आठ-दहा वर्षांच्या मुलाने पाहिलेले व अनुभवलेले, त्या गाव-परिसरातील समाजजीवन असे याचे स्वरूप आहे. यातील अनुभवांचा सच्चेपणा व भावभावनांची तरल वीण अनोख्या भावविश्वात घेऊन जाते. या लेखनातून गरिबी, दुःख, दैन्य, निराशा हे सर्व पहायला मिळते, याचे कारण प्रामुख्याने भौतिक साधनांचा अभाव. आणि याच लेखनातून प्रेम, जिव्हाळा, नातेसंबंध, त्याग व सहजीवन यांचेही दर्शन घडते; त्यातून एका सुखी समाजजीवनाचे कवडसे पहायला मिळतात.
पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीचे हे चित्रण आहे. त्या भागातील ज्या गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शाळा, आरोग्य व अन्य पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत, तेथील परिस्थिती बदलली आहे; चांगल्या व वाईट या दोन्ही अर्थांनी! मात्र ज्या गावांमध्ये अशा पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत, म्हणजे आधुनिकतेचे वारे अद्याप वाहिलेले नाही; तेथील परिस्थिती अद्यापही तशीच आहे. याचाच अर्थ, या पुस्तकातील समाजजीवन हा भूतकाळ आहे आणि वर्तमानही!
– सुशील पगारिया
Reviews
There are no reviews yet.