साप्ताहिक साधना विशेषांक ‘गोवा : ज्ञात आणि अज्ञात’| Weekly Sadhana Special Issue ‘Goa : Known And Unknown’
₹120.00गोव्याबद्दल संपूर्ण भारतात, आणि शेजारच्या महाराष्ट्रातसुद्धा, गैरसमजच जास्त आहेत. शिवाय समुद्रकिनारे, नाईट लायफ, मौजमजा, अर्धनग्र फॉरेनर्स, दारूबाजी, ड्रग्स, सॅक्स टुरिजम अशीच गोव्याची ओळख जास्त आहे. गोव्याचा मायकल ‘दारू पीके दंगा करता है’ हीच आमची प्रतिमा अगदी सर्वांनीच रंगवलेली आहे. तेव्हा गोव्याचे खरेखुरे अंतरंग दाखवायचे हे पक्कं ठरलं. तोच थोडाफार प्रयत्न या विशेषांकातनं केलाय… गोव्यावर पोर्तुगिजांनी 451 वर्षे राज्य केलं हाच इतिहास सर्वज्ञात आहे. ते पहिले नव्हे तर शेवटचे राज्यकर्ते होते, त्यापूर्वी उत्तर आणि दक्षिण भारतातील 15 राजवटी गोव्यात होत्या आणि केवळ एक पंचमांश गोवा साडेचार शतकं पोर्तुगीज सत्तेखाली होता हा अज्ञात इतिहास आहे… या अंकात आम्हाला अभिमान असलेल्या धार्मिक सलोख्यावर ज्ञानपीठकार दामोदर उर्फ भाई मावजो यांचा फार सुंदर लेख आहे. हा सलोखा जेवढा हिंदू-खिश्चनांमध्ये आहे, तेवढाच हिंदू-मुस्लिमांमध्येही आहे… इथला पोर्तुगीजकालीन समान नागरी कायदा सर्वांसाठी आहे. तो वाचल्यास भारताला कशा प्रकारचा समान नागरी कायदा हवा ते वाचकांना उमजेल. इथली देवदासी निर्मूलन चळवळ ही भारतातील बहुधा एकमेव अशी शांततापूर्ण यशस्वी क्रांती असेल. या चळवळीने संपूर्ण देशाला काय दिलं तेही तुम्हाला समजेल. सतीच्या प्रथेवर गोव्यात पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकातच बंदी घातली होती… गोव्याचा आदिवासी हा केवळ जंगल भागातच रहात नाही, तर समुद्रकिनारी भागात आणि गोव्याच्या ‘मिडलैंड’मध्येही रहातो. तिथे त्यांनी समुद्राचे खारे पाणी अडवून व गोडवा पाण्याला बाट करून देऊन किनारपट्टी भागात खाजनातून शेती, भाजी व मासळीचे उत्पादन करण्याचा बहुढंगी चमत्कार कसा केला तेही इथं वाचायला मिळेल. शेतीप्रधान असलेला गोवा केवळ लोकचळवळीतून आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र कसा बनला तेही या अंकातून उमजेल.






Reviews
There are no reviews yet.