उपजत कुतूहल घेऊन विनय हर्डीकर अनेक क्षेत्रांत गेली पाच दशके विहार करत आहेत. या दरम्यान ते जिथे रमतात, तिथे खोल बुडी मारून तळ पाहून येतात. आणि कालांतराने काठाशी बसून तो अनुभव आपल्या वाचकांशी साद्यंत संवादतात. यातून त्यांची उत्कट आत्मनिवेदनात्मक शैली साकारलेली आहे.
१९८१ ते १९८६ या काळात अशीच बुडी त्यांनी इंग्रजी पत्रकारितेत मारली होती, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रसमूहात फिरता शोधपत्रकार म्हणून. त्या अनुभवांचे पुराण ते इथे सांगत आहेत, अर्थात हे करताना आत्मनिष्ठ अनुभवकथनातून वर्तमानाचा इतिहास नोंदवण्याची बांधिलकी ते सोडत नाहीत.
या आग्रहातून आनंद, औत्सुक्य, फजिती, घालमेल, विषण्णता, रोमांच इत्यादी भावभावनांचा डौलदार स्वानुभव मांडतानाच ते तत्कालीन समाजातल्या आंतरसंबंधांची गुंतागुंत, भारतातल्या पत्रकारितेचे राष्ट्रीय व प्रादेशिक स्वरूप आणि इथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक निष्ठांचा अविरत सुरू असलेला झगडा यांचा (मर्यादित परंतु स्वयंपूर्ण) छेद वाचकांच्या जाणिवेत प्रतिरोपित करतात.