साने गुरुजींना अटक करून नाशिकला आणले आणि त्या वेळी त्यांना सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी विनवले आणि सेवा दलाच्या बौद्धिक बैठकीचे विवेचन करणारी ही पत्रे साने गुरुजींनी लिहिली. ह्या पत्रांचे भाग्य असे की, तुरुंगातल्या अनेक सत्याग्रहींनी ती त्या वेळी नकलून घेतली.
ही पत्रे खरे तर त्याच वेळी प्रकाशित व्हायची. त्याचे हस्तलिखित बाहेर आलेही होते. चार-दोन पत्रे छापूनही झाली होती. परंतु, एकाएकी त्याची छपाई थांबली! पुढे राजकीय वातावरण एकसारखे तापत गेले.
त्यांचा आवडता पुतण्या वसंता- तोही तुरुंगात होता. त्याला महाराष्ट्रातील तरुणांच्या जागी कल्पूनच साने गुरुजींनी ही पत्रे लिहिली होती.
या पत्रांना दुहेरी महत्त्व आहे, असे वाटते. ऐतिहासिक दृष्टीने ही पत्रे महत्त्वाची आहेत. त्या काळाच्या चैतन्यमय वातावरणाचे प्रतिबिंब या पत्रांच्या शब्दाशब्दांत पडलेले आहे. साने गुरुजींसारख्यांच्या मनाचा मागोवा ह्या पत्रांतून घेता येतो. दुसरी गोष्ट अशी की, परिस्थितिनिरपेक्ष शाश्वत असेही या पत्रांत काही आहेच. त्या काळातील काँग्रेस ही काही मूल्यांच्या उपासनेचे प्रतीक होती. स्वातंत्र्य मिळाले तरी त्या मूल्यांची उपासना केलीच पाहिजे. त्या मूल्यांची आपण उपेक्षा करू, तर आजचे स्वातंत्र्य धोक्यात येईल.
भाव-बुद्धीने समृद्ध अशा सेवकांची सेना स्वयंप्रेरित संस्थांमार्फत नवभारताच्या निर्मितीच्या कार्याला पुढे सरसावून येईल, तेव्हाच स्वातंत्र्याचे रक्षण होईल आणि लोकशाही-समाजवादी समाज अस्तित्वात येईल. ह्या पत्रांत हाच संदेश साने गुरुजींनी अतिशय कळकळीने दिला आहे. परिस्थिती बदलली तरी हा भाग अद्यापही अतिशय आवश्यक असाच आहे. सेवा दलांनीच नव्हे, तर एकूणच तरुणवर्गाने या पत्रांत अनुस्यूत असलेला हा संदेश घेतला पाहिजे.
– ना. ग. गोरे
Reviews
There are no reviews yet.