एका पत्राचा अपवाद वगळता उपलब्ध सर्व पत्रे आचार्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेली आहेत. त्यांच्या पिढीतल्या काही स्त्रियांनी आत्मचरित्रवजा लेखन केले असले तरी ती बहुतेक अत्यंत भक्तिभावाने त्यांनी आपल्या पतींची लिहिलेली चरित्रेच आहेत. एकूणच स्त्रियांच्या आत्मकथनपर लेखनांतून त्यांच्या पतीविषयीचाच पसारा जास्त असतो. मग त्या जुन्या जमान्यातल्या स्त्रिया असोत की नव्या जमान्यातल्या. मात्र, आजवरच्या पुरुषांच्या आत्मकथनपर लेखनांतून त्यांच्या पत्नीला अजिबातच स्थान दिसत नाही. क्वचित असले तरी अगदी पुसट अंधुक चित्रासारखे ! तत्कालीन पत्रव्यवहारांतूनही पत्नीविषयीचा भाव मोकळेपणाने व्यक्त झालेला दिसत नाही. आचार्यांसारख्या धीर-गंभीर वृत्तीच्या आणि समाजालाच आयुष्य वाहिलेल्या व्यक्तीबाबत तर ही बाब उंबराला फूल येण्याइतकीच दुर्घट म्हणावी लागेल.
परंतु योगायोगाने या सुमारे 21-22 पत्रांतून हे अघटित घडलेले दिसते. आचार्य जावडेकर या व्यक्तीचा आपल्या कुटुंबीयांविषयीचा, पत्नीविषयीचा भाव व्यक्त करणारा अस्सल पुरावा म्हणून ही पत्रे महत्त्वाची आहेतच. पण तत्कालीन दांपत्यजीवनातील दृढ परंतु अभिजात संयमी भावबंधाचे लेखन म्हणून त्यांचे महत्त्व अधिक आहे असे वाटते.
सुशीलाबाईंच्या लेखनातून दिसणारे तत्कालीन कौटुंबिक, सामाजिक जीवनाचे चित्र आणि विशेषतः स्त्रीजीवन हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील ध्येयनिष्ठ व्यक्तींच्या जीवनातील हे वास्तव लेखन समाजशास्त्राच्या अभ्यासकांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे