जॉर्ज ऑर्वेलच्या ‘होमेज टू कॅटॅलोनिया’ या पुस्तकाने माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. स्पॅनिश यादवी युद्धात ऑर्वेल सैनिक म्हणून गेला खरा, पण बार्सेलोनाच्या डोंगराळ भागात युद्धाचा फारसा जोरच नव्हता. गोळीबार करण्याचे प्रसंगसुद्धा हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच त्याच्या वाट्याला आले. तरीही स्वतःचे अनुभव सांगायचे, त्यांचं विश्लेषण करायचं, निरीक्षणे व निष्कर्ष नोंदवून ठेवायचे असे ठरवून एक अतिशय वाचनीय पुस्तक त्यानं लिहिलं. यादवी युद्धामुळे दुभंगलेला स्पेनचा समाज त्याच्या शब्दांमधून साकार झाला, मूर्त झाला.
मी तेच तंत्र अनुसरायचं ठरवलं. सगळं खरं सांगायचं, मोकळेपणाने सांगायचं आणि त्याचा विचार करायचा व मतं मांडायची एवढीच शैली मी वापरली. कोणताही विशिष्ट फॉर्म डोळ्यांपुढे ठेवला नाही. त्यामुळे एका मनमोकळ्या आत्मशोधाचं स्वरूपही आपोआप व सावकाश, पण निश्चितपणे येत गेलं. परिणामी, व्यक्तिस्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य, लोकशाही, प्रामाणिकपणा व सहानुभूती या मूल्यांचा मी निष्ठा म्हणून स्वीकार कसा करीत गेलो, हेही तपासून पाहण्याची गरज मला जाणवू लागली.