छत्तीसगडमधील बस्तर भाग सर्वांत दुर्गम आणि आदिवासीबहुल आहे. त्यात नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर आणि सुकमा हे जिल्हे सर्वांत जास्त नक्षलग्रस्त आणि प्रशासनाकडूनही दुर्लक्षित झालेले आहेत. अनेक समस्यांनी ग्रस्त आणि विकासापासून कोसो दूर अशा भागात जेव्हा सकारात्मक बदल घडू लागतात, तेव्हा ते समाजाला पुन्हा स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देऊ लागतात. मी या भागात पोहोचले तेव्हा नुकतीच बदलांची सुरुवात झाली होती आणि ती सर्व प्रक्रिया जेव्हा मी प्रत्यक्ष अनुभवत होते, तेव्हा आपोआपच मी लिहू लागले. जिथे सर्वांत जास्त गरज आहे, अशा दुर्गम आणि आदिवासी भागात अशक्यप्राय वाटणाऱ्या परिस्थितीतही माणसाच्या इच्छाशक्तीने घडून येणारे ‘सकारात्मक बदल’ ही एकच प्रेरणा मला लिखाणासाठी उद्युक्त करत राहिली.
बिजापूर डायरी लिहायला सुरुवात केली तेव्हा सुरुवात रुग्णालयातील अनुभवांपासून झाली. परंतु लेखनामुळे माझ्याही विचारांच्या कक्षा विस्तारत गेल्या. रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तींच्या अनारोग्यामागे कसे वेगवेगळे सामाजिक प्रश्न एकमेकांत गुंफलेले असतात हेही लक्षात येऊ लागले होते. समाजाच्या इतरही अंगांचा मग यानिमित्ताने विचार सुरू झाला. लेखन जास्तीत जास्त निरपेक्ष व अचूक कसे ठेवता येईल, सत्याच्या जवळ जाणारे कसे असेल असा माझा नेहमीच प्रयत्न राहिला.
Reviews
There are no reviews yet.