विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक या पाच प्रकारच्या भूमिका निभावताना डॉ. राजन हर्षे यांनी पुणे, जेएनयू (दिल्ली), सियान्स पो (पॅरिस), कोलंबिया (न्यू यॉर्क), हैदराबाद, अलाहाबाद आणि एसएयू (दिल्ली) या सात विद्यापीठांच्या आवारात मुशाफिरी केली आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन हा ध्येयवाद त्या सर्व भूमिकांना जोडणारा दुवा होता. तब्बल पाच दशकांच्या त्या प्रवासाचे एका जिप्सी वृत्तीने केलेले हे आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण आहे. या पुस्तकात बारा दीर्घ लेख आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाज जीवनावर भाष्य हे चार घटक या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे पुस्तक आत्मकथनात्मक वाटेल, प्रत्यक्षात हे एक प्रकारचे कार्यकथन आहे. मोठ्या निष्ठेने व सचोटीने कार्यरत राहताना, परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशात किती परिणामकारक काम करता येते, याचे प्रतिबिंब या पुस्तकात दिसेल.
