या संग्रहातील कविता सादर करताना वसंतरावांनी आपल्या समकालीन, समव्यवसायी साहित्यिकांना इशारा देऊन बजावले आहे…. “ध्यानात ठेवा, ज्यांची मान ताठ असेल, ज्यांच्या व्यक्तित्वात पोलादाचे उभे आडवे ताणेबाणे असतील, सत्याचा भार पेलताना ज्यांचा देह झुकला नसेल आणि कोणत्याही लोभासाठी ज्यांनी आत्मा विकला नसेल, त्यांनाच सरस्वतीच्या दरबारात आज आमंत्रण आहे.” आणीबाणीच्या काळात लेखक, कलावंतांची जी मुस्कटदाबी सुरू झाली होती तिला सच्च्या लेखकाने व कलावंताने शरण जाता कामा नये, असे वसंतरावांना बजावायचे आहे. यात थोडीफार आढ्यता आहे असे कोणाला वाटेल. पण हा कवितासंग्रह वाचल्यानंतर तेवढी आढ्यता, कवीच्या ठिकाणी असायला हरकत नाही असेच वाचकांचे मत होईल.
– ना. ग. गोरे